केसकर, भालचंद्र गणेश
भालचंद्र गणेश केसकर यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर या गावी एका मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात झाला. वडील वैद्यकीय व्यावसायिक व घरची शेती पाहात होते. प्राथमिक शिक्षण अनगर येथील लोकल बोर्डाच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथून पूर्ण केले. माध्यमिक शिक्षणानंतर पुण्यातील कृषी महाविद्यालयातून १९६१मध्ये बी.एस्सी. (कृषी) ही पदवी प्राप्त केली. ऑगस्ट १९६१मध्ये सोलापूर येथे कोरडवाहू शेती संशोधन योजनेत कृषी पर्यवेक्षक पदावर कृषी खात्यात सेवेस प्रारंभ केला. कृषी अधिकारी म्हणून पदोन्नती नंतर श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन योजनेत १९६५ ते ६९पर्यंत संशोधक म्हणून काम केले. येथे काम करत असताना मोसंबीसाठी योग्य खुंट निवडण्याच्या प्रयोगात खुंटाची रोगप्रतिकारक शक्ती, फळांची गुणवत्ता व झाडावर होणार्या इतर परिणामांचा विविध खुंटांचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर ‘रंगपूर लिंबू’ हा खुंट मोसंबी फळांची गुणवत्ता वाढवणारा, रोगप्रतिकारकशक्ती देणारा व लवकर फळधारणा सुरू करणारा आढळल्यामुळे या खुंटाची शिफारस केली. श्रीरामपूर येथूनच १९६९मध्ये प्रा. केसकर यांना पुण्यातील कृषी महाविद्यालयात उद्यानविद्या या विषयात एम.एस्सी. (कृषी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कृषी खात्यामार्फत प्रतिनियुक्तीवर पाठवले. त्यांनी एम.एस्सी. (कृषी) ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्रथम वर्गात पूर्ण केल्यानंतर, प्रा. केसकर यांना साहाय्यक प्राध्यापक या संवर्गात पदोन्नती देऊन सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन (रायगड) येथे प्रभारी संशोधन अधिकारी म्हणून नेमण्यात आले. श्रीवर्धन येथे सुपारीच्या ‘बांड’ रोगास पावसाळ्यात ‘बागेतून पाण्याचा व्यवस्थित निचरा न होणे’, हे प्रमुख कारण असल्याचे संशोधनानंतर त्यांनी दाखवून दिले व रोगनियंत्रणासाठी बागेत निचर्यासाठी चर खोदण्याची शिफारस केली. सुपारीच्या बागेत कोको/काळीमिरीच्या आंतरपिकाचे संशोधन प्रात्यक्षिक शेतकर्यांना दाखवले. सहयोगी प्राध्यापक म्हणून १९७५ ते ८३मध्ये पुण्याच्या कृषी महाविद्यालयात काम करताना महाविद्यालयात शैक्षणिक कामाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांमध्ये (आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये संघ व्यवस्थापक, विविध गुणदर्शन कार्यक्रमांत प्रमुख म्हणून) सहभागी होता आले.
त्यांना १९८२मध्ये ‘उत्कृष्ट शिक्षक’ हा पुरस्कार प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. त्यांनी १९८३-८४ कालावधीत मांजरी येथील कृषी विद्यालयात अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर १९८४-८९मध्ये त्यांना म.फु.कृ.वि.च्या प्रक्षेत्रावर ‘कोरडवाहू फळ सुधार योजनेमध्ये’ उद्यानविद्यावेत्ता म्हणून संशोधन करण्याची संधी मिळाली. या योजनेत त्यांना बोर, डाळिंब, सीताफळ, आवळा, चिंच यांसारख्या कोरडवाहू व कमी पाण्यावर येणार्या पिकांवर काम करण्याची संधी मिळाली. बोराच्या छाटणीचे तंत्रज्ञान, लागवडीचे अंतर, खतांची गरज, रोग नियंत्रण इ.संबंधी सर्वांगीण संशोधन केले. या संशोधन व विस्तार प्रयत्नांमुळे एके काळी फक्त बांधावर घेतली जाणारी बोरे शेतात व्यापारी तत्त्वावर लावली जाऊ लागली. बोर, डाळिंब, सीताफळ, आवळा या पिकांखालील क्षेत्रातही या संशोधन प्रयत्नामुळे झपाट्याने वाढ झाली. डॉ. चिमा यांनी शोधून काढलेल्या डाळिंबाच्या जातीनंतर जाती विकसनाचे प्रयत्न झालेले नव्हते. गणेश डाळिंबातील फिक्कट लाल रंग गर्द लाल करण्यासाठी गणेश जातीचे गुलेशा रेड, गुलेशा रोज पिंक व शिरीन अनार या लालभडक दाणे असलेल्या रशियन जातींशी संकर करून निर्माण झालेल्या प्रजातीपासून हजारो रोपे करून, त्यांच्या फळांची गुणवत्ता तपासून ‘मृदुला’, ‘आरक्ता’ या गर्द लाल दाणे असलेल्या व गर्द लाल रंग असलेल्या जाती निवडपद्धतीने विकसित करून त्या प्रसारित करण्यात आल्या.
केसकर यांनी १९८९-९३पर्यंत पुन्हा एकदा उद्यानविद्या महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर १९९४-९७मध्ये पदोन्नत्तीने राहुरी येथे प्राध्यापक (पदव्युत्तर) व विभागप्रमुख (अतिरिक्त भार) म्हणून काम करून एप्रिल १९९७मध्ये फलोद्यान महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी ५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे त्यांनी ४० संशोधन निबंध व ५० विस्तारलेख विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध केलेले आहेत. प्रौढ शिक्षण वर्गासाठी फळझाडांवरील नऊ पुस्तिका त्यांनी लिहिलेल्या आहेत.
विद्यापीठ सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जवळजवळ १० वर्षे त्यांनी ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, आहवा, नवसारी इत्यादी जिल्ह्यांत आदिवासींसाठी कृषी विषयासंबंधी विस्तारकार्य स्वयंसेवी संस्थेमार्फत सेवावृत्तीने केले.
- संपादित