Skip to main content
x

जोशी, शिवराम दत्तात्रेय

     शिवराम दत्तात्रेय जोशी यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रेय सदाशिव जोशी व आईचे नाव सगुणाबाई होते. बालपणीच पितृछत्र हरपल्यामुळे शिवरामला त्याचे चुलते प्रख्यात वैय्याकरणी महेश्वरशास्त्री जोशी यांच्याकडे पुण्यात, शिक्षणासाठी पाठविले. व्याकरणशास्त्राचे संपूर्ण अध्ययन महेश्वरशास्त्र्यांकडे केल्यानंतर पुढे शंकरशास्त्री मारूळकर यांच्याकडे त्यांचे विशेष सैद्धान्तिक अध्ययन झाले. ‘व्याकरणतीर्थ’, ‘व्याकरणोत्तम’, ‘व्याकरणचूडामणी’, ‘व्याकरणाचार्य’ अशा पारंपरिक व्याकरणाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन, १९४७ साली, वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी पूना संस्कृत कॉलेज या ठिकाणी ते प्राचार्य म्हणून रुजू झाले. १९५५ पर्यंत त्यांनी प्राचार्यपदाचा  कार्यभार सांभाळला. या काळात केवळ विद्यार्थ्यांनाच नाही, तर अन्यत्र शिक्षक, प्राध्यापक, संशोधक असणार्‍यांनाही ते संस्कृत व्याकरण शिकवीत असत. याच काळात व्याकरणशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी भारतात आलेल्या हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रा. इंगाल्स यांना व्याकरण शिकविण्याची जबाबदारी महामहोपाध्याय काशिनाथशास्त्री अभ्यंकर यांनी त्यांच्यावर सोपविली. यातूनच त्यांच्या आयुष्यास नवी दिशा मिळाली.

     जोशी यांची व्याकरणशास्त्रातील उपस्थिती आणि बुद्धी पाहून प्रा. इंगाल्स यांनी त्यांना बी.ए. करून हार्वर्डला पीएच.डी.साठी यायला सांगितले. प्रा. इंगाल्स यांच्या मार्गदर्शनाखाली ‘Kaundabhatta on the Meaning of Sanskrit Verbs’ या विषयावर हार्वर्ड विद्यापीठाची पीएच.डी. मिळवून १९६० साली ते पुण्याला परत आले. दरम्यानच्या काळात १९५८ साली कलावती भागवत (नंतरचे नाव सुलोचना) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर १९६०-१९६४ या काळात त्यांनी डेक्कन कॉलेज येथील ऐतिहासिक महाकोशाच्या प्रकल्पात काम केले. १९६४ मध्ये ते संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, पुणे विद्यापीठ येथे प्रपाठक म्हणून रुजू झाले. त्यानंतर विद्यापीठाच्याच संस्कृत प्राकृत विभागाचे प्रमुख, संस्कृत केंद्राचे संचालक अशा विविध पदांवर काम करून १९८७ मध्ये ते निवृत्त झाले. आपल्या कार्यकाळात संस्कृत भाषेच्या अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रसाराच्या दृष्टीने तिला लोकाभिमुख करणे यास त्यांनी निश्चित दिशा व गती दिली. निवृत्तीनंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमधील ऐतिहासिक महाकोशाच्या संपादकपदाची धुरा खांद्यावर घेतली.

     हार्वर्ड आणि नागोया (जपान) या ठिकाणी अतिथी प्राध्यापक म्हणून १९७१-७२ आणि १९७६-७७ असे एक - एक वर्ष डॉ. शि.द. जोशी यांनी अध्यापन व संशोधनपर मार्गदर्शन केले. त्याखेरीज भारतात आणि भारताबाहेरील अनेक विद्यापीठांत त्यांनी व्याकरणशास्त्रावर व्याख्याने दिली.

     व्याकरण महाभाष्यातील महत्त्वाच्या आह्मिकांचे बारा खंड आणि अष्टाध्यायीचे चौदा खंड संपादित करून (सहसंपादक : जे.ए.एफ. रूडबेर्गेन) शि.द. जोशी यांनी व्याकरणशास्त्राच्या अभ्यासकांना व संशोधकांना कायमचे आपले ऋणी केले आहे. मूळ ग्रंथाचा शब्दश: आणि तरीही सुबोध अनुवाद, त्यातील संज्ञा-संकल्पनांचे परिपूर्ण विवरण, त्याविषयीच्या सर्व मत-मतांचे समीक्षण, विस्तृत व साक्षेपी प्रस्तावना, विविध प्रकारच्या सूची यांमुळे महाभाष्य व अष्टाध्यायीच्या अभ्यासास हे ग्रंथ अतिशय महत्त्वाची मदत पुरवितात.

