Skip to main content
x

जोशी, श्रीकृष्ण जनार्दन

     श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांचा जन्म पुणे येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. ‘१९३८ साली मराठी विषय घेऊन तिसर्‍या वर्गात बी.ए. झालो’ असा उल्लेख आपल्या ‘पुणेरी’ या पुस्तकात करून ते म्हणतात की, घराण्यातील पहिला पदवीधर मीच! नोकर्‍यांचा दुष्काळच होता. त्यांनी फुटकळ नोकर्‍या केल्या. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे पुण्याच्या आसपास निघालेल्या लष्करी डेपोकडे बेकारांची रीघ लागली. वानवडीच्या मिलिटरी अकाउन्ट्स ऑफिसमध्ये कारकून हुद्द्यावर जोशींना नोकरी लागली व ३२ वर्षांनी ते तिथूनच निवृत्त झाले. नोकरी लागण्यापूर्वी त्यांच्या अनेक कथा किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या.

श्री.म.वि.गोखले यांच्या सहकार्याने तीन भागांत प्रकाशित केलेल्या ‘ऐलमा पैलमा’च्या भूमिकेत जोशी लिहितात की, ‘आंतरराष्ट्रीय महिलावर्षाच्या निमित्तानं मराठी स्त्रीच्या जीवनावर प्रकाश पाडणारं पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली.’ १८६० ते १९६० या शंभर वर्षांच्या काळात सहा पिढ्या होऊन गेल्या असे गृहीत धरून मराठी स्त्रीच्या जीवनात कसे-कसे बदल होत गेले, याचा त्यांनी धांडोळा घेतला आहे. एकाच मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती हा शंभर वर्षांचा इतिहास लेखक द्वयाने गुंफला आहे.

जोशींच्या ‘पुणेरी’ या पुस्तकातील लेख नुसतेच ललित नसून त्यांमध्ये काही सामाजिक आणि ऐतिहासिक आशय आहे, असा उत्कट प्रत्यय वाचकाला येतो. ‘काळ’ या दैनिकात जोशी यांनी ‘किसन’ या टोपणनावाने ब्रिटीश सरकार, स्वातंत्र्योत्तर काँग्रेस सरकार, गांधीजी, जीना, चर्चिल वगैरेंवर टीकास्त्र चालवले होते. ‘चर्चिल मेडिकल कॉलेज’ हा लेख खूपच गाजला. त्या लेखाबद्दल सरकारने ‘काळ’कडून दोन हजार रुपयांचा जमीनही घेतला होता. लेखप्रकाशनाच्या बाबतीत ‘काळ’कर्ते मामा दाते यांनी टिळकांचा बाणा दाखवला. ‘किसन’ म्हणजे कोण, याचा पत्ता लागू दिला नाही. दाते तुरुंगात गेले. जोशींचा कारावास वाचला व नोकरीही शाबूत राहिली. श्री.पु.भागवत त्यांना म्हणाले, “तुमचे लेख फार चांगले असतात.” मोरारजी देसाईंनी दाते यांना सांगितले, “युवर किसन हॅज अ पॉयझनस पेन!”

‘मी पुण्याहून लिहितो की....’ ही जोशी यांची लेखमाला, महाराष्ट्र टाइम्समध्ये वर्षभर येत होती. जोशींच्या ‘आनंदीगोपाळ’ कादंबरीने चरित्रात्मक कादंबरीचा प्रवाह मराठीत आणला. गोपाळरावांच्या हटवादी स्वभावामुळे डॉक्टर होण्यासाठी परदेशी गेलेल्या कोवळ्या वयाच्या आनंदीबाईंची झालेली फरफट जोशींनी प्रवाही भाषेत चित्रित केली आहे. ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्या कादंबरीवर जोशींनी पुढे नाटकही लिहिले. काशीनाथ घाणेकरांच्या भूमिकेमुळे ते रंगभूमीवर चांगलेच गाजले. जोशींनी लिहिलेली ‘रघुनाथाची बखर’ (श्री.र.धों.कर्वे यांच्यावर लिहिलेली) ही कादंबरी चर्चेचा व टीकेचा विषय झाली.

श्री.ज.जोशींचे एकूण ३५ कथासंग्रह प्रकाशित झाले. ‘पांढरपेशांचे जग’ (१९४४), ‘सुलभा’ (१९५६), ‘मामाचा वाडा’ (१९६२), ‘ओलेता दिवस’ (१९६५), ‘अनुभव’ (१९७५) हे त्यांतील काही, वर उल्लेख केलेल्या दोन कादंबर्‍यांव्यतिरिक्त ‘धूमकेतू’ (१९७६), ‘काचपात्र’ (१९८५) अशा इतरही कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. मनोहर माळगावकर व आर.के.नारायण यांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद श्री.जं.नी केले. ललित लेखनात ‘पुणेरी’ (१९७८), ‘सूर्यापोटी’ (१९७१), ‘सुचलं तसं लिहिलं’, ‘जोशी पुराण’ इत्यादींचा समावेश होतो.

- वि. ग. जोशी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].