Skip to main content
x

कामत, रामचंद्र पांडुरंग

            लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्टमध्ये उच्चशिक्षण घेऊन रॉयल अकॅडमीच्या प्रदर्शनात अत्यंत प्रतिष्ठेचे असे सुवर्णपदक मिळविणारे भारतातील एकमेव शिल्पकार  रामचंद्र पांडुरंग कामत यांचा जन्म गोव्यातील मडकई येथे झाला. लहान वयातच त्यांना देवदेवतांच्या मातीच्या मूर्ती करण्याचा छंद लागला. त्याची तीव्रता एवढी वाढली, की शालेय शिक्षणाला रामराम ठोकून वयाच्या तेराव्या वर्षी खिशात केवळ पाच रुपये घेऊन ते मुंबईला आले.

            मुंबईला चित्रकार केतकरांनी त्यांना आपल्याकडे आश्रय दिला. एवढेच नव्हे, तर सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टला जाण्याची त्यांची तीव्र इच्छा पाहून प्रवेशासाठी आवश्यक नमुने (स्पेसिमेन्स) तयार करण्यास मार्गदर्शन केले. हे नमुने घेऊन कामत जे.जे.मध्ये १९२८ साली गेले तेव्हा त्यांचे काम पाहून संचालक ग्लॅडस्टन सॉलोमन एवढे खूष झाले, की त्यांनी कामतांना एकदम शिल्पकला विभागात तिसर्‍या वर्षाला प्रवेश दिला. शिल्पकला विभागात आपल्या मेहनतीने व नैपुण्याने कामतांनी आपल्या शिक्षकांची मने जिंकली व व्यक्तिशिल्पात प्रावीण्य मिळविले. पुढच्याच वर्षी, १९२९ मध्ये त्यांच्या ‘कोळ्याचा पोर’ या शिल्पाला बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रौप्यपदक लाभले. ज्येष्ठ शिल्पकार करमरकरांनी त्यांची पाठ थोपटली. ग्लॅडस्टन सॉलोमन व करमरकर या दोघांनी त्यांना मार्गदर्शन व मदत केली, त्यामुळे १९३० मध्ये, जानेवारीत  ‘अ‍ॅडव्हान्स’च्या परीक्षेचे पेपर देऊन कामत लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्टमध्ये उच्चशिक्षणासाठी रवाना झाले.

            रॉयल कॉलेजमध्येही आपल्या वास्तववादी शैलीतील नैपुण्य दाखविणाऱ्या शिल्पांनी व व्यक्तिशिल्पांनी त्यांनी आपल्या कलाशिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. १९३१ व १९३२ साली भरलेल्या प्रदर्शनांत शिल्पाकृती सादर करून त्यांनी रौप्य व ब्राँझ पदके आणि शिष्यवृत्तीही मिळविली. त्यांची ही प्रगती पाहून रॉयल अकॅडमीचे संचालक सर विल्यम मॅकमिलन यांनी त्यांचे कौतुक केले व ‘‘पुढील वर्षी तू सुवर्णपदक जिंकावेस,’’ अशी इच्छा व्यक्त केली.

            स्पर्धेसाठी १९३३ च्या प्रदर्शनात  ‘अ‍ॅडम व ईव्ह’ हा विषय दिला होता. कामतांनी बराच विचार करून भारतीय आलंकारिक शैलीत उद्यानात आनंदाने विहार करणारी अ‍ॅडॅम आणि ईव्ह यांची जोडी लयदार आविर्भावात उत्थित शिल्पात दाखविली. एकूण पाच फूट उंचीच्या या शिल्पात या दोघांच्या सभोवती आनंदाने उडणारी कबुतरांची जोडी, धावणाऱ्या हरिणांची जोडी, तसेच पाण्यातील मासे हेही दाखविले होते. यातून ‘पशुपक्ष्यांप्रमाणे मानवालाही प्रेम करण्याचे स्वातंत्र्य आहे व हे नैसर्गिक स्वातंत्र्य नाकारून त्याबद्दल त्यांची स्वर्गातून झालेली हकालपट्टी हा परमेश्‍वराने मानवजातीवर केलेला अन्याय आहे’, असा विचार त्यांनी व्यक्त केला.

