Skip to main content
x

कल्लुरकर, विनायक परबत

            भारतीय गोवंशाचा उत्कर्ष हा एकच ध्यास जपणारे पशुवैद्य म्हणजे डॉ.विनायक परबतराव कल्लुरकर. त्यांचे शालेय शिक्षण मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात झाले.  त्यांनी १९६५मध्ये नागपूर विद्यापीठामधून बी.व्ही.एस्सी. ही पशुवैद्यकीय पदवी संपादन केली व ते जुलैमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागामध्ये रुजू झाले. प्राथमिक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते ऑगस्ट १९६७मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात पशुवैद्यक या पदावर कार्यरत झाले. याच काळात कार्यक्षेत्रामधील देवणी व लालकंधारी हे दोन गोवंश सांभाळणाऱ्या  शेतकऱ्यांचा, त्यांच्या पद्धतीचा व गोवंशाचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. याचप्रमाणे १९७९ ते १९८१ या काळात नांदेडमध्ये कार्यरत असताना त्या भागातील  गोपालकांचा व गोधनाचा केलेला सखोल अभ्यास त्यांना पुढे एक सिद्ध प्रणाली विकसित करण्यासाठी उपयोगी ठरला.

            कल्लुरकर १९८१ ते १९८७ या काळात उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांमध्ये वर्ग दोनचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. या काळात सरकारी योजना व त्यांची उपयोगिता प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत व दारापर्यंत कशी पोचेल यासाठी ते आग्रही होते व ते तत्त्व त्यांनी प्रत्यक्षात आणले. त्याचप्रमाणे त्यांनी गोवंशाच्या शास्त्रशुद्ध पैदाशीकडे शेतकरी कसा वळेल यासाठी अपार मेहनत घेतली व  त्यांच्या मेहनतीचे वरिष्ठांनी वेळोवेळी केलेले सार्थ कौतुक कायमस्वरूपी प्रेरणादायी ठरले. देवणी गोवंशाबाबत चळवळ उभी करताना डॉ.मुन्शी अ.रहेमान यांचे मार्गदर्शन त्यांच्यासाठी उपयोगी ठरले. कल्लुरकर १९८७मध्ये प्रथम श्रेणीचे अधिकारी झाले व निवृत्तीपर्यंत म्हणजे फेब्रुवारी १९९९पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. या संपूर्ण काळामध्ये हिंगोली, लातूर, जुनोनी (सोलापूर), उस्मानाबाद, उदगीर (लातूर) व पुणे येथे काम करत असताना त्यांनी स्वत:चा कामकाजाचा ठसा उमटवला.

            सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गोसेवेचे व्रत घेतले.शेतकर्‍यांना गोपालनासाठी आपल्या पशुवैद्यकीय ज्ञानाचा उपयोग  करून देण्यासाठी ते झटतात. त्यांनी मराठवाड्यातील गोपालक शेतकर्‍यांना एकत्रित करून ‘मराठवाडा देवणी कॅटल ब्रीडर्स असोसिएशन’ ही संस्था २००४मध्ये  निर्माण केली. ‘देवणी’ गोवंशाची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने पैदास, विकास व संवर्धन हे या संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. देवणी गोपालकांची संख्या वाढली पाहिजे व उत्तम जनावरांच्या विक्रीमधून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ होऊन त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे असे त्यांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक सदस्याने जनावरांच्या पैदासी संदर्भातील प्रत्येक नोंद नोंदवण्यासाठी डॉ.कल्लुरकर यांनी आग्रही भूमिका घेतली. देवणी गोवंशाच्या प्रदर्शनांच्या निमित्ताने डॉ.कल्लुरकर यांनी प्रमुख आयोजक व परीक्षक ही महत्त्वाची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली व पारदर्शीपणाने जनावरांची निवड करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

            सेवाकाळामध्ये नवी दिल्ली, बंगलोर, हैदराबाद व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पशुप्रदर्शनांमध्ये देवणी वंश नेऊन त्यांनी पदके मिळवली व महाराष्ट्रातील गोवंशाचे नाव मोठे केले.

-  मानसी मिलिंद देवल

कल्लुरकर, विनायक परबत