Skip to main content
x

काणे, पांडुरंग वामन

           हामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे शालेय शिक्षण दापोली येथे, तर उच्च शिक्षण विल्सन महाविद्यालय येथे झाले. त्यांनी १९०३ मध्ये एम.., १९०८ मध्ये एल.एल.बी. आणि १९१२ मध्ये एल.एल.एम. या उपाधी प्राप्त केल्या. त्यानंतर १९०४ ते १९११ ही वर्षे त्यांनी सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. याच काळात त्यांनी संस्कृत ग्रंथ अभ्यासण्यास प्रारंभ केला.

पुढे सरकारी नोकरी सोडून त्यांनी काही काळ उच्च न्यायालयात वकिली, तसेच सरकारी कायदा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. १९१३ मध्ये विल्सन फिलोलॉजिकल व्याख्यानेदेण्याचा मान त्यांना मिळाला. काण्यांनी १९१५ ते १९१७ या काळात स्प्रिंजर रिसर्च स्कॉलरया नात्याने महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भात संशोधन केले.

धर्मशास्त्र व अलंकारशास्त्र हे काण्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय. सरकारी शाळेत शिक्षक असताना, ‘अलंकारशास्त्राचा इतिहास’ (१९०६) महाकाव्यात प्रतिबिंबित झालेल्या आर्यांच्या चालीरीती व नीती’ (१९०८) या त्यांच्या इंग्रजी निबंधांना मुंबई विद्यापीठाचे वि.ना. मंडलिक सुवर्ण पारितोषिक प्राप्त झाले होते. विश्वनाथाचे साहित्यदर्पण’ (काही भाग), भवभूतीचे उत्तररामचरित’, बाणाची कादंबरीहर्षचरितया संस्कृत साहित्यकृतींच्या विस्तृत टिपांसह चिकित्सक आवृत्त्या त्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या. १९१८ मध्ये प्रसिद्ध झालेली हर्षचरिताची चिकित्सक आवृत्ती हे पाठचिकित्सेचे आदर्श उदाहरण म्हणून गणले जाते. मुंबईच्या ब्राह्मण सभेत सामान्य माणसांना धर्मशास्त्राची ओळख करून देण्याच्या हेतूने त्यांनी १९३४ मध्ये चतुर्मासात २१ व्याख्याने दिली. त्या वेळी श्री. ओगले यांनी घेतलेल्या टिपणांवर आधारित धर्मशास्त्राचा विचारहे पुस्तक १९३५ मध्ये प्रकाशित झाले. त्यांनी लिहिलेला युरोपच्या प्रवासाचा पत्ररूप वृत्तान्त १९३८ मध्ये युरोपचा प्रवासया पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला. काणे यांचे बरेचसे लेखन इंग्रजी भाषेमध्ये असून त्यांतील काही मराठीत अनुवादित झाले आहे, तसेच त्यांनी मराठीतही विपुल स्फुटलेखन केले आहे. विविधज्ञानविस्तार’, ‘मनोरंजन’, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका. नियतकालिकांतून त्यांचे अनेक विषयांवरील लेख प्रसिद्ध झाले आहेत. संस्कृत वाङ्मय, मराठी भाषा, शिक्षण, भूगोल, इतिहास, ज्योतिषशास्त्र हे त्यांपैकी काही विषय होत. भारत-रामायणकालीन समाजस्थिती’ (१९११) पूर्वमीमांसा पद्धतीचा इतिहास’ (१९२५) हे त्यांच्या मूळ इंग्रजी निबंधांचे पुस्तकरूपी अनुवाद प्रकाशित झाले आहेत.

पां.वा. काणे यांच्या साहित्याचा मेरुमणी “History of Dharmashastra” या पाच खंडांत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात भारतीय धर्मशास्त्राचा समग्र इतिहास मांडला गेला आहे. सुमारे ६५०० पृष्ठसंख्या असलेल्या या ग्रंथाचे काम १९३० ते १९५८, इतका प्रदीर्घ काळ सुरू होते. प्रथम खंड १९३० साली, तर शेवटचा खंड १९६२ मध्ये प्रसिद्ध झाला. काण्यांनी हे महत्कार्य एकट्याने पूर्ण केले असून त्यातील प्रत्येक शब्द स्वहस्ताक्षरात लिहिला. धर्मशास्त्राशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संबंधित अशा सर्व विषयांचा तपशीलवार उहापोह यात आहे. या ग्रंथाच्या दुसर्या खंडाच्या प्रस्तावनेत लेखकाने स्वत:च लिहिल्याप्रमाणे, ‘धर्मशास्त्राच्या विशिष्ट अंगांचे विवेचन करणारी अनेक पुस्तके आहेत; परंतु समग्र धर्मशास्त्राची चिकित्सा करणारा ग्रंथ यापूर्वी झाला नाही. हेच या ग्रंथाची विशेषता निर्देशित करते.

