Skip to main content
x

केतकर, सखाराम हरिपंत

चिद्घन महाराज

      ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळ असलेल्या ‘कवाड’ येथील श्री चिद्घन महाराज यांचे पूर्वाश्रमीचे नाव सखाराम हरिपंत केतकर असे होते. त्यांचा जन्म ज्येष्ठ शुद्ध अष्टमीस झाला. त्यांच्या आईचे नाव गोपिकाबाई होते. वडील हरिपंत ऊर्फ बच्चाजी गोविंद केतकर हे दशग्रंथी ब्राह्मण होते. सखारामचे त्याच्या वडिलांपाशीच सर्व शिक्षण झाले. वडिलांनी घरातच त्यास मोडी-हिशेब यांसह सर्व धार्मिक पाठांतराचे शिक्षण दिले.

     लौकिकदृष्ट्या त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले होते. त्यांचे अक्षर अत्यंत वळणदार व बुद्धी अत्यंत कुशाग्र होती. मुंजीनंतर त्यांनी वडिलांकडून संस्कृत ग्रंथाचे ज्ञान घेतले. ‘विवेकसिंधु’सारख्या ग्रंथांचा अगदी लहान वयातच त्यांनी सखोल अभ्यास केला. आध्यात्मिक साधना हेच आपले जीवन असा त्यांचा निश्चय होता. केवळ माता-पित्याच्या आग्रहासाठी त्यांना मनाविरुद्ध विवाह करावा लागला. त्यांच्या पत्नीचे लग्नानंतर अल्पकाळात निधन झाले. सखारामपंतांनी त्यानंतर आजन्म ब्रह्मचर्य पालन केले.

     तरुण वयातच सखारामपंत यांना योगसिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. वसिष्टी नदीत वादळात अडकलेली नौका त्यांनी सुखरूप बाहेर आणली. या घटनेने त्यांचे नाव सिद्धयोगी म्हणून पंचक्रोशीत झाले. पण या नसत्या प्रसिद्धीचा त्रास नको म्हणून त्यांनी गुरूंच्या शोधार्थ गाव सोडले. तारापूर येथे श्री आठलेशास्त्री यांनी सखारामास शिवषडाक्षरी मंत्राची दीक्षा दिली. जप, ध्यान-धारणा, सूर्योपासना असा नित्यनेम सुरू असला तरी त्यांच्या अंतरातील गुरुभेटीची ओढ कमी होत नव्हती. अखेर नाशिक येथे त्यांना त्यांच्या इष्ट गुरूंची प्राप्ती झाली. इ.स. १८१९ मध्ये माघ शुद्ध दशमी या दिवशी त्यांना नाशिकचे रघुनाथ भट्टजी मोघे यांचा दृष्टान्त रूपाने अनुग्रह लाभला. आध्यात्मिक शिक्षणाची आवड त्यांना अलिबागला घेऊन आली. येथे श्री त्र्यंबकशास्त्री शाळिग्रम यांच्याकडे शिक्षण सुरू असताना शास्त्री आजारी पडले. शास्त्रींना उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले. तेव्हा गुरुजींच्या सेवेत सखारामही पुण्यात आले. पुण्यात विश्रामबाग पाठशाळेत त्यांचे पुढील अध्ययन होत होते.

     पुण्यात सखाराम यांच्या विद्वत्तेचा चांगलाच बोलबाला झाला. यामुळे आपण खऱ्या ब्रह्मविद्येच्या साधनेपासून दूर जात आहोत हे वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांनी पुण्याचा निरोप घेतला. एकांतात राहण्यासाठी त्यांनी १९२४ साली भिवंडीजवळच्या ‘कवाड’ या निसर्गरम्य, शांत अशा गावाची निवड केली. त्यांना गदाधरभट दाजी घारगुंडे यांच्या घराच्या पडवीत जागा मिळाली. पुढे या पडवीतच त्यांनी ४३ वर्षे ज्ञानसाधना व ब्रह्मविद्या चिंतनात घालविली.

     इथे आले तेव्हा त्यांचे वय अवघे २३ होते. पण त्यांचा आध्यात्मिक अधिकार खूपच मोठा होता.  त्यांना सर्व जण ‘सखारामबुवा’ म्हणूनच ओळखत. केवळ पाच घरे माधुकरी मागण्यापुरते ते पडवीतून बाहेर पडत. अन्य सर्व वेळ ईश्वरचिंतनात लीन राहत. अशी २४ वर्षे-दोन तपे त्यांनी ‘कवाड’ येथे तपश्चर्या केली. त्यांची सिद्धावस्था, त्यांचे ज्ञान, व्यासंग ऐकून अनेक साधक मार्गदर्शनाच्या इच्छेने त्यांच्याकडे येत. त्यांना त्रिकाल-ज्ञान प्राप्त होते. कवाड गावाचे लोक त्यांना देवाचा अवतार समजत होते. त्यांना लाभलेली शिष्य- परंपराही मोठी आहे. शिष्याची योग्यता पाहून ते दीक्षा देत. ते प्रत्येकाला झेपेल अशीच साधना सांगत. समस्त समाज सन्मार्गाला लागावा अशी त्यांची इच्छा होती. प्रापंचिक-ऐहिक प्रश्‍न घेऊन येणाऱ्यास ते उपदेशाद्वारे अध्यात्माकडे, परमार्थाकडे वळवीत. सदुसष्टाव्या वर्षी त्यांची प्रकृती बिघडली. हा देहाचा आजार आहे असे म्हणत त्यांनी आपली तपश्चर्या चालूच ठेवली. अखेर आजार बळावून नित्यकर्मही करणे मुश्कील झाले. त्यांनी भारतीय आश्रम व्यवस्थेतील चौथा आश्रम, ‘संन्यास’ स्वीकारण्याचे ठरवले आणि भाद्रपद वद्य षष्ठीला संन्यास घेतल्यानंतर सर्व शिष्यांसमोर उत्तराभिमुख स्वस्तिकासन घालून ते समाधिस्थ झाले. चिद्घन महाराजांचे शिष्य ह.भ.प. माटे महाराज आदींनी पुढाकार घेऊन त्यांचे समाधी मंदिर बांधले आहे.

 - विद्याधर ताठे

केतकर, सखाराम हरिपंत