Skip to main content
x

जोशी, भीमसेन गुरुराज

ध्ययुगात तानसेन हा गायक-नायक जसा धृपदगायनाच्या संदर्भात एक मानदंड मानला गेला होता, त्याप्रमाणे पंडित भीमसेन गुरुराज जोशी यांचे नाव आधुनिक काळात ख्यालगायकीच्या संदर्भात घेतले जाते. किराणा घराण्याच्या कक्षा रुंदावणारे त्यांचे ख्यालगायन, आर्त ठुमरी, सात्त्विक संतवाणी, रंगतदार रंगवाणी, भावपूर्ण भाव-चित्रगीते यांचा गहिरा ठसा भारतीय जनमानसावर गेली सुमारे सात दशके व चार पिढ्यांवर उमटला आहे.

कर्नाटकातील गदगजवळच्या होंबळ या छोट्याशा गावी ज्योतिषी असणाऱ्या जोशी घराण्यातील भीष्माचार्य जोशी हे गोड आवाजात पुराण सांगत. त्यांचे ज्येष्ठ पुत्र गुरुराज जोशी हे गदग येथे शिक्षकी पेशा करत. गुरुराज व रमाबाई जोशी या दांपत्यास रोण या गावी रथसप्तमीस पहिला मुलगा झाला व आजोबांच्या नावावरून त्याचे नाव ‘भीमसेन’ असे ठेवले.

लहानपणी आईच्या सुरेल ओव्या, भजनांचा संस्कार भीमसेनवर झाला.स्वरांचे विलक्षण आकर्षण या बालकास होते व किराणा घराण्याचे अध्वर्यू गायक अब्दुल करीम खाँसाहेब यांच्या ध्वनिमुद्रिकांतले ‘फगवा ब्रिज देखन को’ (बसंत) व ‘पिया बिन नहीं आवत चैन’ (ठुमरी) या रचनांचे गायन बालवयातच त्याच्या मनावर ठसले. मुलाचे हे गायनवेड वडिलांनी ओळखले व हुच्च हणमंताचार्य यांच्याकडे भीमसेन जोशींनी १-२ वर्षे प्राथमिक धडे घेतले.

त्यांनी १९३२ साली गदग येथे सवाई गंधर्वांचा जलसा प्रथमच ऐकला व त्या गायनाने त्यांच्या मनावर विलक्षण मोहिनी घातली. हे स्वरप्रधान अस्सल रागसंगीत ऐकून त्यांनी रागविद्या आत्मसात करायचा  दृढनिश्चय केला. त्यासाठी त्यांनी आपले घर,गाव सोडून पलायन केले व मुंबई गाठली. पण कानडीशिवाय अन्य भाषा येत नाही, इतर शिक्षण नाही व कुणाशी परिचयही नाही . त्यामुळे ते विजापूरमार्गे घरी परतले. या प्रथम पलायनानंतरही जोशींच्या मनात गाणे शिकण्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देणारी नव्हती. वडिलांनी त्यांना अगसरू चनप्पा कूर्तकोटी यांची शिकवणी लावली; पण त्याने भीमसेन यांचे समाधान झाले नाही. त्यांच्या मनाने पुन्हा उसळी घेतली व पलायन केले.

गदगपासून प्रवास करत भीमसेन जोशी ग्वाल्हेरला पोहोचले. त्यांनी प्रख्यात सरोदिये हफिज अली खाँ यांच्याकडे शागिर्दी केली. राजाभैया पूछवाले यांच्या सांगण्यावरून ते खडगपूरला केशव लुखे यांच्याकडे शिकले, तसेच कलकत्ता (कोलकाता) येथे प्रख्यात बंगाली गायक पहाडी सन्याल यांच्याकडे उमेदवारी केली. पुढे दिल्लीला चांद खाँ, जालंधर येथे अंध धृपदिये मंगतराम यांच्याकडेही शागिर्दी केली. या काळात भीमसेन जोशींनी अनेक बुजुर्गांचे गाणेबजावणे खूप ऐकले. जालंधरच्या संगीत संमेलनात पं. विनायकबुवा पटवर्धन यांची भेट झाली. त्यांनी भीमसेन जोशींचा कष्टदायक प्रवास ऐकून कुंदगोळ येथे सवाई गंधर्वांकडे तालीम घेण्याचा सल्ला दिला.

