Skip to main content
x

कानेटकर, शंकर केशव

गिरीश

विकिरण मंडळातील ज्येष्ठ सदस्य व प्रमुख आधारस्तंभ म्हणून माधव जूलियन, यशवंत यांच्या बरोबरीने शंकर केशव कानेटकर उर्फ गिरीश यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील फत्यापूर येथे झाला. न्यू इंग्लिश स्कूल सातारा व नानावाडा (न्यू इंग्लिश स्कूल, पुणे) येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. १९११मध्ये ते मॅट्रिक झाले. घरातील आणीबाणीच्या प्रसंगी त्यांना पाच वर्षे एकट्याने झगडावे लागले व थोरला मुलगा या नात्याने कुटुंबाचा सर्व भार सांभाळावा लागला, त्यामुळे इच्छा असूनही त्यांना विद्यापीठीय शिक्षण सलग घेता आले नाही. आर्थिक गरजेपोटी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली, शिकवण्या केल्या व मोकळ्या वेळात इंग्रजी, संस्कृत, मराठी भाषांतील नव्या-जुन्या वाङ्मयाचे वाचन केले. १९२२ साली इंग्लिश ऑनर्स व मराठी हे विषय घेऊन ते बी. ए. व १९३० साली एम. ए. झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे १९३४ पर्यंत मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी  काम पाहिले आणि शाळा नावारूपाला आणली. १९४०मध्ये ते विलिंग्डन महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले आणि १९५४ साली विलिंग्डनमधून निवृत्त होईपर्यंत, त्यांनी असे काम केले की तेथे मराठीचे एक संस्कारकेंद्रच उभे राहिले. त्यांचे कौशल्य लक्षात घेऊन फलटणच्या अधिपतींनी त्यांना मुधोजी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून निमंत्रित केले. ते काम त्यांनी १९५९ पर्यंत अतिशय प्रभावीपणे केले.

 ‘नदीतटाकचा सायंकाळचा देखावा’ ही गिरीशांची पहिली कविता हरिभाऊ आपटे यांनी ‘करमणूक’ साप्ताहिकात, ‘दिल्ली दरबार’ खास अंकात प्रसिद्ध केली. गिरीशांनी ही कविता ‘एक रहिमतपूरवासीय’ या टोपणनावाने प्रसिद्ध केली होती. कारण आपल्या मूळ नावाने कविता प्रसिद्ध करण्याइतका आत्मविश्वास त्यांच्यापाशी नव्हता. ‘केशवसुत’, ‘गोविंदाग्रज’, ‘बालकवी’, ‘बी’ यांसारखी कवींची टोपणनावे ते ऐकून होते. सुरुवातीला एकदोन वर्षे त्यांनी निरनिराळ्या नावांनी कविता प्रसिद्ध केल्या परंतु, १९१३ साली स्वतःच्या नावाशी सुसंगत असलेले ‘गिरीश’ हे टोपणनाव घेऊन त्यांनी निर्मितीला प्रारंभ केला आणि शेवटपर्यंत तेच नाव उपयोगात आणले. १९११ ते १९२० या दशकात त्यांनी अनेक कविता लिहिल्या, त्यांपैकी काही ‘चित्रमय जगत’, ‘काव्यरत्नावली’, ‘करमणूक’, ‘उद्यान’, ‘मनोरंजन’ या नियतकालिकांतून यथाकाल प्रसिद्ध झाल्या. परंतु त्या पुस्तकरूपाने संग्रहित झाल्या नाहीत. या काळात त्यांनी इंग्रजी व संस्कृत कविताही लिहिल्या होत्या, परंतु त्या त्यांच्याच पसंतीला न उतरल्यामुळे त्यांनी फाडून टाकल्या व केवळ मराठीतील काव्यलेखन चालू ठेवले. त्यांच्या घडणीच्या काळात गोविंदाग्रज व बालकवी यांच्याशी त्यांचा परिचय झाला व थोडाफार सहवासही घडला. १९२०मध्ये 

     यांच्या मदतीने पुण्यात ‘श्री महाराष्ट्र शारदामंदिर’ ही संस्था स्थापन केली. मंदिराच्या साप्ताहिक बैठकीत चर्चा, निबंधवाचन, काव्यगायन, काव्यवाचन वगैरे कार्यक्रम होत. यातूनच पुढे १९२३ साली ‘रविकिरण मंडळ’ स्थापन झाले. मंडळातील कवींच्या सहवासामुळे त्यांच्या कलादृष्टीवर काहीसा परिणाम झाला. सामाजिक सुधारणेला प्रोत्साहन देणारे विचार काव्यातून प्रसृत करणे, हे रविकिरण मंडळाचे एक ध्येय गिरीशांनी आपल्या काव्यात उतरवले.

