Skip to main content
x

काळे, शरद गंगाधर

           रद गंगाधर काळे यांचा जन्म पुण्यात झाला. नूतन मराठी विद्यालयात शालेय शिक्षण, तर सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी गणित विषयात पदवी घेतली. जागोजागी असणाऱ्या इतिहास व स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणा, अत्यंत सुरक्षित कौटुंबिक वातावरण, समाजाभिमुख संस्कार आणि त्या काळात असलेल्या शिकवणी वर्गातील शिक्षकांकडून मिळणारे जीवनाचे धडे  यांतून काळे यांचे बालपण आकार घेत गेले. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची होती, अन् त्यामुळेच त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. त्यांना अर्थशास्त्राची आणि गणिताची गोडी होती, पण विषयांची ही जोडी तेव्हा नव्हती. त्याच वेळी मनामध्ये फळ्याशिवाय गणिते’ शिकवणाऱ्या पं. गो.म. जोशी यांच्याबद्दल  प्रचंड औत्सुक्य निर्माण होत गेल्याने त्यांनी गणित हा विषय निवडला. भविष्यातही शरद काळे यांच्यावर या निर्णयाचा प्रचंड प्रभाव असल्याचेजाणवते.

गो.मं.कडून गणिताबरोबरच जीवनातले प्रश्नही स्वत:चे स्वत: सोडवायचे, चौकटीबाह्य विचार करायचा आणि पाठांतरापेक्षा ज्ञान आत्मसात करण्याचे बाळकडू त्यांना मिळाले. प्रशासकीय सेवेत याच गुणांचा त्यांना सर्वाधिक फायदा झाला. शरदरावांनी यथावकाश पुणे विद्यापीठातून गणितामधून एम.ए. पूर्ण केले, तेसुद्धा कुलगुरूंच्या सुवर्णपदकासह! हे वर्ष होते १९६२.

पुन्हा एकदा गो.म. जोशींचेच मार्गदर्शन आणि आपल्या आईची इच्छा म्हणून त्यांनी भारतीय सनदी सेवेची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. १९६३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत, महाराष्ट्र केडरमध्ये ते दाखल झाले. आपल्या छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. या दरम्यानच अमेरिकेच्या ईस्ट-वेस्ट सेंटरकडून मिळालेल्या पाठ्यवृत्तीवर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ हवाई येथून एम.बी.ए. पूर्ण केले. अर्थशास्त्राची आवड, जगातील अर्थव्यवस्थेची बदलती वाटचाल, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे भविष्यात येऊ पाहणारी व्यवस्थापकीय गुणवत्तेची आव्हाने यांची दूरदृष्टीने जाणीव ठेवूनच काळे यांनी १९७२ मध्ये एम.बी.ए. पूर्ण केले.

१९६४ - ६५ मध्ये पुण्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम बघितले. त्यानंतर त्यांनी फलटणचे प्रांताधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या वित्तविभागाचे उपसचिव, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. अवघ्या पाच वर्षांच्या सेवेतील चमक, लोकाभिमुख आणि कार्यक्षम प्रशासन चालविण्याची पद्धती आणि सर्जनशीलता या गुणांमुळे वयाच्या तिसाव्या वर्षी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. चीनचे युद्ध, १९६५, १९७१ या वर्षांमधील भारत-पाक युद्धे अशा पार्श्वभूमीवर शरद काळे यांनी वित्त विभागामध्ये काम केले.

पंचवार्षिक योजना, ‘प्लॅन्ड हॉलिडेया काळात त्यांनी वित्तक्षेत्राशी संबंधित महत्त्वाची पदे भूषविली. १९७२ ते १९७४ या काळात महाराष्ट्र राज्याच्या योजना विभागाचे उपसचिव म्हणून, त्यानंतर तत्कालीन केंद्रीय अर्थ आणि परराष्ट्र  व्यवहारमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह प्रतिनियुक्तीवर दिल्लीत वित्तयोजना विभागाचे संचालक म्हणून शरद काळे कार्यरत होते. हा आणीबाणीनंतरचा काळ होता.

उत्तर भारतातील अनेक राज्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ओव्हरड्राफ्टघेत होती, त्याच वेळी दुसरीकडे समाजवादी प्रभावातून करपद्धती रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे वित्तीय मागण्यांवरून केंद्र-राज्य संबंध नाजूकझाले होते. योजनांवर काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना या काळात प्रचंड तणावाखाली काम करावे लागत होते.