पुढे काणे यांनी ग्रंथप्रयोजन विशद केले आहे. मूळच्या उपयुक्त संस्थांची कालांतराने अनिष्ट रूपांतरे होतात. ही बाब केवळ भारतातच नव्हे, तर सर्व जगात आढळते. भारताला पीडादायी ठरणार्या अनिष्ट गोष्टींचे मूळ संपूर्णत्वाने धर्मशास्त्रात वर्णन केलेल्या जीवनक्रमातच असल्याचा विचार खोडून काढणे.या ग्रंथाचा सारांशरूप मराठी अनुवाद यशवंत आबाजी भट यांनी केला असून तो १९६७ मध्ये दोन खंडांत प्रसिद्ध झाला. धर्मशास्त्राचा इतिहासया ग्रंथाची रचना हे पां.वा. काणे यांचे सर्वोच्च कार्य मानावे लागेल. भारतीय संस्कृतीच्या गाभ्याचीच ओळख करून देणारा हा ग्रंथ एक विश्वासार्ह संदर्भग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे.

हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्सहा साहित्यदर्पणाच्या चिकित्सक आवृत्तीस जोडलेला प्रस्तावनात्मक निबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा मराठी अनुवाद काणे यांनी स्वत:च केला असून तो संस्कृत साहित्यशास्त्राचा इतिहासया शीर्षकाने प्रसिद्ध झाला आहे. पां.वा. काणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक विशेष त्यांच्या लेखनातही प्रतिबिंबित झालेले आढळतात. व्यासंग, अथक परिश्रम, संशोधनपर वृत्ती, तपशीलवार व मुद्देसूद विवेचन, विषयाची साधार मांडणी, स्पष्टता, कार्यसातत्य हे त्यांपैकी काही ठळक गुण. ज्ञान-संपादनाची क्रिया सातत्याने करीत राहून स्वत:ची माहिती अद्ययावत करणे हा दुर्मिळ गुण त्यांच्यापाशी होता. त्यांच्या बहुतेक ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्या वेळेस, दरम्यानच्या कालखंडातील घडामोडी व ज्ञानक्षेत्रातील प्रगती यांनुसार नवीन आवृत्तीत योग्य ते बदल करणे अथवा भर घालणे या बाबतीतील त्यांचा काटेकोरपणा वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्वत:चे लेखन परिपूर्ण असल्याचा समज न बाळगता त्यात सुधारणा किंवा बदल करण्याची त्यांची नेहमीच तयारी असे.

ब्रिटिश सरकारने १९४२ मध्ये त्यांना महामहोपाध्यायही पदवी प्रदान केली. १९४७ ते १९४९ या काळात काणे यांनी मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून काम पाहिले. धर्मशास्त्राचा इतिहासया ग्रंथासाठी साहित्य अकादमीने त्यांना सन्मानित केले. १९५९ मध्ये त्यांना नॅशनल प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजीही सन्माननीय उपाधी दिली गेली. भारत सरकारने १९६३ मध्ये त्यांना भारतरत्नया सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. अलाहाबाद व पुणे विद्यापीठातर्फे  पां.वा. काणे यांना सन्माननीय डी.लिटही पदवी प्रदान करण्यात आली. आजही काण्यांच्या सन्मानार्थ व्याख्याने आयोजित केली जातात. एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या विद्वन्मान्य संस्थेत पां.वा. काणे संशोधन केंद्र असून दरवर्षी या केंद्रातर्फे प्राच्यविद्याविषयक विविध चर्चासत्रे होतात व संस्कृतचे अभ्यासक महामहोपाध्याय काण्यांना शब्दसुमनांजली अर्पित करतात.

डॉ. गिरीश मांडके

काणे, पांडुरंग वामन