Skip to main content
x

कायकिणी, दिनकर दत्तात्रेय

पं. दिनकर दत्तात्रेय कायकिणी यांचा जन्म मुंबईतील सांताक्रूझ येथे झाला. आई कृष्णाबाई व वडील दत्तात्रेय हे दोघेही गानवेडे होते. त्यांची आई त्या भागात उत्तम भजने गाणारी म्हणून प्रसिद्ध होती. आईची भजने ऐकून त्यांच्यावर शिशुवयातच संगीताचे उत्तम संस्कार झाले. बालवयापासून ते अतिशय तल्लख बुद्धीचे व एकपाठी होते. तेथील देवळात होणाऱ्या कीर्तनकारांना ‘जयजय रामकृष्ण हरी’पासून इतर चरणांना अगदी आलापीसहित वयाच्या चौथ्या वर्षी दिनकर गायन साथ करीत असत.

सातव्या वर्षापासून गुरू नागेश करेकट्टी राव यांच्याकडे त्यांंचे घराणेदार गाण्याचे शिक्षण सुरू झाले. पुढे दोन वर्षे पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे शिक्षण झाल्यावर वयाच्या केवळ बाराव्या वर्षी ते लखनौच्या मॉरिस म्युझिक कॉलेजमध्ये, तिथेच राहून संगीताचे शिक्षण घेण्यासाठी गेले. पं. एस.सी.आर. भट व पं. श्रीकृष्ण तथा अण्णासाहेब रातंजनकर यांच्याकडे त्यांचे संगीताचे शिक्षण झाले. लखनौला ते एस.एस.सी. झाले व ‘संगीत विशारद’ ही पदवी त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सुवर्ण पदकासह प्राप्त केली.

दिल्ली आकाशवाणी केंद्रावर ते १९५४ मध्ये सहायक निर्माता (सुगम संगीत) म्हणून रुजू झाले. निर्माता (शास्त्रीय संगीत) व सुगम संगीत विभाग प्रमुख अशी बढती मिळून १९७१ मध्ये आकाशवाणीची नोकरी सोडेपर्यंत पं.दिनकर कायकिणी यांनी आकाशवाणीवर अत्युच्च दर्जा टिकून राहावा व अभिनव कार्यक्रमांची निर्मिती व्हावी यासाठी अनेक प्रयोग केले. ‘प्रसारगीत’ व ‘वंदना’ हे त्यांचे सुरुवातीच्या काळातील कार्यक्रम होते. ‘प्रसारगीत’ या त्या वेळच्या कार्यक्रमासाठी शास्त्रीय गायकांकडून त्यांच्या भाषांमधील भजने, भावसंगीत इ. घेण्याचे व प्रसारगीतच्या स्थानिक केंद्रांवरून नवनवीन गीते मिळवण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. ‘वंदना’ हा कार्यक्रम लोकप्रिय करून दहा मिनिटांचा हा कार्यक्रम त्यांनी एका तासावर नेला. या दोन्ही उपक्रमांसाठी पं. दिनकर कायकिणी यांनी १५०० हून अधिक रचना केल्या आहेत.

भारतात युरोपातील देशांप्रमाणे स्फूर्तिगान लोकप्रिय व्हावे व त्यायोगे संगीत व देशप्रेमाचा एकाच वेळी प्रचार व्हावा म्हणून त्यांनी ‘कोरस ग्रूप’ तयार केले होते व त्यांच्याकडून अनेक समूहगीते व स्फूर्तिगीते बसवून प्रसारित केली होती. याच ध्येयाने त्यांनी शाळा-शाळांतून फिरून ५००० विद्यार्थी तयार केले होते व १९५७ सालच्या स्वातंत्र्यदिन समारंभात त्यांची राष्ट्रगीते सादर केली होती. दिल्लीतील खासदारांसाठी त्यांनी असाच उपक्रम चालवला. तेव्हापासून ते राष्ट्रगीते व स्फूर्तिगीते बसवणारे म्हणून प्रसिद्ध झाले. ‘संगीत परिभाषा विवेचन’ व ‘संगीत चर्चा’ हे त्यांचे आकाशवाणीवरील अभिनव कार्यक्रम होते.

कायकिणी १९७१ साली मुंबईच्या भारतीय विद्या भवनमध्ये संगीत विभागाच्या प्राचार्यपदी रुजू झाले. संस्थेत कलेचे मुक्त वातावरण तयार व्हावे म्हणून त्यांनी संस्था सरकारी अनुदानातून मुक्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला. शिक्षकांचे प्रबोधन, पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान प्रात्यक्षिके, संगीत कार्यक्रमांच्या मासिक बैठका, वार्षिक संगीत संमेलने  असे अनेकविध उपक्रम राबवून त्यांनी तेथे संगीताची रुची वाढवली आणि १९७१ मध्ये ६९ एवढी असलेली विद्यार्थी संख्या १९८७ मध्ये निवृत्त होताना ६०० एवढी केली.

दिनकर कायकिणी यांच्या रशिया, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांतही गायनाच्या मैफली झाल्या . त्यांच्या भावसंगीत, देशभक्तिपर रचना यांबरोबरच रागदारी संगीताच्या रचना प्रसिद्ध असून त्यांचे ‘रागरंग’ हे रचनांचे पुस्तक प्रकाशित झाले . संगीताची रुची वाढावी व व्याप्ती ध्यानात यावी म्हणून त्यांनी अनेक विषयांवर व्याख्यान प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम केले . लोकप्रिय गायक, विचारवंत, विविध संगीत प्रकारांचे रचनाकार, शिक्षक, गुरू, मार्गदर्शक अशा अनेक वैशिष्ट्यांंनी ते संगीत जगतात प्रसिद्ध आहेत.

त्यांना ‘टी.एम.ए. पै फाउण्डेशन’ पुरस्कार, ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार, ‘आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी’ पुरस्कार, ‘स्वरसाधना रत्न’ इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

— सदाशिव बाक्रे 

कायकिणी, दिनकर दत्तात्रेय