राज्यसरकारकडून आलेल्या मागण्या, त्यांची व्यवहार्यता तपासणे, आर्थिक आणीबाणीची वारंवार होणारी मागणी, मध्यप्रदेश सरकारने प्रवेश कर आकारण्यासंदर्भात विधिमंडळामध्ये मंजूर केलेले विधेयक, ओव्हरड्राफ्टवर उपाय अशा अनेक प्रश्नांवर काळे एकाच वेळी लक्ष देत होते. त्यांचे वरिष्ठ आय.एच. कौल यांच्या मदतीने काळे यांनी रेग्युलेशन ऑफ ओव्हरड्राफ्टहा कायदा तयार केला आणि त्यामुळेच भारताचे उपपंतप्रधान व गृहमंत्री  यशवंतराव चव्हाण यांचे विशेष  सहकारी म्हणून  काळे यांना बढती मिळाली. या सर्व काळात भारतीय घटनेच्या आशयाचा अनेकदा प्रश्न उपस्थित झाला आणि शरद काळे यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘भारतीय संविधान सभे'च्या पार्लमेंटरी डिबेटचा अक्षरश: मुळापासून अभ्यास करावा लागला, पण त्यामुळे निर्णय घेताना परिपक्वता येत गेली.

सुमारे सात वर्षे केंद्रात काम केल्यानंतर १९८१ ते ८३ या काळात शरद काळे महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी रुजू झाले. तेथील उत्कृष्ट कामामुळे १९८३मध्ये त्यांची सहकार सचिवम्हणून नियुक्ती करण्यात आली आणि महाराष्ट्राच्या सहकारविषयक प्रश्नांवर उपाययोजना करणारे सुसूत्रीकरण करणारे निर्णय पाहून १९८३ ते १९८६ या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.

भारतीय प्रशासकीय सेवेतील या योगदानामुळे शरद काळे यांच्या आयुष्यात आणखी एक मोलाची संधी १९८९मध्ये आली. जगभरातील उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकाऱ्यांसह एकत्र अभ्यास करण्याची आणि शोधनिबंध सादर करण्यासाठी हार्वर्ड  विद्यापीठ या अमेरिकेमधील अग्रगण्य विद्यापीठाच्या  पाठ्यवृत्तीसाठी काळे यांची निवड झाली.

बर्लिनची भिंत कोसळणे, सोव्हिएत संघराज्याचे विभाजन, चीनच्या तिआनामेन चौकातील हत्याकांड अशा नाट्यमय घटनांनी भरलेल्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह झालेला अभ्यास आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉइंटअसल्याचे शरद काळे आजही आवर्जून नमूद करतात.

या वर्षभरामध्ये आग्नेय आशियातील राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास, स्टीफन गोल्ड या अग्रगण्य अभ्यासकाकडून पॅलेंटोलॉजीअभ्यास, कॅनडा, युरोपियन युनियन अशा देशांना भेटीचा योग, भारतातील  जेमिनी ऋषींनी लिहिलेल्या मीमांसाया ग्रंथाचे जर्मन शिक्षकांकडून विवेचन असा विविधांगी अभ्यास वयाच्या पन्नासाव्या वर्षी काळे यांनी उत्साहाने आणि परिपूर्णपणे केला. न्यायशास्त्र, लष्करी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ अशा अनेक व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांनी भारतातील आजारी उद्योगअर्थात सिक इंडस्ट्रीजवर आपला शोधनिबंध सादर केला.

ऐन जागतिकीकरणात ते महाराष्ट्राच्या योजना विभागाचे सचिव म्हणून १९९१ मध्ये रुजू झाले. या काळात खासगीकरणाची दिशा आणि धोरण ठरविणारे खासगी क्षेत्राचे सहकारी राजपत्र’ (जी.आर.) त्यांनी तयार केले. यानंतरही १९९१ ते १९९५ या काळात मुंबई महापालिकेचे आयुक्त, १९९५ ते १९९६ या काळात पुन्हा एकदा ते महाराष्ट्राच्या योजना विभागाचे सचिव झाले. नंतर १९९६ ते १९९७ मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, १९९९ ते २००१ या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या नोकरभरती विभागाचे अध्यक्ष, आणि सर्वांत शेवटी लोकायुक्त अशी विविध पदे त्यांनी भूषविली. १९९८ पासून मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सरचिटणीस या पदावर ते आजही सक्रिय आहेत. या प्रतिष्ठानातर्फे विविध जनोपयोगी प्रकल्प राबवण्यात, व्याख्यानांचे आयोजन करण्यात ते पुढाकार घेतात.

आपल्या प्रशासकीय गुणांबरोबरच शास्त्रीय संगीताविषयीचे प्रेम महाविद्यालयीन जीवनात त्यांनी तबला शिकून टिकवून ठेवले. आईकडून आलेला बॅडमिंटनचा वारसा त्यांनी जपला. क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या खेळांत त्यांनी शाळेचे आणि महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले होतेे.

- स्वरूप पंडित

काळे, शरद गंगाधर