भीमसेन जोशींचे १९३५ सालापासून कुंदगोळ येथे सवाई गंधर्वांकडे संगीत शिक्षण सुरू झाले. भीमसेन जोशींनी कष्टाची कामेही गुरुगृही श्रद्धेने केली. आपल्या शिष्याची चिकाटी, परिश्रमाची तयारी जोखून मगच सवाई गंधर्वांनी खरी तालीम सुरू केली. वर्षभर पूरिया रागाची तालीम मिळाली. तो राग कंठसिद्ध झाल्यावर तोडी, मुलतानी, मल्हार , ललित, यमन, मालकंस, दरबारी अशा किराणा घराण्याच्या खास आलापप्रधान रागांची विस्तृत तालीम सवाई गंधर्वांनी दिली. शिवाय गंगूबाई हनगळ यांचीही तालीम जोशींना ऐकायला मिळाली. सवाई गंधर्वांच्या मैफलींत स्वरसाथ करताना मैफलीत रंग जमवण्याचे तंत्रही समजत गेले. ही तालीम त्यांना १९३९ पर्यंत सलगपणे मिळाली.

नंतर भीमसेन जोशींनी वर्षभर रामपूरला उ.मुश्ताक हुसेन खाँ यांची तालीम घेऊन नटमल्हार हा राग शिकून घेतला. लखनौला सिद्धेश्वरीदेवी, बेगम अख्तर, बिस्मिल्ला खाँ, अनोखेलाल, रातंजनकर, व्ही.जी. जोग, गिंडे, भट, इ. अनेक उत्तमोत्तम कलाकारांचा सहवास त्यांना लाभला. लखनौच्या वास्तव्यात भीमसेन जोशींनी स्वरसाधनेबरोबरच बलोपासनाही पुष्कळ केली, व्यायामाने शरीर कमवले, दमसास मिळवला. तेथे ते आकाशवाणीवर नियमितपणे गाऊही लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या अनिश्चिततेच्या काळात ते पुन्हा गदगला परतले. त्यांनी १०-१२ तासांचा रियाज अविरतपणे केला व त्यातून आपला आवाज घडवला, गायकीचे शिल्प साकारले. मग मैफलींचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी धारवाडपासून मद्रासपर्यंत पहिला दौरा यशस्वीपणे केला.

पहिल्या दौर्‍यानंतर त्यांनी मंत्रालय येथे राघवेंद्र स्वामींच्या मठात काही काळ गानसेवा केली व आशीर्वाद मिळवले. सवाई गंधर्वांच्या एकसष्ठीनिमित्त पुण्यात १९४६ साली आयुर्वेदाचार्य देशपांडे, डॉ. पाबळकर, इ.नी सत्कार समारंभ आयोजित केला होता. या समारंभात भीमसेन जोशी प्रथमच पुण्यात गायले. राग मल्हार व ‘चंद्रिका ही जणू’ या नाट्यपदाच्या गायनाने त्यांनी श्रोत्यांची मने काबीज केली. तेव्हा पंचविशीतल्या भीमसेन जोशींनी श्रोत्यांच्या मनात मिळवलेले स्थान आजतागायत अढळ आहे. यानंतर ‘मैफलीचा रंगतदार गायक’ म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. भीमसेन जोशींनी भारतातल्या १७ राज्यांतील ३०० हून अधिक ठिकाणी हजारो मैफली रंगवल्या. भारतभरातील सर्व मानाची संगीत संमेलने भीमसेन जोशींच्या गायनावाचून पूर्ण होत नसत. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश व बंगालमधील रसिकांवर त्यांचा विशेष प्रभाव होता.

ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वीडन, हॉलंड, इटली, स्वित्झर्लंड, अमेरिका, कॅनडा, ब्राझील, आखाती देश, अफगाणिस्तान, जपान, इंडोनेशिया, नेपाळ, इ. देशांत सातत्याने होणार्‍या त्यांच्या मैफलींमुळे पु.लं.नी त्यांना गमतीने ‘हवाई गंधर्व’ अशी पदवी दिली.

गुरू सवाई गंधर्व यांच्या पुण्यतिथी निमित्त भीमसेन जोशींनी १९५३ साली डॉ. नानासाहेब देशपांडे व अन्य मित्रमंडळींसह ‘सवाई गंधर्व संगीत संमेलन’ सुरू केले व ते अल्पावधीतच भारतातील एक महत्त्वाचे रंगपीठ बनले. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे चालवल्या जाणार्‍या या महोत्सवासाठी भीमसेन जोशींनी अनेक कलाकार प्रेमाने जोडले व भीमसेन जोशींबद्दलच्या आदरामुळे भारतभरातले अनेक दिग्गज कलाकार आपली कला या महोत्सवात सादर करत. त्यांचा अमृतमहोत्सव पुण्यात १९९६ साली  अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. त्यांनी वयाच्या ८० वर्षापर्यंत मैफलींत गायन केले.