            युरोपातील कलेत आतापर्यंत सर्वांनी स्वर्गातून हाकलले गेल्याने दु:खी झालेले व अपराधी भावना दाखविणारे अ‍ॅडम व ईव्ह दाखविले होते. त्याला अगदी विरोधी अशी भावना व बंडखोर विचार व्यक्त करणारे व त्याबरोबर कमालीचे प्रावीण्य दाखविणारे हे शिल्प परीक्षकांना आवडून त्यांना सुवर्णपदक मिळाले. हा मान मिळविणारे ते पहिलेच भारतीय असल्याने १५ डिसेंंबर १९३३ च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या प्रमुख भारतीय वृत्तपत्राने पहिल्याच पानावर ठळक मथळा देऊन कामतांचे मुक्तकंठाने अभिनंदन केले.

            सॉलोमन यांनी देऊ केलेले भारतातील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील उपसंचालकाचे (डेप्युटी डायरेक्टर) पद कामतांनी नम्रपणे नाकारले व सर एडवर्ड स्कॉट यांच्या नावाने दिलेल्या शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन त्यांनी युरोपभर प्रवास केला. त्यांनी विविध संग्रहालये    व तेथील उत्तमोत्तम कलाकृती पाहिल्या व आपले रॉयल अकॅडमीमधील शिक्षण चालू ठेवले. ते १९३५ मध्ये  भारतात परतले.

            रामचंद्र कामत भारतात परतल्यानंतर त्यांचा विवाह झाला. त्यांची कीर्ती पसरल्यामुळे त्यांना कामे मिळू लागली. या काळात त्यांनी केलेल्या व्यक्तिशिल्पांत महाराजा सयाजीराव गायकवाड, गोव्याच्या ढेंपे महाविद्यालयाचे प्रा.लवंदे, सुभाषचंद्र बोस यांचे १६ फूट उंचीचे शिल्प, चामराजेंद्र वाडियार, झाशी येथील राणी लक्ष्मीबाईचे व प्रतापगडावरील शिवछत्रपतींचे घोड्यावरील शिल्प, यशवंतराव चव्हाण व पणजीच्या सचिवालयासमोरचे अ‍ॅबे फारिया या पोर्तुगीज डॉक्टरचे शिल्प ही उल्लेखनीय आहेत. अ‍ॅबे फारिया या डॉक्टराने रोग्यांच्या वेदना कमी करण्यासाठी संमोहनशास्त्राचा (हिप्नॉटिझम) प्रथम वापर केला. हे शिल्प घडविताना कामतांनी केलेला विचार, त्यातील आधुनिकता व प्रभावी मांडणी यांमुळे हे शिल्प स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे.

            वास्तववादी शैलीतील शिल्पांपेक्षा वेगळी अशी प्रतीकात्मक शिल्पेही त्यांनी केली. यात महात्मा गांधी, येशू ख्रिस्त अशा महात्म्यांची शिल्पे, तसेच आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीवरील सोन्याची वीट उचलणारा मजूर, ढोला नृत्य करणारी गावडा स्त्री, मुग्धा इत्यादींचा समावेश आहे.

            कामतांनी ‘इंडियन स्कल्प्टर्स असोसिएशन’ची  स्थापना केली. या निमित्ताने त्यांनी आपल्या शिल्पकार मित्रांना एकत्र आणले व शिल्प प्रदर्शने भरविली.

            वृद्धापकाळी त्यांना इटलीमध्ये येण्याचे व शिल्पनिर्मितीचे निमंत्रण आले होते. पण प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. जून २००० मध्ये त्यांचे निधन झाले.

- डॉ. नलिनी भागवत

कामत, रामचंद्र पांडुरंग