Skip to main content
x

कणबरकर, रामचंद्र कृष्णाजी

     शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, इंग्रजीचे व्यासंगी प्राध्यापक आणि कुशल प्राचार्य रामचंद्र कृष्णाजी कणबरकर यांचा जन्म बेळगाव येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण होण्यापूर्वीच प्रथम त्यांची आई आणि नंतर त्यांचे वडीलही मृत्यू पावले. पुढे त्यांचा सांभाळ सावत्र आईने केला.

     उदरनिर्वाहासाठी शेतमजुरी आणि भाजीविक्री यासारखी अंगमेहनतीची कामे करीत त्यांचे पुढील शिक्षण चालू झाले. १९४० मध्ये ते प्रथम वर्ग विशेष गुणवत्तेसह मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते पुढील उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. ‘श्री प्रिन्स शिवाजी फ्री मराठा बोर्डिंग हाऊस’मध्ये त्यांची राहण्याजेवण्याची सोय झाली. कोल्हापूर येथील प्रसिद्ध ‘राजाराम महाविद्यालया’ मधून ते १९४४ मध्ये इंग्रजी विषय घेऊन बी.ए. ची परीक्षा द्वितीय वर्गात उत्तीर्ण झाले. १९४६ मध्ये संपूर्ण इंग्रजी विषयात एम.ए. द्वितीय वर्ग प्राप्त करण्यात ते यशस्वी ठरले. याखेरीज इंग्रजीसारखी परकीय भाषा शिकविण्याचा हैदराबाद येथील अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. इंग्रजी विषयातील एम. ए. होताच त्यांची बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.

     महाराष्ट्रातील बहुजनांच्या सर्वांगीण शिक्षणाचे उद्गाते कर्मवीर भाऊराव पाटील यांचे लक्ष या अभ्यासू, निर्व्यसनी आणि चारित्र्यसंपन्न तरुणाकडे वेधले गेले. त्यांनी रा. कृ. कणबरकर यांना आपल्या ‘रयत शिक्षण संस्थे’च्या कार्यात तत्परतेने सहभागी करून घेऊन त्यांच्याकडे सातारा येथील ‘छत्रपती शिवाजी महाविद्यालया’मधील इंग्रजी विभागाचे प्रमुख पद १९४७ मध्ये सोपविले. याच वर्षी किर्लोस्करवाडी येथील मुरकुटे कुटुंबातील कु. शालिनी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.

     कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील कराड सारख्या छोट्या शहरात १९५४ मध्ये सद्गुरू गाडगे महाराज यांच्या नावाने महाविद्यालय सुरू केले. त्या महाविद्यालयाची प्राचार्यपदाची धुरा तरुण कणबरकरांच्याकडे मोठ्या विश्‍वासाने त्यांनी सुपूर्द केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विश्वासास ते पूर्ण पात्र ठरले. कारण त्यांनी ‘सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाला’ ‘गुणवत्ता महाविद्यालय’ म्हणून नावलौकिक अल्पावधीत प्राप्त करून दिला होता. परंतु बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी कागल येथील ‘गोखले महाविद्यालय’ कोल्हापूर येथे आणण्याचे ठरवले, म्हणून त्यांनी रा. कृ.कणबरकरांना कोल्हापुरास येण्यास सांगितले. त्यांच्याशी असलेल्या स्नेहामुळे आणि त्याचवेळी प्राचार्य गोकाक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पीएच.डी. चे काम चालू होते, म्हणून ते रयत शिक्षण संस्था सोडून कोल्हापुरातील गोखले महाविद्यालयमध्ये रुजू झाले.

     १९५५ मध्ये सुरू झालेल्या स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे प्रमुख संपादक बापूजी हे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे मित्र होते. बापूजींनी त्यांना या संस्थेत आपले सहकारी म्हणून मोठ्या आस्थेने सामावून घेतले. इतकेच नव्हे तर उस्मानाबादसारख्या छोट्या खेड्यात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून १९५९ मध्ये त्यांची नेमणूक केली. त्यांच्या कुशल प्रशासन आणि गरीब विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कार्य करण्याच्या पद्धतीमुळे मराठवाडा विद्यापीठात ते महाविद्यालय प्रथम दर्जाचे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी संस्थेच्या कोल्हापुरातील जुन्या बुधवार पेठेतील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून (१९६४-१९७१) कार्यभार स्वीकारला. थोड्याच दिवसात हेही महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाच्या क्षेत्रात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विश्वात 'गुणवत्ता महाविद्यालय' म्हणून मान्यता पावले.

