Skip to main content
x

कदम, कामिनी अनिल

छायालेखक व्ही.अवधूत यांची मेहुणी, माणिक मुदलियार म्हणजेच कामिनी कदम यांचा जन्म कर्नाटकात बेळगाव येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षी त्या शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईला बहिणीकडे आल्या. दादर येथील ओरिएंट आणि जी.ई.आय. गर्ल्स हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण सुरू असतानाच त्यांच्यामधील खेळाची आवड दिसू लागली. त्यातूनच त्यांनी हुतूतू, कबड्डी, खो-खो या मैदानी खेळांमध्ये प्रावीण्य मिळवले. खरे तर खेळ हेच आयुष्याचे ध्येय होणार होते, पण भालजी यांच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यात अभिनयाने प्रवेश केला.

मैदानी खेळात प्रवीण असणाऱ्या, पण अभिनयाची जाण नसणाऱ्या माणिक यांची निवड भालजी पेंढारकर यांनी ये रे माझ्या मागल्या’ (१९५५) या चित्रपटासाठी केली. या क्षेत्राचा जवळून संबंध येत असला तरी अभिनयात अनभिज्ञ असणाऱ्या बालवयातील माणिक यांनी भालजींच्या मार्गदर्शनाखाली अभिनय केला. अभिनयाच्या प्रांतात नवख्या असणाऱ्या माणिक यांना दामूअण्णा मालवणकर, शशिकला, बाबूराव पेंढारकर यांसारख्या प्रख्यात कलाकारांबरोबर काम करण्याची मोलाची संधी भालजींनी मिळवून दिली. लहानग्या माणिकच्या चेहऱ्यावरचे सदैव दिसणारे हसरे भाव लक्षात घेऊन भालजींनी त्यांचे नाव स्मिताअसे ठेवले.

सदर चित्रपट अयशस्वी ठरल्यावरही भालजींनी १९५६ साली गाठ पडली ठका ठकाया चित्रपटाची निर्मिती करण्याचे निश्‍चित केले आणि या चित्रपटातही त्यांनी स्मिता या अभिनेत्रीला संधी देण्याचे ठरवले. कौटुंबिक विनोदप्रधान कथानक असणाऱ्या या चित्रपटात सूर्यकांत मांढरे, राजा गोसावी, जयश्री गडकर यांच्याबरोबर दुसरी नायिका होती स्मिता. राजा परांजपे दिग्दर्शित या चित्रपटातील कामाने स्मिता या अभिनेत्रीचा अभिनय करण्यातला आत्मविश्‍वास बळावत गेला आणि त्यांनी त्यापुढे देवघर’ (१९५६), ‘आंधळा मागतो डोळा’ (१९५६), ‘देव जागा आहे’ (१९५७), ‘देवाघरचं लेणं’ (१९५७), ‘नवरा म्हणू नये आपला’ (१९५७), ‘पहिलं प्रेम’ (१९५७), ‘धाकटी जाऊ’ (१९५८), ‘दोन घडीचा डाव’ (१९५८) अशा अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. तत्कालीन दिग्गज कलाकारांबरोबर केलेल्या कामाच्या अनुभवातून त्या मराठी चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग ठरल्या.

मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्द भरात असतानाच त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतही संधी मिळू लागल्या. पं. मुखराम शर्मा या हिंदीतील दिग्दर्शकाने स्मिता यांना तलाक’ (१९५८) या चित्रपटात राजेंद्रकुमारबरोबर काम करण्याची संधी दिली. नवरा-बायकोच्या भांडणांमध्ये होणाऱ्या मुलांच्या मानसिक कुंचबणेची रेखाटणी या चित्रपटात केलेली आहे.

याच दरम्यान स्मिता या एअर इंडियातील अधिकारी अनिल कदम यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि स्मितावरून त्यांचे नाव कामिनी कदम झाले.

तलाकया चित्रपटानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत रुळलेल्या कामिनी यांना संतानआणि माँ-बापहे चित्रपट मिळाले. तसेच त्यांनी मियाँ बीबी राजी’, ‘सपने सुहाने’, ‘स्कूल मास्टरया चित्रपटांमध्येही कामे केली.

हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामिनी मराठी चित्रपटसृष्टीत काम करीतच होत्या. १९५८ साली त्यांनी दोन घडीचा डावआणि धाकटी जाऊया दोन लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांमध्येही कामे केली. पुढे सुधारलेल्या बायका’(१९६५), ‘शेरास सव्वाशेर’(१९६६), ‘संथ वाहते कृष्णामाई’(१९६७), ‘धर्मपत्नी’(१९६८), ‘माझा होशील का’(१९६९) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वाखाणण्याजोग्या आहेत.

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या नावाची खास ओळख निर्माण करूनही कामिनी कदम यांनी रंगभूमीवर अभिनय करण्याच्या ऊर्मीने अपराध मीच केलाया नाटकातील शैला वर्टीची भूमिका चोखपणे केली. परंतु नाट्यसृष्टीमध्ये उशिरा केलेल्या प्रवेशामुळे त्या तेथे रुळू शकल्या नाहीत. असे असले तरी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या स्थानाला धक्का पोहचू शकलेला नाही.

- संपादित

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].