Skip to main content
x

किर्लोस्कर, शांता मुकुंद

नमोकळा स्वभाव, बोलण्यात चातुर्य, वयाच्या मानाने अधिक समज असलेल्या शांता किर्लोस्कर ह्या किर्लोस्करवाडीच्या शाळेतील विधवा शिक्षिका आनंदीबाई वैद्य यांची मुलगी असल्याने, शंकरराव किर्लोस्करांच्या घरी त्यांच्या मालती या मुलीची समवयस्क गट्टीची मैत्रीण या नात्याने खेळत. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या आजोळी पुणे नगरपालिकेच्या शाळेत आणि माध्यमिक शिक्षण कन्याशाळेमध्ये व भावे स्कूलमध्ये होऊन १९३९ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांनी बी.ए.ची पदवी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून मिळविली. १९६७मध्ये त्या वृत्तविद्यापदविकेच्या परीक्षेला बसून उत्तम तर्‍हेने उत्तीर्ण झाल्या, परंतु पदवीनंतर प्रदीर्घ काळ लोटल्याने पदविकेचा सन्मान मिळू शकला नाही.

मध्यंतरी शंकररावांनी आनंदीबाईंशी विवाह केला (१९३८). आनंदीबाईंना साहित्याचे अंग असल्याने शाळेत नोकरी करून त्या मासिकांसाठीही लेख निवडीचे काम करीत. शंकररावांचे सुपुत्र मुकुंदराव बी.ए. होऊन मासिकाच्या कचेरीत पूर्णवेळ काम करीत. १९४३ साली शांता-मुकुंद यांचा विवाह झाला. १९५९ मध्ये पुण्यात राहायला आल्यावर त्या शहरी जीवनाचा त्यांच्या दिनचर्येवर परिणाम झाला.

मुलांना शाळेच्या बसमध्ये बसवून, जेवणाचा डबा घेऊन शांताताई किर्लोस्कर प्रेसमध्ये पोचून सायंकाळपर्यंत मुकुंदरावांबरोबर काम करून पति-पत्नी संध्याकाळी घरी येत असत. १९५७-५८ मध्ये मुकुंदराव अमेरिकेत गेल्यापासून परत येईपर्यंत शांताताईंनीच मासिकांचे काम नियमितपणे व दर्जा आणि परंपरेप्रमाणे चालविले. उल्लेखनीय म्हणजे मासिकाच्या संपादकांनी ठिकठिकाणी लेखक, वाचक, स्थानीय नामवंत इत्यादींची शिबिरे व सहली आयोजित करून जिव्हाळा निर्माण केला. संस्थांचे रौप्य अथवा सुवर्ण महोत्सव, शिक्षण, खेळ, कला, साहित्य, संस्कृती, राजकारण, पानशेतसारखी घटना आदी सर्व विषयांना ही मासिके स्पर्श करून वाचकांना मेजवानी देत. अनेकांच्या मुलाखती प्रसिद्ध करीत.

कोयना भूकंप, अपोलो यान, ऑलिम्पिक स्पर्धा, साहित्य संमेलने, कुटुंब नियोजन, कृषी व अन्य विज्ञाने, बालक वर्ष, स्त्री वर्ष, स्त्रियांच्या जीवनातील वेगवेगळ्या अवस्था, व्यवसाय मार्गदर्शन, पाठ्यपुस्तके, दलित चळवळ, मतिमंद मुले, संप अशा विविध प्रसंगांची व घटनांची अभ्यासपूर्ण माहिती या मासिकांनी परिश्रमपूर्वक वाचकांना पुरविली. अंधश्रद्धा, बुवाबाजी, धार्मिक रूढी बुद्धीच्या कसोटीवर तपासून त्यांतील दंभ उघड करण्याचे प्रयत्न या मासिकांनी ध्येयासक्तीने केले. या मासिकांच्या गुणवत्तेमुळे त्यांना नेहमीच उदंड प्रतिसाद मिळाला. ख्यातनाम साहित्यिक पु.ल.देशपांडे यांचा अभिप्राय बोलका आहे, “किर्लोस्कर, स्त्री, मनोहर अशी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विचारांची तीन व्यासपीठे ही त्यांची मराठी माणसाला मिळालेली मोठी देणगी आहे.”

पालक-शिक्षक समन्वयाची चळवळ त्यांनी अनेक वर्षे चालविली. ऑक्टोबर १९५७मध्ये दादरला मराठी लेखिकांच्या पहिल्या संमेलनात ‘स्त्रियांचे लेखन’ या परिसंवादात भाग घेऊन इंदूर, मांडवगड, उज्जैन, देवास, ग्वाल्हेर, भोपाळ येथे दौरा करून त्यांनी ‘इंदूर माळवा’ विशेषांकाची तयारी केली. ‘रेवा पार’ या नावाचे दोन लेख लिहिले. त्याच वर्षी पुणे सेवासदन संस्थेचा सुवर्ण महोत्सव होता. संस्था चालकांना भेटून त्यांनी विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. १९५९मध्ये तुळजापूरच्या मराठवाडा साहित्य संमेलनात हजर राहून नंतर त्यांनी बीड, मोमिनाबाद, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, शेलू व औरंगाबाद असे हिंडून तेथील वाचक, लेखक, महिलामंडळ कार्यकर्त्या यांना भेटून माहिती घेतली आणि कलापूर्ण सजावट, वेधक साहित्य यांनी नटलेला ‘मराठवाडा’ अंक सादर केला. १९६८ मध्ये बिहारचा दौरा करून असेच उपयुक्त काम केले. ‘किस्त्रीम’ने महाराष्ट्राच्या वैचारिक घडणीत केवढा मोठा व महत्त्वाचा वाटा उचलला होता, याचे प्रत्यंतर देणारा ग्रंथ म्हणजे शांताताई किर्लोस्कर संपादित ‘गोष्ट पासष्टीची’ हा होय.

स्फुट लेखनाव्यतिरिक्त त्यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे आहे: कथासंग्रह ‘डाक्क्याची साडी’ (१९६१), ‘शोध’ (१९७६), क्षमा राव यांच्या इंग्रजी कथांचा अनुवाद ‘देणगी’ (१९६०), सीमॉन द बोव्हा यांच्या ‘द सेकन्ड सेक्स’ या विख्यात ग्रंथाचा सारानुवाद ‘बायकांचा जन्म’ (१९७५), कादंबरी- ‘भातुकली’ (१९९८) याशिवाय ‘लालन-पालन’ (१९७०), ‘कसं ग माझं सोन’ ं(१९७९), ‘प्रकाशाचा वेध’ (१९८३) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

- वि. ग. जोशी

 

 

किर्लोस्कर, शांता मुकुंद