अब्दुल करीम खाँ प्रणीत व सवाई गंधर्वांकडून प्राप्त केलेल्या किराणा घराण्याच्या स्वरप्रधान गायकीला पं. भीमसेन जोशींनी स्वतःच्या व्यक्तित्वानुसार निराळा आकार दिला. केसरबाई केरकर व उ. आमीर खाँ यांच्या गायकीचाही प्रभाव त्यांच्या गायनावर पडला. घराण्याच्या गायकीच्या कक्षा ओलांडून पुढे जात भीमसेन जोशींनी स्वतःची खास मुद्रा असणारी ‘भीमसेनी मर्दानी गायकी’ रुजवली. भीमसेनजींचा बुलंद, अचूक, सुरेल आवाज, हळुवारपणे रागाचे व्यक्तित्व उलगडत नेणारी विलंबित लयीतील आलापी हे त्यांचे सर्वांत मोठे संमोहनास्त्र ठरले. त्यांची दीर्घ दमश्वासाची, तिन्ही सप्तकांत संचार करणारी जोरकस तनयैतही स्तिमित करते.

मैफलींत त्यांनी मुख्यतः ललित, भैरव, रामकली, तोडी, मुलतानी, मारवा, पूरिया, पूरिया धनाश्री, यमन, शुद्धकल्याण, मारुबिहाग, अभोगी, मालकंस, दरबारी कानडा, मल्हार, इ. आलापीस पोषक असे, किराणा घराण्यात प्रचलित असणारे राग गायले. मात्र किराणा घराण्यात कमी गायले जाणारे शुद्ध केदार, शुद्ध बहार, गौडसारंग, नटजयजयवंती, नटमल्हार, छायामल्हार, सुहा, देसकार, मधुवंती, प्रदीपकी, हेमावती, इ. अनवट, मिश्र व संकीर्ण गटांतील रागही त्यांनी वेळोवेळी गायले.

किराणा घराण्यात रूढ असणारी ख्याली अंगाची, पण अत्यंत भावपूर्ण ठुमरी भीमसेन जोशी गात. जोगिया (पिया मिलन की आस), तिलंग (सजन तुम काहे को), काफी (बावरे दम), खमाज (पानी भरेली), भैरवी (जमुना के तीर, बाबुल मोरा) यांतील भावार्त ठुमरीगायन हाही त्यांच्या मैफलींतील महत्त्वाचा पक्ष होता.

भीमसेन जोशींना ‘रागसंगीताच्या मैफलीचा बादशाह’ अशी मान्यता मिळाली होतीच; पण त्यांचे नाव सर्वदूर पोहोचवण्यास साहाय्यभूत झाले ते त्यांचे अभंग गायन हे होय. भीमसेन जोशींनी पुण्यात प्रथमच ५ जुलै १९७२ रोजी आषाढी एकादशीला ‘संतवाणी’ हा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर अक्षरशः खेड्या-पाड्यांपर्यंत त्यांनी ही संतवाणी पोहोेचवली व दिगंत कीर्ती मिळवली. भीमसेन जोशींनी गायलेले तीर्थ विठ्ठल, नामाचा गजर, ज्ञानियांचा राजा, इ. (संगीतकार राम फाटक), तसेच विठ्ठल गीती गावा, राजस सुकुमार, जे का रंजले, इ. (संगीतकार श्रीनिवास खळे) अभंग विलक्षण लोकप्रिय झाले. त्यांनी गायलेली हिंदी भजने (जो भजे हरि को सदा) व कन्नड भजनेही (भाग्यदा लक्ष्मी) अत्यंत लोकप्रिय ठरली. लता मंगेशकर यांसह त्यांचे गायन असणारी, श्रीनिवास खळे यांचे संगीत असणारी ‘राम श्याम गुण गान’ ही ध्वनिफीतही अतिशय गाजली.

