Skip to main content
x

जोगळेकर, गंगाधर नारायण

     गंगाधर जोगळेकर यांचा जन्म जमखंडी येथे झाला. जन्मगावी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यावर सातारा व सांगली येथे त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. पुणे विद्यापीठातून १९६२ साली ते एम. ए. झाले. त्यानंतर १९९५ साली निवृत्त होईपर्यंत त्यांनी फर्गसन महाविद्यालयामध्ये अध्यापन केले. तेथे ते मराठी विभाग प्रमुख होते. मध्यंतरी १९७४ ते १९७८ पर्यंत त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात अध्यापन केले.

     ‘अभिनव भाषा विज्ञान’, ‘मराठी भाषेचा इतिहास’ यानंतर ऑगस्ट २००८ मध्ये ‘महाराष्ट्र व मराठी भाषा’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात भाषेसंबंधी काही विचार त्यांनी अभ्यासकांसमोर मांडले आहेत. ते म्हणतात, ‘भाषेचा अभ्यास ही एक कठीण गोष्ट आहे अशी भावना होण्याचे वस्तुतः काही कारण नाही; पण प्रत्यक्षात भाषा आणि व्याकरण हे फार किचकट विषय आहेत अशी समजूत झालेली दिसून येते. भाषेच्या अभ्यासाचे मुख्य साधन निसर्गाने प्रत्येकाला दिले आहे. मुखातील अवयवांचे ‘बोलणे’ हे मुख्य कार्य नव्हे.’ महाराष्ट्रात मराठीच्या स्थितीसंबंधी त्यांनी लक्षवेधी प्रश्न विचारला आहे - ‘कर्नाटकात कन्नड हितरक्षण नावाचे खाते आहे आणि या खात्याचा कॅबिनेट मंत्री असतो, हे किती मराठी मंत्र्यांना माहीत आहे?’ दिवाकर मोहनी यांनी शुद्धलेखनाच्या नियमांविषयी व सत्त्वशीला सामंत यांनी मराठी व्याकरणाविषयी घेतलेल्या आवेशपूर्ण आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न जोगळेकरांनी त्यांच्या या पुस्तकात केला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे मराठी भाषेच्या सध्याच्या दुरवस्थेबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त होत असतानाच जोगळेकरांनी मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा सांगोपांग विचार मांडणारा हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. मराठी भाषेच्या वाटचालीतील विविध टप्पे आणि त्या भाषेवर होत गेलेली राजकीय व सांस्कृतिक आक्रमणे यांचेही विश्लेषण लेखकाने प्रस्तुत केले आहे.

     जोगळेकरांनी संपादित केलेल्या ‘मराठी वाङ्मयाचा अभिनव इतिहास’ (काही लेखक, काही साहित्य कृती) या पुस्तकात १९२० ते १९६० या कालखंडातील अनेक चळवळी, स्त्री-उन्नती, युवक संघटना, शिक्षण प्रसार, संयुक्त महाराष्ट्र पर्व, वाङ्मयीन स्थित्यंतरे, विविध वाद अशा पैलूंवर प्रकाश टाकला आहे. पुणे विद्यापीठासाठी तसेच विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कामात सुमारे ३० वर्षे ते सक्रिय होते व त्यांपैकी ६ वर्षे ते कार्याध्यक्ष होते. प्रारंभापासून त्यांच्या निधनापर्यंत भरलेल्या सर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचा तपशील त्यांना मुखोद्गत होता. परिषदेतर्फे प्रकाशित झालेल्या खंड १ व ५ मधील प्रकरणांचे लेखन त्यांनी केले. जोगळेकर हे वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी ‘मराठी टीकाकार’ (१९७९) व ‘साहित्य समीक्षा : स्वरूप व विकास’ (१९८०) ही पुस्तके सहकार्याने प्रसिद्ध केली. ‘मराठी भाषेचे ठळक विशेष’ हे पुस्तक मुक्त विद्यापीठातर्फे प्रकाशित झाले आहे.

     - वि. ग. जोशी

जोगळेकर, गंगाधर नारायण