काळे, बाबूराव जंगलूजी
शंकर देवराम काळे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे वडील स्वत: प्रयोगशील शेतकरी होते. त्या काळी फारसे तंत्रज्ञान उपलब्ध नसताना त्यांनी शेतात पाच विहिरी खणल्या होत्या.
शंकर काळे वयाच्या आठव्या वर्षापासून शिक्षणासाठी घराबाहेर राहिले. ते कोपरगाव येथून 1934 मध्ये व्ह. फा. तर 1939 मध्ये नाशिक येथून शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर पुणे अभियांत्रिकीमहाविद्यालयात प्रवेश घेतला. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा असल्याने साहजिकच काळे यांच्यावरही त्या वातावरणाचा प्रभाव पडला. परिणामत: प्रथम वर्षात उत्तीर्ण न झाल्यामुळे त्यांनी फर्गसन महाविद्यालयात बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. पुढे त्यांनी बी.एस्सी. (अभियांत्रिकी) व स्थापत्यशास्त्रातील पदवी अशा दोन्ही पदव्या 1947 मध्ये एकदमच प्राप्त केल्या. त्यावेळी संपूर्ण कोपरगाव तालुक्यात ते सर्वात जास्त शिक्षित व्यक्ती होते.
सुरुवातीला काळे यांनी पुण्यात नोकरी केली. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या इमारतीचे बांधकाम हे काही काळ त्यांच्या देखरेखीखाली झाले आहे. नंतर वडिलांच्या इच्छेनुसार नोकरी सोडून ते शेती व समाजसेवेकडे वळले. त्यांनी दोन वर्षे कोपरगाव येथे शेती केली. त्याच दरम्यान 1948 मध्ये त्यांचा विवाह सुशीला जगताप यांच्याशी झाला. समाजापुढे आदर्श ठेवत, हुंडा न घेता व जेवणावळी न घालता अत्यंत साधेपणाने हा विवाह संपन्न झाला.
काळे यांनी भाऊसाहेब हिरे यांच्या आग्रहावरून नाशिक येथे जिल्हा लोकल बोर्डात नोकरी केली; पण लवकरच राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1952 मध्ये शेतकरी कामगार पक्षांकडून निवडणूक लढवली. पण त्यात ते अपयशी ठरले.
काळे यांचा खरा पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा होता. त्यांनी 1956 मध्ये ग.र. औताडे यांच्यासोबत ‘कोपरगाव सहकारी कारखान्या’ची स्थापना केली. प्रयोगशील शेतकरी असलेले काळे कुशल संघटक व उद्योजकाच्या भूमिकेतून कोपरगाव सहकारी कारखान्याचा कारभार सांभाळू लागले. त्यांच्या प्रयत्नातून हा कारखाना आशियातील दुसर्या क्रमांकाचा सहकारी साखर कारखाना ठरला. काळे यांनी 1957 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून व मदतीने ‘जिल्हा सहकारी बँक’ ची स्थापना केली.
काळे यांनी 1960 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी 1962 ते 1972 दहा वर्षे अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. अनेक विकास कामे केली. या कामात मुख्य भर हा शिक्षण व जलसंवर्धन या विषयांवर होता. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा उभारल्या. तसेच शेतीसाठी बारमाही पाणी, जादा जमिनीचे वाटप, भूमिहीनांना घरे यांसारख्या योजनाही राबविल्या.
काळे 1972 मध्ये पारनेरमधून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. नंतर ते 1978 मध्ये पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते काँग्रेस सोडून शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये शिक्षण व सहकार राज्यमंत्री म्हणून सामील झाले.
काळे यांनी 1976 मध्ये कोपरगाव सहकारी कारखान्याच्या जोडीला अनेक कृषिपूरक उद्योग सुरू केले. त्याचबरोबर कारखान्याच्या आवारातच आसवनी प्रकल्प (डिस्टीलरी) सुरू केला व उसाच्या बगॅसपासून क्रॉफ्ट पेपर हा कागद निर्मिती प्रकल्प उभारला. तेथे रोज 25 मेट्रिक टन कागदाचे उत्पादन होऊ लागले. या प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके मिळाली. त्यांनी प्रदूषण टाळण्यासाठी बायोगॅस निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली. त्याचप्रमाणे बायोगॅस प्लँटमधून शेवटच्या टप्प्यात बाहेर पडणारा स्पेंटवॉश प्रेसमडमध्ये मिसळून कम्पोस्ट खत बनविण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला.
परिसरातील अनेकविध घटकांना लाभ मिळावा म्हणून काळे यांनी ‘गोदावरी खोरे’ आणि ‘गौतम ट्रान्सपोर्ट’ या उद्योगांची स्थापना केली. त्याद्वारे अनेकांना रोजगार व उद्योगाची संधी मिळाली. त्यांनी 1976 मध्येच ‘गौतम सहकारी बँक’ ची स्थापना केली. आतापर्यंत या बँकेच्या नऊ शाखा कार्यरत आहेत. त्यांनी शेतकर्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबविले. ग्रामीण क्षेत्रात कृषिपूरक जोड व कृषिमाल प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना त्यांनी आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला आणि कुक्कुटपालन, गौतम पशुखाद्य, गौतम मिल्क हे सहकारी उद्योग सुरू केले.
काळे यांनी शेतीविकास व शेतीला पाणीपुरवठा यांकडे सातत्याने लक्ष पुरविले. त्यांनी जलसंवर्धन व हक्काच्या पाणी प्रश्नासाठी प्रसंगी आंदोलन, रास्ता रोको, पाणी परिषद यांसारखे मार्ग अवलंबिले. शासनाच्या मदतीने गोदावरी नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यास पुढाकार घेतला. त्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा व गावतळ्यांसारखे उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला. पुढे अती पाणी वापरामुळे इतर साखर कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस शेतीची नासाडी झाली. जमिनीतील क्षाराचे प्रमाण वाढले. पण कोपरगाव सहकारी कारखान्यांच्या क्षेत्रातील जमिनीत जिप्सम भरून क्षारीकरण कमी करायचा प्रयत्न केला गेला. शेतकर्यांना सुधारित बेणं, जंतुनाशके देण्यात आली व ठिबकसिंचन, तुषारसिंचन सुविधा करून देण्यात आल्या.
काळे यांच्यावर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू केले. गौतम शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या अंतर्गत गौतम पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. त्यांनी आई राधाबाई यांच्या नावाने कोळपेवाडीत कन्याशाळा; तर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नगर येथे राधाबाई काळे महिला महाविद्यालय सुरू केले.
काळे 1991 मध्ये काँग्रेस पक्षातर्फे नगर येथून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले. खासदारकीच्या काळात त्यांनी राष्ट्रीय सहकारी विकास परिषद, नवी दिल्ली; तसेच ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन, राष्ट्रीय साखर संघाचे संचालक अशा विविध पदांवर काम केले.
काळे यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भरीव कार्य उभारले. गाव वसविले, उद्योगधंदे व रोजगार निर्मिती केली, शेतीत सुधारणा केली, दुष्काळावर मात करत जलसंवर्धन केले, शाळा काढल्या, बँकेची उभारणी केली. म्हणूनच काळे यांचे आयुष्य हे एक प्रकारे अहमदनगर जिल्ह्याचा गेल्या साठ वर्षांचा इतिहास ठरतो.
- आशा बापट