जोशी, नीळकंठ पुरुषोत्तम
नीळकंठ पुरुषोत्तम जोशी यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील पुरुषोत्तम व्यवसायाने डॉक्टर होते. आईचे नाव राधाबाई होते. हे कुुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे-मुरुड येथले.
नीळकंठ जोशी यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयात एम.ए.ची पदवी इ.स. १९४५ मध्ये प्राप्त केली. १९५६ मध्ये प्राच्यविद्या पंडित वासुदेव शरण अग्रवाल यांच्याकडे पीएच.डी. (हिंदी साहित्य संमेलनाची विशारद) ही पदवीही प्राप्त केली.
आधी १९४६ मध्ये वस्तुपालक म्हणून त्यांनी लखनौच्या शासकीय वस्तुसंग्रहालयात व नंतर अधिव्याख्याता म्हणून बनारस येथील शासकीय संस्कृत महाविद्यालयात कार्य केले.
१९६३ मध्ये मथुरा येथील शासकीय संग्रहालयात अभिरक्षक म्हणून कामास सुरुवात करून त्यांनी चार वर्षे ते काम केले. १९६७ ते सेवानिवृत्त होईपर्यंत लखनौ येथील वस्तुसंग्रहालयाच्या संचालकपदी राहिले. या दोन्ही वस्तुसंग्रहालयातल्या असंख्य प्राचीन देवप्रतिमांनी डॉ. नी.पु. जोशींना भारावून टाकले. निवृत्तीनंतर कुठलेही पद न स्वीकारता नी.पु., देवतांच्या सहवासात रमले. ते त्यातच संशोधन, लिखाण, भाषण करीत असत.
मूर्तिशास्त्रावरील डॉ. जोशींचा अधिकार लक्षात घेऊन महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने भारतीय मूर्तिशास्त्रावरील ग्रंथ सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. या ग्रंथाद्वारे असंख्य मंडळींना, संशोधक विद्यार्थ्यांना मूर्तींच्या अभ्यासाचे अनेक आयाम कळले. डॉ. जोशींच्या संस्कृत भाषेच्या प्रभुत्वामुळे वेद वाङ्मय, पुराणे इत्यादी ग्रंथांतील माहितीद्वारे हे शास्त्र अधिक समृद्ध करता आले आणि त्यांना मूलभूत संशोधनाचा दर्जाही प्राप्त झाला.
मथुरा शिल्पकला, गांधार शिल्पकला या विषयांवर त्यांचा अधिकार आहे. भारतीय मूर्तिकला, पार्वती, बलराम, प्राचीन उत्तारापथ इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहे. मुंबई येथील मुक्ताबोध इंडॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, गणेशपुरी याचे ते संस्थापक सदस्य आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून वाराणसी येथील प्राचीन भारतीय संस्कृती संबंधात कार्य करणार्या ज्ञानप्रवाह या नामांकित संस्थेशी त्यांचा ‘आचार्य’ म्हणून संबंध होता. . त्या संस्थेतर्फे शिल्पसहस्रदल या योजनेअंतर्गत तीन खंडांपैकी दोन खंड त्यांनी प्रकाशित केले असून मूर्तिशास्त्रावरील हे अभूतपूर्व ग्रंथ ठरावेत.
डॉ. जोशी हे कीर्तनकार असून त्या माध्यमातूनही ते भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत असत. डॉ. जोशी हे वयाच्या ९२ वर्षापर्यंत उत्साहाने संशोधनकार्य करीत असत.