कानिया, मधुकर हिरालाल
मधुकर हिरालाल कानिया यांचा जन्म मुंबईला झाला. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. बी.ए.आणि एलएल.बी. या पदव्या संपादन केल्यानंतर सुरुवातीला १९४९-५०मध्ये ते शासकीय विधि महाविद्यालयामध्ये फेलो होते; नंतर १९५६ ते १९६२ या काळात अर्धवेळ प्राध्यापक होते. १९६४ पासून १९६७ पर्यंत ते मुंबई शहर दिवाणी न्यायालयात सहायक सरकारी वकील आणि १९६७ पासून १९६९ पर्यंत सरकारी वकील होते.
नोव्हेंबर १९६९ मध्ये कानिया यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली; १९७१ मध्ये ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. ऑक्टोबर १९८५मध्ये ते उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश झाले आणि जून १९८६मध्ये कायम सरन्यायाधीश. १ मे १९८७ रोजी त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. १३ डिसेंबर १९९१ रोजी ते भारताचे सरन्यायाधीश झाले. १७ नोव्हेंबर १९९२ रोजी ते पदावरून निवृत्त झाले.
मुंबई उच्च न्यायालयात अनेक वर्षे न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर तेथेच आधी कार्यवाहक सरन्यायाधीश आणि नंतर कायम सरन्यायाधीश झालेले आणि तेथून सर्वोच्च न्यायालयावर गेलेले न्या. कानिया हे दुसरे आणि शेवटचे न्यायाधीश होत. त्यानंतर नव्या धोरणानुसार आता सरन्यायाधीश नेहमी अन्य उच्च न्यायालयातून येतात आणि बहुतेक वेळा ते मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयावर जातात. उलटपक्षी, ज्येष्ठतेनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधीशांचा क्रमांक उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदासाठी येत असेल, त्यांची अगोदर अन्य कुठल्यातरी (एका किंवा अनेक) उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून बदली होते आणि मग तेथून ते सर्वोच्च न्यायालयावर जातात किंवा त्या उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून निवृत्त होतात.