आधुनिक सामाजिक खंडकाव्याचे प्रवर्तक

 ‘वीणा झंकार’ हा यशवंतांच्या सहकार्याने प्रकाशित झालेला गिरीशांचा पहिला कवितासंग्रह. तथापि यातील सर्व कविता त्यांच्या पुढील काव्यसंग्रहात समाविष्ट झाल्या  आहेत. १९२३ सालीच ‘अभागी कमल’ हे खंडकाव्य त्यांनी पुरे केले व ‘मनोरंजन’ मासिकातून ते क्रमशः प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांची ‘कला’ (१९२६), ‘आम्बराई’ (१९२८), ‘अनिकेत’ (रूपांतरित, १९५४) ही खंडकाव्ये प्रकाशित झाली. आधी खंडकाव्ये व नंतर स्फुट कविता असा गिरीशांच्या काव्य प्रसिद्धीचा क्रम आहे. ‘कांचनगंगा’ (१९३०), ‘फलभार’ (१९३४), ‘मानसमेघ’ (१९४३), ‘चंद्रलेखा’ हे त्यांचे स्फुट कवितांचे संग्रह आहेत. याशिवाय त्यांनी ‘काव्यकला’ (१९३६) हा टीकालेखांचा संग्रह, ‘मराठी नाट्यछटा’ (१९३७), ‘स्वप्नभूमी’ (माधव जूलियन यांचे चरित्र, १९६५) अशी इतरही ग्रंथरचना केली. प्र.के.अत्रे यांच्या सहकार्याने त्यांनी ‘अरुण वाचनमाला’ या लोकप्रिय शालेय पाठ्यपुस्तकाचे संपादन केले. त्या वाचनमालेला महाराष्ट्रातील शालेय जगतात उत्तम प्रतिसाद मिळाला. १९५९ साली उत्तम माध्यमिक शिक्षक म्हणून मिळालेल्या पहिल्या राष्ट्रपती पारितोषिकाने त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याचा सन्मान झाला.

 ‘अभागी कमल’ या खंडकाव्यामुळे ‘आधुनिक सामाजिक खंडकाव्याचा प्रवर्तक ' असा गिरीशांचा सार्थ गौरव केला जातो. या काव्यात एका तरुण विधवेची करुण कहाणी गिरीशांनी सांगितली आहे. विधवा कमलेचा सासू आणि नणंद यांच्याकडून झालेला असह्य छळ व त्यामुळे तिने स्वतः करून घेतलेली जीवनसमाप्ती असा कथाभाग १९०० ओळींच्या या खंडकाव्यात आला आहे. नदीच्या पुरात आत्महत्या करणार्‍या नायिकेला वाचवण्यात अयशस्वी ठरलेला नायक शुद्धीवर आल्यानंतर विधवांची दुःखे निवारण करण्याचे व त्यासाठी ब्रह्मचर्य स्वीकारण्याचे शपथपूर्वक निश्चित करतो. त्याचे हे वर्तन कवीच्या मध्यममार्गी, समतोल वृत्तीशी संवादी असल्याची प्रतिक्रिया त्या काळी व्यक्त झाली होती. आगरकरांच्या सुधारणावादी विचारांचा प्रभाव गिरीशांच्या या लेखनावर आहे. ‘क्रांतिकारक विचार आणि अत्युत्कट भावना यांची सापेक्ष उणीव त्यांनी रचनासाक्षेपाने भरून काढली आहे.’ अशा सौम्य शब्दांत रा.श्री.जोग यांनी गिरीशांच्या काव्यरचनेची मर्यादा सूचित केली आहे.

त्यांचे ‘कला’ हे दीर्घकाव्य प्रतिलोम विवाहाच्या समस्येवर आधारित कल्पनारम्य प्रेमकथा आहे. चित्रकला व काव्यकला यांत निपुण असलेली कला आणि सारंगीवादनात प्रवीण असलेला तिचा प्रियकर मोहन यांच्या उत्कट परंतु अयशस्वी प्रेमाची शोकान्त कथा या दुसर्‍या खंडकाव्यात सांगितली आहे. गिरीशांच्या तिसर्‍या खंडकाव्याविषयी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘आम्बराई हे काव्य म्हणजे शेतकरीवर्गाच्या स्थितीवर लिहिलेली  एक संसार कथा आहे.’ संपत्ती व स्वातंत्र्य अवेळी हाती आल्यामुळे त्यांचे खरे महत्त्व न समजलेल्या, कृष्णाकाठच्या वातावरणातील एका ग्रामीण, तरुण, सधन शेतकर्‍याचा व्यसनापायी झालेला अधःपात आणि कालांतराने आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होऊन त्याने शेतात केलेले कष्ट व पुन्हा आलेले आनंदाचे दिवस अशी आनंदपर्यवसायी रचना गिरीशांनी केली आहे. ‘कला’ हे खंडकाव्य कल्पनारम्य आहे, तर उरलेली दोन खंडकाव्ये जीवनवास्तवाच्या जवळ जाणारी आहेत.