आरंभीच्या काळात नाट्यगीतांवाचून भीमसेन जोशींची मैफल पूर्ण होत नसे. बालगंधर्व, मास्तर कृष्णराव व सवाई गंधर्व यांच्या नाट्यसंगीताच्या धाटणीचे रंजक मिश्रण करून त्यांनी नाट्यपदे सादर केली. नाट्यसंगीताची ‘रंगवाणी’ ही विशेष मैफलही त्यांनी १९९९ साली सादर केली.

‘परंपरेच्या चौकटीत राहून अत्युच्च शिखर गाठणारा एक कलाकार’ अशी भीमसेन जोशींची प्रतिमा झाली असली तरी ते एक सर्जक कलाकारही होते. त्यांनी निर्माण केलेले नवीन राग व बंदिशी ही बाब स्पष्ट करतात. ‘मारवाश्री’ हे मारवा व श्री या रागांचे मिश्रण (सब जगत के गुणियन), ‘कलाश्री’ हे कलावती व गावती या रागांचे मिश्रण (धन धन मंगल व धन धन भाग सुहाग या दोन बंदिशी), ‘ललितभटियार’ हे ललित व भटियारचे मिश्रण (ओ करतार), ‘हिंदोलिता’ हे हिंडोल व ललितचे मिश्रण (ए री मैं आज शुभमंगल) असे मिश्रराग त्यांनी निर्माण केले.

त्यांनी १९६८ साली गोपालकृष्ण भोबे यांच्या ‘धन्य ते गायनी कळा’ या नाटकास संगीत दिले होते. या नाटकासाठी त्यांनी प्रामुख्याने शुद्ध केदार, तोडी, बसंत, मुलतानी, पटदीप व स्वनिर्मित राग ललितभटियार व कलाश्री यांतील बंदिशींचा वापर केला. या नाटकातील ‘दान करी रे’ (बागेश्री), ‘हे करुणाकरा ईश्वरा’ (मारवा) व ‘सांजवात मम गात भैरवी’ (भैरवी) ही नाट्यगीते गाजली.

भीमसेन जोशी यांनी अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यांच्या आवाजातील रागसंगीतातील बंदिशींचे गायन मुख्यतः चित्रपटांसाठी वापरले गेले. सुधीर फडके यांनी ‘सुवासिनी’ चित्रपटासाठी भीमसेन जोशी व ललिता फडके यांच्याकडून तोडी रागातील ‘आज मोरे मन लागो’ ही बंदिश गाऊन घेतली. ‘इंद्रायणी काठी’ (गुळाचा गणपती; संगीतकार पु.ल. देशपांडे, १९५३), ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ (स्वयंवर झाले सीतेचे; संगीतकार वसंत देसाई, १९६४), ‘टाळ बोले चिपळीला’ (भोळी- भाबडी; संगीतकार राम कदम, १९७३), ‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट’ (देवकीनंदन गोपाला; संगीतकार राम कदम, १९७७) ही भीमसेन जोशींनी गायलेली मराठी चित्रपटगीते विशेष गाजली. ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ (१९५५), ‘पतिव्रता’ (१९५९), ‘भैरवी’ (१९६०), ‘सुवासिनी’ (१९६१), ‘क्षण आला भाग्याचा’ (१९६२), ‘शेरास सव्वाशेर’ (१९६६), ‘संत तुलसीदास’ (१९७२), ‘राजा शिवछत्रपती’ (१९७४), ‘पंढरीची वारी’ (१९८८),  ‘रेशीमगाठी’ (१९८८) या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.

त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गायलेली ‘केतकी गुलाब जूही’ (मन्ना डे यांच्यासह; ‘बसंत बहार’; संगीतकार शंकर जयकिशन, १९५६), ‘ठुमक ठुमक पग, रघुवर तुमको’ (अनकही; संगीतकार जयदेव, १९८५) ही गीतेही संस्मरणीय आहेत. ‘अनकही’तील गाण्यांसाठी १९८५ साली नॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना ‘सर्वोत्तम पार्श्वगायक’ पुरस्कार देण्यात आला होता. याशिवाय कन्नड (संध्याराग, १९६६), बंगाली (तानसेन, १९५८) व इंग्रजी (बिरबल माय ब्रदर, १९७३) या चित्रपटांसाठीही त्यांनी गायन केले.

