Skip to main content
x

किणीकर, रघुनाथ रामचंद्र

रॉय किणीकर

रॉय किणीकर हे विसाव्या शतकात मराठी साहित्यात होऊन गेलेले एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होय. कलंदर किंवा अवलिया हे शब्दही फिके पडावेत अशा पद्धतीने स्वतःचे, स्वतःच्या पद्धतीने स्वतंत्र आयुष्य जगणारा हा काहीसा आगळावेगळा साहित्यिक होय. प्रामुख्याने कवी म्हणून त्यांची मराठी साहित्यसृष्टीला ओळख असली तरी नाट्यलेखन, कादंबरी आणि संपादन या क्षेत्रातही त्यांची वेगळी नाममुद्रा उमटलेली आहे. गुलबर्ग्यात जन्मलेल्या रॉय यांनी इंग्रजी आणि तत्त्वज्ञान या विषयांत एम.ए.ची पदवी स्वतंत्रपणे प्राप्त केली होती. या दोन विषयांसह मराठी साहित्याचाही त्यांचा व्यासंग लक्षणीय होता.

प्रारंभीच्या काळात किणीकरांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत धडपड केली. सुरुवातीचे लेखन ‘धनुर्धारी’, ‘नवयुग’ साप्ताहिकांमधून प्रसिद्ध झाले. ‘नवयुग’ चित्रपट कंपनीतील कथाविभागात आणि आकाशवाणीवरही त्यांनी काही काळ काम केले. त्यांच्या कथेवरील ‘पन्ना’ चित्रपट गाजला. त्यांच्या श्रुतिका, एकांकिकाही गाजल्या. ‘मंगळसूत्र’, ‘देव्हारा’, ‘येगं येगं विठाबाई’, ‘खजिन्याची विहीर’ ही त्यांची १९५० ते १९७९ या काळातली नाट्यसंपदा होय.

आठ वर्षांच्या काळात, अनुक्रमे १९७१ आणि १९७९ साली प्रसिद्ध झालेल्या ‘रात्र’ आणि ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहांनी काव्यरसिकांना एक वेगळी भेट जशी दिली, तसेच अंतर्मुखही केले. छोट्या-छोट्या कवितांमधून त्यांनी चिंतनशील अस्वस्थतेचे एक वेगळे दर्शन घडवले. जीवनात घडणार्‍या प्रसंगांतून अस्थिरता, अर्थहीनता, सर्जन आणि विसर्जन यांचे अटळ, पण अनाकलनीय अस्तित्व, संस्कृतीचा उथळपणा इत्यादी अनेक विषयांवर खास रॉय किणीकरांची वैचारिक प्रगल्भता कधी गोंधळात टाकणारी, तर कधी विचार करायला लावणारी वाटते. त्यांच्या कवितेला असलेली ‘चिंतनाची डूब’ हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ‘शिर्डीचे साईबाबा’ ही त्यांची स्वतंत्र, तर अन्य काही अनुवादित कादंबर्‍या त्यांच्या नावावर आहेत. जीवनाच्या विविध भावच्छटा त्यांच्या लेखनातून उमटताना दिसतात.

संपादक म्हणून त्यांचे स्थान आगळेवेगळे आहे. दीनानाथ दलाल यांच्या ‘दीपावली’ या वार्षिकाचे ते संस्थापक-संपादक होते. पहिली दहा वर्षे त्यांच्या संपादनकौशल्याने मराठी दिवाळी अंकांना वेगळे वळण दिले. ‘धरती’ मासिकाचे त्यांचे संपादन आणि त्याचे विशेषांक यांनी मराठी नियतकालिकांची सृष्टी एक काळ बहरून गेली होती. त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध असून त्यांच्या लेखनाची जातकुळी प्रामाणिक अस्वस्थतेची आहे.

- मधू नेने

 

किणीकर, रघुनाथ रामचंद्र