     एखाद्या नवीन महाविद्यालयाची धुरा वाहून त्याला थोड्याच दिवसात प्रथम दर्जा प्राप्त करून देणे म्हणजे प्राचार्यपदी रा.कृ.कणबरकर असणे हे जणू समीकरणच महाराष्ट्रात होऊन बसले. त्यामुळे त्यांची मातृसंस्था असणार्‍या ‘श्री प्रिन्स शिवाजी फ्री मराठा बोर्डिंग हाऊस’, कोल्हापूर संस्थेने आपण सुरू करीत असलेल्या ‘न्यू कॉलेज’चे प्राचार्य म्हणून १९७१ मध्ये त्यांना सन्मानपूर्वक संस्थेत आणले. परिणामी उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या (बारावी १९७७, पुणे विभाग) विज्ञान शाखेच्या गुणवत्ता यादीत या महाविद्यालयाचे सात विद्यार्थी चमकले.

     याखेरीज पुणे, मराठवाडा व शिवाजी विद्यापीठाची विद्वतसभा, विधीसभा, कार्यकारिणी यामध्येही व्यासंगी व क्रियाशील सभासद म्हणून ते अनेक वर्षे कार्यरत होते. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

     शैक्षणिक समस्यांचा चौफेर अभ्यास, तळमळ, चिकाटी, कडक शिस्त, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे व चारित्र्यसंपन्नता या त्यांच्या गुणामुळे ते शिवाजी विद्यापीठाचे १९८०-१९८३ या काळात उपकुलगुरू म्हणून प्रभावी ठरले. त्यांच्या या कारकिर्दीमध्ये ललितकला, संख्याशास्त्र, प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग सुरू झाले. सोलापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा आरंभ झाला. याखेरीज शाहू संशोधन केंद्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी डॉ. विलास संगवे यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या समाजशास्रज्ञाची त्यांनी त्या केंद्राच्या प्रमुखपदी जाणीवपूर्वक नियुक्ती केली. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण पत्रोत्तर अभ्यासक्रम व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी परीक्षेमध्ये निरंतर अंतर्गत मूल्यमापन पद्धती कार्यान्वित केली. या सर्व शैक्षणिक प्रशासकीय व्यापातून त्यांची शैक्षणिक-सामाजिक विषयावरील व्याख्याने आणि ग्रंथलेखनही सुरू होते. ‘ए ग्रामर ऑफ इंग्लिश’, ‘अ कोर्स इन प्रि-डिग्री इंग्लिश’,  'महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍न: महाराष्ट्राची न्याय बाजू', ‘चिंतन’, ‘भाई माधवराव बागल चरित्र’ (प्रा. डॉ. रमेश जाधव यांच्या सहयोगाने) व ‘ग्लिम्पसेस ऑफ राजर्षी शाहू महाराज’इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

     न्यू दिल्ली येथील एन्.सी.ई.आर.टी. या संस्थेचे १९८०-८३ या काळात ते सभासद होते. सध्या विद्यमान विश्‍वस्त-राजर्षि शाहू स्मारक ट्रस्ट, विश्वस्त व कार्याध्यक्ष-ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर, संस्थापक व सभासद-श्री विवेकानंद शिक्षणसंस्था, विश्वस्त व खजिनदार लोकराजा शाहू छत्रपती दूरदर्शन मालिका संशोधन तज्ज्ञ समितीचे सभासद-राजर्षि शाहू छत्रपती कृतज्ञता प्रतिष्ठान व धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता व राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्यबद्ध असणार्‍या भाई माधवराव बागल विद्यापीठाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यमग्न आहेत. त्यांच्यामुळेच या विद्यापीठास नैतिक अधिष्ठान लाभले आहे.

     १९७४ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कार बहाल केला. याखेरीज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार- वाई, संत गाडगे महाराज पुरस्कार- कोल्हापूर, दक्षिण भारत जैन सभेचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार इत्यादी पुरस्कारही त्यांना लाभले .

- प्रा. डॉ. रमेश जाधव

कणबरकर, रामचंद्र कृष्णाजी