जिव्हाळा आणि वात्सल्य-

गिरीशांच्या स्फुट कवितेत विषयांची विविधता आहे. कौटुंबिक भावना, प्रेमभावना, ग्रामजीवनातील भाववैचित्र्य, सामाजिक आशय, निसर्गचित्रे इत्यादी विषयांच्या अनुषंगाने त्यांनी सुनीते, उद्देशिका, भावगीते अशा काव्यप्रकारांतून त्यांनी आपली रचना केली आहे. ‘भलरी’, ‘मावळ्याचे गाणे’, ‘दौल्याची दिवाळी’ यांसारखी जानपदगीते; ‘सारंगीवाला’, ‘सूरसंगिनी’ यांसारखी प्रेमगीते; ‘शांतिस्थान’, ‘सुंदर हिरवे माळ’, ‘मानसमेघ’ यांसारख्या निसर्गकविता; ‘परित्यक्ता, ‘पाय घसरला तर’ यांसारख्या सामाजिक आशयाच्या रचना ‘तव भास अंतरा झाला’ सारखे भावगीत, ‘कृतज्ञता’ सारखे करुणगीत यांची आवर्जून नोंद करावी लागते. श्री.के.क्षीरसागर गिरीशांना उद्देशून ‘गृहस्थाश्रमी कवी’ असा उल्लेख केला आहे, तो किती यथार्थ आहे ते त्यांच्या ‘नरक चतुर्दशी’, ‘पितृस्मृती’, ‘विसरलेला नमस्कार’, ‘ताईचं प्रेम’, ‘जीवितेश्वरीस’, ‘आईचा आशीर्वाद’, ‘आवाहन’, ‘आजीबाई’ या कविता वाचल्यावर ध्यानात येते. गिरीशांच्या अंतरंगातील अपरिमित जिव्हाळा व वात्सल्य यांचा प्रत्यय अशा कवितांतून येतो.

 ‘गोपाळ कृष्ण गोखले’, ‘प्रिय सुहृद माधवराव पटवर्धन’, ‘सेनापतीस’ ही त्यांची सुनीते; ‘गुरुदेव रवींद्र’, ‘बालगंधर्व’, ‘महर्षी कर्वे’, ‘कविवर्य भास्करराव तांबे’ या त्यांच्या व्यक्तिगौरवपर कविता रचनादृष्ट्या निर्दोष व रसपरिपूर्ण आहेत. विलिंग्डन महाविद्यालय, फर्गसन महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल यांसारख्या त्यांना प्रिय असणार्‍या संस्थांवर त्यांनी रचलेली कवने संबंधित संस्थांबद्दलची गिरीशांच्या मनातील आत्मीयता प्रकट करतात. ‘क्षणाचाच विलंब’, ‘दोन पातकी’, ‘अंधारातील बाण’, ‘दोन रमणी’, ‘बकुळा’, ‘दौल्याची दिवाळी’ या त्यांच्या कथाकाव्यातील निवेदनपद्धती, प्रसंगचित्रण व व्यक्तिरेखाटन परिणामकारक आहे. ‘कृतज्ञता’ ही त्यांची कविता मराठीतील अल्पसंख्य शोकान्तगीतांत अत्यंत उल्लेखनीय आहे. या कवितेतील मृत्युमुखी पडलेल्या अनाथ मुलाचे कारुण्यमय चित्र हृदयस्पर्शी आहे. 

श्रुतिसुभगता, रचनासौष्ठव, शब्दांचा नाद, त्यांचे वजन, शब्दात सामावलेली अर्थवलये आणि त्यांचे कवितेतील सापेक्ष स्थान ही गिरीशांच्या काव्यरचनेची वैशिष्ट्ये होत. संयमित भावाविष्कार करणारी, जीवनानुभवातून स्फुरलेली, तत्कालीन मध्यमवर्गीय जीवन-जाणिवांशी प्रामाणिक असणारी, आशावादी दृष्टी देणारी कविता गिरीशांनी लिहिली.

- प्रा. डॉ. विलास खोले

 

कानेटकर, शंकर केशव