Skip to main content
x

किसनगिरी, किसन मारुती

किसनगिरी बाबा

     किसनगिरी बाबा यांचा जन्म गोधेगावातील रामभक्त शबरी समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मारुती व आईचे नाव राहीबाई होते. लहान वयातच किसन, गावातील पाटील मंडळींची गुरे आणि शेळ्या ,मेंढ्या राखण्याचे काम करू लागला. किसनचे वागणे लोकांना चमत्कारिक वाटत असे कारण तो आपल्या आईशिवाय अन्य कुणाच्या हातून रांधलेले अन्न खात नसे. पुढे तो आपला स्वयंपाक स्वतःच्या हातानेच करू लागला.

     आपल्या भावांसोबत किसन नदीवर मासेमारीसाठी जात असे. तेव्हा भावांनी जाळ्यात धरलेले मासे तो पुनश्च नदीत सोडून देत असे. आठव्या वर्षापासून किसन यांना शिवभक्तीची आवड निर्माण झाली. दिवसभर शेतात राबल्यावर रात्री प्रवरेच्या काठावर वाळूंची पिंड करून तो शिवभक्तीत तल्लीन होत असे. पुढे अन्नाऐवजी एक महिना त्यांनी केवळ लिंबाच्या पानावर काढला. या तपाने त्याच्या अंगी मारुतीरायाप्रमाणे तेज दिसू लागले. त्याच्या हातून शेतीचे काम करून घेणे लोकांना पटले नाही व काम मिळेनासे झाल्यावर चारीधाम यात्रेला जाण्याची इच्छा किसन यांच्या मनात निर्माण झाली. आपला संकल्प वडिलांना बोलून दाखविल्यावर त्यांनी किसनला आपल्याजवळ चार रुपये बळेच दिले व यात्रेला जाण्याची परवानगी दिली.

     या घटनेला केवळ पंधरा दिवस लोटल्यानंतर किसन गावी परतले व आपण चारीधाम यात्रा करून आलो आहोत, असे गावातील सर्वांना सांगू लागले. लोकांनी त्यांना वेड्यात काढले. गावातील काही वृद्ध जाणकार मंडळींनी त्यांना प्रत्येक धामाच्या काही खाणाखुणा विचारल्या असता त्यांनी ती सर्व माहिती बरोबर सांगितली. एवढेच नव्हे तर सर्वांसमक्ष वडिलांनी दिलेले चार रुपये जसेच्या तसे परतही केले. हे पाहून सर्वांना आश्चर्याचा  क्का बसला. यानंतर लोक त्यांना आदराने किसनबाबा संबोधू लागले.

     किसनबाबांची बारा वर्षे ‘शिवभक्तीपूर्ण’ झाली आणि ते गावोगाव फिरून माधुकरी म्हणून चारा, भाकरी व पीठ मागू लागले. असा जमा झालेला चारा गावातील  जनावरांपुढे टाकत आणि भाकरी कुत्रे, मासे व पक्षी यांना खाऊ घालत. त्यांना लोक भरभरून माधुकरी देऊ लागले. तेव्हा त्यांनी सप्ताह व भंडारे सुरू केले. बाबा गावात माधुकरी मागायला आल्यास आपल्या गावात शुभ घडते असा अनुभव गावकऱ्यांना आल्यामुळे ते बाबांना भरपूर माधुकरी देऊ लागले.

     बाबा प्रवरेच्या तीरावरील औदुंबराच्या खाली बसून श्री दत्तप्रभूंची भक्ती करीत. त्यांना ही जागा आवडली व या ठिकाणी दत्तप्रभूंचे मंदिर बांधण्याचा मानस त्यांनी भक्त मंडळींकडे बोलून दाखविला. याच काळात त्यांनी नेवासे बुद्रुक येथील संतपुरुष नाथबाबा यांचे शिष्यत्व पत्करले. नदीच्या काठावर उंच-सखल जमीन होती. ती सपाट करून जानेवारी १९५७ च्या सुमारास बांधकाम सुरू झाले. बाबांनी माधुकरी मागताना मंदिराच्या बांधकामासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. बाबांना लिहिता-वाचता येत नसल्यामुळे ते हिशेब ठेवत नसत. कामगारांना कामाचे दिवस विचारून पैसे देऊन टाकत. हे बांधकाम बाबांनी कुणाही अभियंत्याच्या अथवा स्थापत्य विशारदाच्या मदतीवाचून साकारले.

     संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील शिल्पकलेचा अत्यंत सुंदर नमुना आहे. बाबांना दृष्टान्त झाल्यानुसार त्यांनी या तीर्थस्थानी श्री शनि महाराज व मारुतीराय यांचीही स्थापना केली. याचबरोबर विविध देवदेवतांची स्थापना करून भाविकांचे त्रिविध ताप नष्ट होतील अशी उपाययोजना बाबांनी केली. देवगड परिसरात महाराष्ट्र शासनाने भव्य घाटही बांधलेला असून वनविभागाने येथे झाडे लावून येथील निसर्गसौंदर्यात भर टाकली आहे. किसनगिरी महाराजांनी भाविकांना मार्गदर्शन करून जनकल्याणाचे अविरत व्रत चालविले. बाबांचे निर्वाण झाल्यानंतर त्यांच्या प्रथम पुण्यतिथीपर्यंत त्यांचे समाधिमंदिरही या ठिकाणी बांधण्यात आले. रंजल्या-गांजल्या भाविकांचे हे एक मोठे श्रद्धास्थान बनले आहे.

    - दीपक हनुमंत जेवणे

किसनगिरी, किसन मारुती