Skip to main content
x

झेंडे, गोविंद काशिनाथ

        हाराष्ट्रातील शेती व ऊस यासंबंधित कार्यक्षेत्रावर आपल्या संशोधन, व्यासंग व सर्वांगीण विद्वत्तेने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारे गोविंद काशिनाथ झेंडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजी येथे झाला. येवल्यात त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले व तेथेच त्यांच्यावर व राष्ट्र सेवा दलातून राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून १९४५मध्ये बी.एस्सी.(कृषी) पदवी द्वितीय वर्गात, वाडिया महाविद्यालयामधून १९४९मध्ये बी.एस्सी. पदवी (रसायनशास्त्र) प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी मृदाशास्त्र विषयात सूक्ष्म अन्नद्रव्ये यांविषयी विशेष संशोधन करून १९५३मध्ये संपादन केली. त्यांनी १९७४मध्ये म.फु.कृ.वि.तून ऊस विषयावर पीएच.डी. प्राप्त केली. त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात १९४५मध्ये व्याख्याता म्हणून कामाला सुरुवात करून पुढे साहाय्यक प्राध्यापक पदावर धारवाड, पुणे, धुळे, अकोला येथील महाविद्यालयात १८ वर्षे अध्यापन केले. पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रात मृदाशास्त्र व जीवरसायनशास्त्रविषयक संशोधक पदावर १९५६ ते १९६३पर्यंत काम केल्याने त्यांचा ऊस पिकाचा तपशीलवार अभ्यास झाला व १९७० ते १९७२ तेथेच ऊस विशेषज्ञ पदावर काम केल्याने त्या अभ्यासाला पक्वता आली. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषि-रसायनशास्त्रज्ञ म्हणून दोन वर्षे, मृदाशास्त्र विभागप्रमुख म्हणून आठ वर्षे काम केल्यामुळे या विषयातील अध्यापन व संशोधन मार्गदर्शन करून दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. सहयोगी अधिष्ठाता पदाचा कार्यभार सांभाळून १९८०मध्ये ते विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी ३१ विद्यार्थ्यांना एम.एस्सी. (कृषी) साठी व ४ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. त्यांचे ऊस विषयावर ९७, मृदाशास्त्र व पिकांचे पोषण विषयावर १०० संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. मराठीतून ८५ लेख प्रसिद्ध केले. सेंद्रिय शेती, जमीन नियोजन, पीक उत्पादन, जमिनीची सुपीकता, एकात्मिक अन्न पुरवठा, सूक्ष्म अन्नद्रव्ये इ. विषयांवर त्यांची एकूण १५ पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये या विषयाच्या महाराष्ट्रातील संशोधनाची सुरुवात केली. क्षारयुक्त व चोपण जमिनीची सुधारणा हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय होता. ऊस शेती या विषयावर त्यांचा अधिकार सर्वमान्य होता. त्यामुळे बहुतेक सर्व साखर कारखान्यांनी सभासद शेतकर्‍यांसाठी त्यांची व्याख्याने आयोजित केली. त्यांनी अशी २५० व्याख्याने दिली. त्यांची आकाशवाणीवरून २५ भाषणे झाली आहेत.

        भारतीय कृषि-रसायनशास्त्रज्ञ संस्था, अलाहाबाद या संस्थेचे ते २ वर्षे अध्यक्ष व सदस्य होते. संस्थेने त्यांना ‘कृषि-रसायन रत्न’ हा पुरस्कार दिला. त्यांना संशोधनासाठी निरनिराळी २२ बक्षिसे व पुरस्कार मिळाले. त्यांपैकी इंडियन मर्चंट चेंबरचा टाटा एंडाऊमेंट पुरस्कार (१९९३), रावबहादूर शेंबेकर पुरस्कार (१९९५), वसंतराव नाईक स्मृती सुवर्णपदक (२००१) हे काही महत्त्वाचे पुरस्कार होत. एम.एन. डे स्मृतिव्याख्यान (१९८२) व डॉ. आर.व्ही. ताम्हाणे स्मृतिव्याख्यान, भुवनेश्‍वर (१९८५) ही काही होत. ऊस लागवड सल्ल्यासाठी त्यांना मलेशिया, केनिया, इथिओपिया अशा देशांत निमंत्रित केले होते. तसेच आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेत शोधनिबंध वाचण्यासाठी ते अमेरिकेत लुइसियाना येथे गेले होते. सेवानिवृत्तीनंतर जवळजवळ २५ वर्षे ते लेखन, भाषण दौरे, सल्ला देण्याच्या कामात सतत व्यस्त असत. ते शास्त्र, संशोधन, व्यासंग, शेतकरीहित यासाठी एक समर्पित जीवन जगले.

        - डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

झेंडे, गोविंद काशिनाथ