जोगळेकर, वसंत
वसंत जोगळेकर यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे होते व हस्ताक्षरही सुंदर होते. त्यांना चित्रपटात काम करण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे पदवी प्राप्त केल्यावर अभिनेता बनण्यासाठी वसंत जोगळेकर नागपूरहून मुंबईला आले. सागर मुव्हीटोनच्या सर्वोत्तम बदामी या गाजलेल्या दिग्दर्शकाशी त्यांची भेट झाली आणि वसंत जोगळेकर ‘बदामी’ यांचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सागर मुव्हीटोनद्वारे चित्रपटसृष्टीत दाखल झाले. ‘चिंगारी’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
सागर मुव्हीटोन ही संस्था १९४०-४१ च्या दरम्यान बंद झाल्याने जोगळेकरांनी पुणे येथे मुक्काम हलवला. तेथे १९४२ मध्ये जोगळेकरांनी सदूभाऊ गद्रे यांच्या ‘किती हसाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. नंतर त्यांनी ‘चिमुकला संसार’ या मा. विनायकांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यामध्ये मा. विनायक व मीनाक्षी हे नायक-नायिकेच्या, तर सुमती गुप्ते या सहनायिकेच्या भूमिकेत होत्या. पुढे वसंत जोगळेकर व सुमती गुप्ते विवाहबद्ध झाले.
नंतर जोगळेकरांना मुंबई येथे दत्तू बांदेकरलिखित ‘आपकी सेवा में’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी मिळाली. १९४७ मध्ये आलेल्या या चित्रपटात दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लता मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटात सर्वप्रथम पार्श्वगायन केले. नट महिपाल यांनी हे गीत लिहिले होते. यानंतर जोगळेकरांनी स्वत:ची चित्रपट संस्था स्थापून ‘साखरपुडा’ या चित्रपटाची निर्मिती केली. नंतर १९५१ मध्ये एम अँड टी कंपनीच्या ‘नंदकिशोर’ या हिंदी व मराठीत बनलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. यानंतर जोगळेकरांचे ‘समाज’, ‘कारागीर’, ‘शेवटचा मालुसरा’ (१९६५), ‘एक कली मुस्काई’ (१९६८), ‘आज और कल’ (१९६३), ‘हा खेळ सावल्यांचा’ (१९७६), ‘जानकी’ (१९७९) इ. अनेक हिंदी-मराठी चित्रपट गाजले. १९८० मध्ये जोगळेकर चित्रपटसृष्टीतून निवृत्त झाले.
- द.भा. सामंत