     ‘Kaundabhatta on the Meaning of Sanskrit Verbs’ ’ हा डॉ. शि.द. जोशी यांचा प्रबंध पुढे नागोया विद्यापीठाच्या ‘संभाषा’ या पत्रिकेमधून प्रकाशित झाला. (खंड : १४ (१९९४), १६ (१९९६) व १८ (१९९८)). ‘Sphotnirnay of Kaundabhatta’ या ग्रंथात डॉ. शि.द. जोशींनी स्फोट सिद्धान्ताचे सर्व अंगांनी समालोचन केलेले आहे. व्याकरणशास्त्राच्या परंपरेची प्रामाणिक आणि प्रगल्भ जाण, न्याय आणि मीमांसा या शास्त्रांचे परिशीलन, अर्वाचीन भाषाशास्त्राचा सखोल अभ्यास यांमुळे डॉ. शि.द. जोशी यांची पुस्तके म्हणजे प्रगाढ पाण्डित्याचे खरोखर अक्षररूप आहे. डॉ. शि.द. जोशी हे हाडाचे शिक्षक असल्यामुळे मुद्दे, उपमुद्दे यांची लहान -लहान परिच्छेदात विभागणी करतात. त्यामुळे ग्रंथ वाचत असताना त्यातील विषयाचे आणि आशयाचे आकलनही सहज होत जाते.

     ऐतिहासिक महाकोशाच्या तिसर्‍या, चौथ्या व पाचव्या अशा तीन खंडांचे (तिसरा व पाचवा सहयोगाने, सहावा स्वतंत्रपणे) डॉ. शि.द. जोशी यांनी केलेले संपादन त्यांच्या व्यापक व्यासंगाचे दर्शन घडविणारे आहे. याखेरीज विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पत्रिका / गौरवग्रंथ / स्मरणग्रंथ यांतून त्यांनी शंभरावर शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

     डॉ. शि.द. जोशी यांनी ‘संगीत शारदा’ आणि ‘हॅम्लेट’ या नाटकांचे अत्यंत सुगम संस्कृत अनुवाद केले, एवढेच नव्हे, तर त्यांचे रंगमंचीय प्रयोगही मोठ्या धाडसाने घडवून आणले.

     डॉ. शि.द. जोशी यांच्या संशोधनपर कार्याचे थोडक्यात सार असे आहे : १) पाणिनीची ‘अष्टाध्यायी’ ही एकाच वेळेस एकाच व्यक्तीने केलेली रचना नसून कमीत-कमी दोन टप्प्यांत तरी तिची रचना झाली असावी, त्यांपैकी तद्धिताचा भाग हा मागाहूनचा असावा. शैली आणि रचना-तंत्राची सुबकता हा निकष यामागे आहे. २) तद्धित प्रकरण हे व्याकरण आणि कोशशास्त्र यांचे मिश्रण आहे. ३) ‘असिद्ध अधिकार’ सोडल्यास अष्टाध्यायीतील सर्व सूत्रे एकमेकांस सिद्ध आहेत. म्हणजे ती एकमेकांचे कार्य गृहीत धरतात. ४) शब्दसिद्धीच्या प्रक्रियेत विविध पायर्‍या असतात. त्यांपैकी एखाद्या पायरीवर दोन सूत्रे एकाच वेळेस हक्क सांगू लागली किंवा प्राप्त झाली, तर त्यांपैकी कोणते एक निवडायचे किंवा त्याचा त्याग करायचा, याची मार्गदर्शक सूत्रे सांगितली आहेत. त्यांना ‘परिभाषा’ म्हणतात. डॉ. शि.द. जोश्यांनी परंपरेच्या चौकटीत राहूनच अशी काही नवीन मार्गदर्शक सूत्रे सांगितली आहेत, जी निर्विवादपणे लागू पडतात. ५) ‘काशिका’ या अष्टाध्यायीवरील व्याख्येत दोन वेगवेगळे विचारप्रवाह दिसून येतात. एक महाभाष्यास माहीत नसलेल्या तत्पूर्वीच्या परंपरेचा आणि दुसरा खुद्द महाभाष्यातीलच!

     डॉ. शि.द. जोशी यांची विद्वत्ता, संशोधनातील दृष्टी, भविष्यलक्ष्यी दृष्टी, प्रशासनिक चोखपणा, व्यवस्थापनातील औदार्य यांचा लाभ अनेक संस्थांना व समित्यांना मिळाला. ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्सचे ते अनेक वर्षे सचिव होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर व वैदिक संशोधन मंडळ या ठिकाणी विविध समित्या व अधिकार मंडळांवर डॉ. शि.द. जोशी यांनी काम केले.

     या त्यांच्या कार्याबद्दल डॉ. शि.द. जोशी यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले, त्यांपैकी काही : महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कार, राष्ट्रपतींकडून ‘राष्ट्रीय संस्कृत पंडित’ पुरस्कार तसेच, देवदेवेश्वर संस्थान, पर्वती यांच्याकडून ‘पेशवे’ पुरस्कार.

     मात्र, देशात आणि परदेशांतही व्याकरणाचे अध्ययन, अध्यापन व संशोधन करणारे, त्यांनी घडवलेले विद्यार्थी, हा त्यांना मिळालेला फार मोठा पुरस्कार म्हणायला हवा!

 — डॉ. भाग्यलता पाटसकर 

जोशी, शिवराम दत्तात्रेय