Skip to main content
x

जोशी, प्रल्हाद नरहर

    प्रल्हाद नरहर जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खरशी येथे झाला. त्यांचे वडील नरहरशास्त्री हे उत्तम प्रवचनकार व संतवाङ्मयाचे अभ्यासक होते. घरात धार्मिक, आध्यात्मिक वातावरणाचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांच्या वाङ्मयाचे संस्कार त्यांच्यावर झाले. माहूरचे सत्कवी श्रीविष्णुदास हे नरहरशास्त्रींचे मामा होते. ‘विष्णुदासचरितामृत’ हा तीन खंडांतील ग्रंथ नरहरशास्त्रींनी लिहिला.

जोशी यांचे वाई व फलटण येथे माध्यमिक शिक्षण झाल्यावर पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.ए. पदवी घेतली. पुढे मुंबई विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली. हिंदी विषयाच्या अभ्यासातही आवड असल्याने बनारस विद्यापीठाची एम.ए. (हिंदी) पदवी संपादन केली. व्यासंगी अभ्यासक असल्याने ‘मराठी साहित्यातली मधुराभक्ती’ हा विषय घेऊन त्यांनी पीएच.डी.साठी संशोधन केले. सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक विषयांच्या अभ्यासातून त्यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. शिक्षणक्षेत्रात कामे करण्याची आवड असल्याने त्यांनी पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात १५ वर्षे अध्यापन व प्रशासन केले. त्यानंतर काही वर्षे सर परशुरामभाऊ महाविद्यालयात अध्यापन केले.

त्यांच्या संग्रही प्रचंड ग्रंथसंपदा होती. चिकित्सक अभ्यासू वृत्तीतून त्यांनी वाल्मीकी रामायणाचा संपूर्ण मराठी अनुवाद केला, श्रीगोंदवलेकर महाराज, विष्णुदास, स्वामी रामतीर्थ इत्यादींची चरित्रे लिहिली. अठरा पुराणांची आणि दहा उपपुराणांची मराठी रूपांतरे केली. त्यात १० कादंबर्‍या, १५ विज्ञानविषयक ग्रंथ त्यांनी लिहिले. ‘सर्वज्ञ’ (१९८१) ही महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांच्या चरित्रावर आधारित कादंबरी होय. ‘भारतीय संत’ भाग १, २ हे १९६४-१९६५ मध्ये प्रकाशित झाले. ‘प्रेरणा’ ग्रंथाचे ३ भाग १९७१मध्ये ‘थोरांच्या माता’ १९७२, ‘शरच्चंद्र चट्टोपाध्याय’ (१९५५) ‘शरदबाबू : व्यक्ती आणि कला’ (१९७६), ‘सार्थ तुकाराम गाथा’ भाग १-२ (१९६८), ‘श्रीदत्तात्रय ज्ञानकोश’ (१९०४), ‘नाथसंप्रदाय उदय व विस्तार’ (१९७७) या ग्रंथांचे लेखन केले.

प्र. न. जोशी यांनी संत साहित्याप्रमाणे आधुनिक मराठी वाङ्मयाविषयी लेखन केले. ‘मराठी वाङ्मयाचा विवेचक इतिहास’, ‘प्राचीन खंड (१९७२) तर ‘अर्वाचीन खंड’ (१९७९), ‘मराठी व्याकरण’ (१९६३), सुबोध भाषाशास्त्र (१९७३), या ग्रंथांशिवाय इतर अनेक ग्रंथ त्यांनी संपादित केले. संकीर्ण लेखनामध्ये ‘रंग आणि रेखा’ (१९६३) यासारखे वस्तुसंग्रहालयाची माहिती देणारे लेखन केले. भौगोलिक साहस कथा, नवलनगरी असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे घर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय म्हणून उपलब्ध करून दिले गेले आहे ते त्यांचे उचित स्मारकच आहे.

- डॉ. रजनी अपसिंगेकर

जोशी, प्रल्हाद नरहर