कडलग, रावसाहेब लक्ष्मण
रावसाहेब लक्ष्मण कडलग यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील संवत्सर या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव गीताबाई होते. त्यांचे सहावीपर्यंतचे शिक्षण संवत्सर या आजोळ गावी झाले. तेव्हाच त्यांच्यावर शेतीकामाचे संस्कार झाले. आजोबा अहिलाजी उमाजी बारहाते यांची १०० एकराची आमराई होती. कोकणात घेतली जाणारी सर्व पिके ते घेत. लहानपणापासून ते पाहण्याचे भाग्य रावसाहेब कडलग यांना लाभले. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कडलग यांनी आपले भवितव्य घडवण्यासाठी ‘शेती’ व्यवसायच निवडला. केवळ कामासाठी काम न करता, त्यातून आत्मिक समाधान मिळाले पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी शेती व्यवसायाकडे पाहिले. त्यामुळेच शाळा सोडल्यानंतरच त्यांना खरे प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले.
रावसाहेब कडलग यांनी सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर अकोला तालुक्यातील वाडी येथे प्राथमिक शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या कापडगिरणीतही काम केले, परंतु कापडगिरणी बंद पडली, तेव्हा त्यांनी भोर येथे जाण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांचा कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्याशी संपर्क आला. त्यानंतर त्यांनी रामभाऊ पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथेच शेतीमाल पुरवठा केंद्र सुरू केले. नगर जिल्ह्यामध्ये ३० लीटर दूध देणारी संकरित गाय पहिल्यांदा रावसाहेब कडलग यांनीच आणली. ती गाय पाहण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी भेट दिली होती. शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय उपयुक्त ठरतो, म्हणून कडलग यांनी सदर व्यवसायाला सुरुवात केली. तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, म्हणून ग्रामीण संस्था स्थापन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. शेतीला आवश्यक असणार्या जनावरांचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने जवळे-कडलग या गावात त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना सुरू केला. तसेच गावातील शेतकर्यांना प्रवरा नदीचे पाणी मिळावे, यासाठी ते दत्त पाणीपुरवठा योजनेत सहभागी झाले.
कडलग यांनी १९६४ मध्ये द्राक्षांची लागवड केली. सतत ४ वर्षे त्यांनी द्राक्षाचे विक्रमी पीक घेतले. त्या वेळेस बागेमध्ये त्यांना काही वेगळ्या प्रकारच्या द्राक्षाच्या जाती आढळल्या. त्यांनी त्यावर संशोधन करून द्राक्षाची नवीन जात शोधली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या परिसंवादात तज्ज्ञ-चिकित्सक-अभ्यासकांनी रावसाहेब कडलग यांनी शोधलेल्या द्राक्षाच्या नव्या जातीला ‘रावसाहेबी’ हे नाव दिले.
रावसाहेब कडलग यांना १९७९ मध्ये जिल्हापरिषदेचा पुरस्कार मिळाला. पुणे येथील द्राक्ष बागायतदार संघ, पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान व मुंबई येथील राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच 'रावसाहेबी' या द्राक्षाच्या जातीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे कृषिभूषण पुरस्कार देण्यात आला. रावसाहेब कडलग यांनी १९८८ मध्ये आपले जन्मगाव व कर्मगाव सोडले. ते आपली पत्नी व मुलगा राजेंद्र यांच्यासोबत शेवगाव तालुक्यातील आरवेगाव रस्त्याच्या बरड माळरानावर आले. पाणी व माती नसलेल्या उजाड माळरानावर त्यांनी १११ एकर जमिनीवर एका वर्षात राजेंद्र फलोद्यान हा प्रकल्प उभारला. या प्रकल्पात त्यांनी १० एकर द्राक्षे, ३० एकर डाळिंब, २६ एकर बोरे, २५ एकर आंबे, १० एकर सीताफळे व एक एकराचा तलाव निर्माण केला.
पावसाचे पाणी वाहून न जाता तलावात साठवण्यासाठी त्यांनी आपल्या शेताला उतार दिले व पावसाचे पाणी साठवले. त्यांनी ठिबक सिंचनाची पद्धतीही अंगीकारली. ते दहा गायींचा डेअरी फार्म उभारण्यातही यशस्वी झाले. त्यांनी प्रकल्पाच्या उभारणीनंतर तीन वर्षे सर्व पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले. हा पथदर्शक प्रकल्प म्हणून नावाजला गेला. या प्रकल्पाने प्रभावित झालेल्या मारुतराव घुले यांनी ज्ञानेश्वरनगर येथे १४ एकर जमिनीवर कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर फलोद्यान प्रकल्प उभा केला. शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठीही रावसाहेब कडलग आपणहून पुढाकार घेत.
कडलग यांनी ‘हौदाची शेती’ ही नवी संकल्पना मांडली. यामध्ये त्यांनी १ ते ५ लीटरपर्यंतचे हौद बांधले व शेतीला आवश्यक असेल, तेवढेच पाणी त्यात ओतले. त्यामुळे शेतीला अतिरिक्त पाणीपुरवठा न होता, पिकांचे नुकसान टळते व पाण्याची बचत होते, हे त्यांनी दाखवून दिले. कडलग यांनी मधुबन कृषी प्रतिष्ठानचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १९९८ मध्ये आष्टी तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे १०० एकर डोंगराळ जमीन खरेदी केली. समाजातील वृद्धांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प त्यांनी उभारला, परंतु तो पूर्ण होण्याच्या आधीच वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रवींद्र व राजेंद्र हे त्यांचे दोन्ही चिरंजीव शेतीमध्ये नवनवे प्रयोग करत आहेत. त्यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'कृषिक्रांती' हा पुरस्कार आदर्श शेतकर्याला देण्याची प्रथा सुरू केली. रवींद्र कडलग यांना 'कृषिभूषण पुरस्कार' मिळाला आहे.