Skip to main content
x

जोशी, सिंधू परशुराम

संस्थापक, समाज सेविका

सिंधू परशुराम जोशी यांचा जन्म पुणे येथे झाला. वडील रामचंद्र विष्णू भुपटकर व्यवसायाने डॉक्टर होते. इ. स. १९२४ मध्ये त्यांचे अचानक निधन झाले. त्यावेळी सिंधूताई ८ वर्षाच्या तर भाऊ १३ वर्षांचा होता. आईप्रमाणे त्यांनाही गाण्याची आवड होती. गांधर्व महाविद्यालयाच्या त्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. तेेथे त्यांना विनायक बुवा पटवर्धनांचे  मार्गदर्शन मिळाले. गायनवादनाप्रमाणे त्यांना खेळ, समाजसेवेचीही आवड होती.

हुजूरपागेमध्ये शिक्षण चालू असतानाच त्या लक्ष्मी क्रीडा मंदिरात बॅडमिंटन, टेनिस, लाठी, जंबिया खेळल्या होत्या तर इंदिराबाई देवधरांबरोबर प्रौढ साक्षरता प्रसारासाठी झोपडपट्टीतही जात होत्या.

सिंधूताईंचा विवाह १६ जून १९३८ रोजी प्रा. वा. म. जोशी यांचा पुतण्या परशुराम जोशी यांच्याशी झाला. त्या मुंबईत राहायला गेल्या. जोशी खटाव मिलमध्ये कामास जात असत. त्यांना वारंवार परदेशी जावे लागे. असेच परदेश दौऱ्यावर गेले असताना ३१ ऑगस्ट १९५० रोजी विमान अपघातात कैरो येथे त्यांचे निधन झाले. सिंधूताईंचा जीवनप्रवास एका अवघड वळणावर येऊन ठेपला. त्यांना आपल्या दोन कन्या श्रीलेखा व मृणाल यांना शिकवून मोठे करायचे होते. मग त्या पुण्यात आल्या. वयाच्या पस्तिशीनंतर सायकल शिकल्या. जिज्ञासा क्लासमधून मॅट्रिक पूर्ण केले. प्रा. बाळ यांच्या सहकार्याने ठाकरसी विद्यापीठातून संगीतात बी.ए. पूर्ण केले. भावाच्या मार्गदर्शनाने हिंदी विषयामध्ये एम. ए. पदवी घेतली. ७ वर्षांच्या खडतर परिश्रमाने त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता सिद्ध केली.

त्यांना डॉ. शरच्चंद्र गोखले व गोविंदराव हर्षे यांच्या सारख्या उत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले आणि सेवावृत्तीला दिशा मिळाली. त्यांनी रिमांड होम आणि चाइल्ड गाइडन्स क्लिनिकमध्ये अल्प मानधनावर काम सुरू केले. १९५८ ते १९७४ दरम्यान त्यांनी अडीच हजारांवर मुले पाहिली. ही मुले हुशार होती पण परिस्थितीमुळे वाममार्गाकडे व गुन्हेगारीकडे वळली होती. त्यांना आपुलकी, योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य मिळाले तर ती सुधारतील हा सिंधूताईंचा दृढविश्‍वास होता.

या मुलांसाठी प्रथम जंगली महाराज रोडवर कामायनीची इमारत उभारली. पहिल्या चार महिन्यातील अनुभव प्रगतीस पोषक ठरला. १ बाई व ४ मुले चांगली सुधारली. सुधारगृह आणि चाइल्ड गाइडन्समधील मुलांचा त्यांना मोठा अनुभव होताच. मतिमंद मुले शाळेत येऊ लागली. त्यांच्या कर्तृत्वाला विकासाला क्षेत्र अपुरे पडू लागले. त्यांच्या मैत्रिणी लीलाताई भागवत व कुमुद नगरकर त्यांच्या मदतीस होत्या.

प्रथम टिळक विद्यापीठ वाड्यात, नंतर उद्योगपती नवलमल फिरोदिया यांच्या वाड्यात कामायनीचे स्थलांतर झाले. हुषार मुलांच्या हाताला आणि डोक्याला काम दिले पाहिजे म्हणजे ती वाममार्गाकडे वळणार नाहीत. हे ओळखून त्यांनी नवीन जागेत उद्योगधंद्याची कार्यशाळा काढली. उदबत्त्या करणेे, मेणबत्त्या करणे इ. हस्तव्यवसाय, डस्टर्स, नॅपकिन्स इ. शिवणकाम व हातमाग चालवून, रुमाल चादरी, साड्या असे विणकाम, तसेच छपाई, पुस्तक बांधणी इ. मुद्रण व्यवसायातील कामे त्यांनी सुरू केली. ही कामे मुलांकडून करून घेतली. कामात गुंतल्याने त्यांचे लक्ष केंद्रित झाले, कष्टाची किंमत कळली, आत्मविश्‍वास वाढला.

 याबरोबरच नृत्य, नाट्य, गायन, वादन यातील त्यांच्या कलागुणांची जोपासना करून विकास घडविला. संस्थेच्या कार्यास समाजाकडून मान्यता मिळाली. मदतीचे हजारो हात पुढे आले आहेत. सरकारदरबारी मान्यता मिळाली आहे. आकाशवाणी, दूरदर्शनने त्यांची दखल घेतली. कामायनीच्या कार्यास प्रसिद्धी दिली. चौकट राजाया सिनेमात येथील मुले दाखविली होती.

मुलांची प्रगती, शारीरिक हालचाली, बोलणे, कृतीतील कौशल्य पाहून आजमावली जाते. साधनांच्या साहाय्याने कृतीवर भर दिला जातो व प्रत्यक्ष व्यवहार - शिक्षण दिले जाते. अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन राज्यस्तरावरही केले जाते. काही स्पर्धांत मतिमंदांबरोबरच साधारण मुलांनाही सहभागी केले जाते. त्यामुळे त्यांना समाजात वावरण्याची संधी मिळून वागण्यात सुधारणा होते व आत्मविश्‍वास वाढतो.

१९७८ मध्ये निगडी येथे कामायनीची दुसरी शाखा सुरू झाली. तेथे आज १२५ मुले ८ शिक्षिका आहेत. कार्यशाळेत ५० मुले काम करतात. आता कामायनीने प्रशिक्षण महाविद्यालय काढले आहे. समाजसेवेचा हा १ वर्षाचा पदवीधारकांसाठी सरकारमान्य अभ्यासक्रम आहे. पालकांसाठीही तीन महिन्याचा कोर्स सुरू करण्यात आला आहे. हा सर्व अभ्यासक्रम स्वतः सिंधूताईंनी तयार केला आहे. सुरुवातीस समाजाकडून होणारी अवहेलना, आर्थिक अडचणी, पानशेत पूर यासारख्या संकटांना धैर्याने तोंड देऊन आज ही संस्था मानाने उभी आहे. आज सिंधूताईंची मुलगी मृणाल व जावई डॉ. प्रमोद धारवाडकर कामायनीत कार्यरत आहेत.

सिंधूताई मतिमंद माताम्हणून ओळखल्या जातात. निसर्गानं ज्यांना बुद्धीची कमतरता दिली आहे, अशा मुलांसाठी तुम्ही काम करता. तुमचं काम आमच्यापेक्षाही अवघड आहे,” असे म्हणून थोर समाजसेवक बाबा आमटे यांनीही त्यांचा गौरव केला.

- वि. ग. जोशी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].