आकाशवाणीसाठी त्यांनी रागसंगीताखेरीजही भक्तिगीते, नाट्यगीते, भावगीते या प्रकारांसाठी विपुल गायन केले. ‘सखी मंद झाल्या तारका’ हे भावगीत प्रथम त्यांच्याच आवाजात पुणे आकाशवाणीसाठी ध्वनिमुद्रित करण्यात आले होते. दूरदर्शनसाठी राष्ट्रीय एकात्मता योजनेसाठी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ व ‘देस राग’ या अनुबोधपटांसाठीही त्यांनी गायन केले व पडद्यावरही त्यांचे दर्शन घडले. ह.वि.दात्ये यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सूर्यनमस्कार’ संगीतरचनेसाठीही त्यांनी श्लोकगायन केले होते.

भीमसेन जोशींना १९५४ साली पुण्यातील रामेश्वर मंदिराच्या ब्रह्मवृंदाकडून ‘पंडित’ ही पदवी प्रदान करण्यात आली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाने त्यांस १९६४ साली ‘गायनाचार्य’ व १९८२ साली ‘महामहोपाध्याय’ या पदव्या दिल्या. भारत सरकारने ‘पद्मश्री’ (१९७२), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९८७), ‘पद्मभूषण’ (१९८९) व सर्वोच्च असा नागरी सन्मान ‘भारतरत्न’ (२००८) देऊन त्यांचा गौरव केला. ‘कर्नाटक संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९७२), ‘महाराष्ट्र गौरव’ (महाराष्ट्र शासन, १९९०) हेही सरकारी पुरस्कार त्यांना मिळाले. ‘संगीतरत्न’ (राघवेंद्रस्वामी), ‘स्वरभास्कर’ (शंकराचार्य), ‘संगीताचार्य’ (जयपूर गांधर्व विद्यालय), ‘डी.लिट.’ (गुलबर्गा विद्यापीठ १९८६, पुणे विद्यापीठ १९९१, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ १९९४), ‘तानसेन’ पुरस्कार (१९९१), ‘दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार (१९९२), ‘देशिकोत्तम’ (विश्वभारती, १९९३), ‘पुण्यभूषण’, इ. अनेक पुरस्कार व पदव्या त्यांना मिळाल्या.

भीमसेन जोशी यांच्या काही प्रमुख शिष्यांत श्रीकांत देशपांडे, रामकृष्ण पटवर्धन, माधव गुडी, श्रीपती पाडीगार, उपेंद्र भट, आनंद भाटे, राजेंद्र कांदळगावकर, राजेंद्र राठोड, इ. नावे नमूद करता येतील. श्रीनिवास जोशी व आनंद जोशी हे पुत्रही त्यांचा गायन वारसा चालवत आहेत. राशीद खान, व्यंकटेशकुमार, जयतीर्थ मेउंडी, इ. अनेक ख्यातनाम गायकांवर भीमसेन जोशींच्या गायकीची स्पष्ट छाप दिसते.

भीमसेन जोशींचा प्रथम विवाह १९४४ साली नात्यातल्याच सुनंदा कट्टी यांच्याशी झाला. त्यांनी १९५१ साली वत्सलाबाई मुधोळकर यांच्याशी द्वितीय विवाह केला. द्वितीय पत्नी वत्सला या उ.शब्बू खाँकडे गायन शिकलेल्या होत्या. भीमसेन जोशींना त्यांनी कौटुंबिक व सांगीतिकही साथ भक्कमपणे दिली. ते १९५२ पासून पुण्यात स्थायिक झाले.

पुणे विद्यापीठात गुरुकुल पद्धतीने संगीत शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘ललित कला केंद्रा’च्या स्थापनेपासून भीमसेन जोशींचा त्यात सक्रिय सहभाग होता. तिथल्या संगीतविषयक शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी ‘भीमसेन जोशी अध्यासना’ची स्थापना २२ फेब्रुवारी १९९९ रोजी झाली. भीमसेन जोशींवर मराठी, कन्नड, बंगाली, हिंदी व इंग्रजी अशा अनेक भाषांत विपुल लेखन झाले आहे. गुलजार, जेम्स बेवरिज या दिग्दर्शकांनी त्यांच्या सांगीतिक आयुष्यावर लघुपटांची निर्मिती केली. भीमसेन जोशींची व्यक्तिचित्रे अनेक कलाकारांनी रेखाटली. शिल्पेही निर्माण केली. वयाच्या ८९ व्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात फेब्रुवारी २०११ मध्ये पुण्यात ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन संकुल’ निर्माण करण्यात आले.

चैतन्य कुंटे

जोशी, भीमसेन गुरुराज