Skip to main content
x

कराळे, रामकृष्ण लक्ष्मण

   रामकृष्ण लक्ष्मण कराळे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वाई येथे झाला.  अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील शिवाजी हायस्कूलमधून १९५०मध्ये त्यांनी शालान्त परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून १९५६मध्ये त्यांना बी.एस्सी. (कृषी) पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी व सुवर्णपदक मिळाले. दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेतून ते १९५८मध्ये मृदाशास्त्र विषयात असोसिएटशीप परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांनी नेदरलँडमध्ये गुणवत्ता शिष्यवृत्तीवर वायू-चित्र अभ्यास’ (एरियल फोटो-इंटरप्रीटेशन) या विषयात एम.एस्सी. प्राप्त केली. त्यांनी १९६२मध्ये पीएच.डी.ची पदवी मिळवली. त्यांनी अमेरिकेतील अरिझोना व पर्ड्यू विद्यापीठातून आणि इंग्लंडमधील रीडिंग विद्यापीठातून सुदूर संवेदन’ (रिमोट सेन्सिंग) विषयात प्रशिक्षण व ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन विद्यापीठातून भूमी उपयोग नियोजनया विषयात पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले.

कराळे यांनी १९६३मध्ये नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या अखिल भारतीय मृदा आणि भूमी उपयोग  सर्वेक्षण (ऑल इंडिया सॉइल अँड लॅन्ड युज सर्व्हे) या संस्थेत साहाय्यक मृदा सर्वेक्षण अधिकारी म्हणून नोकरीस सुरुवात केली. नंतर त्यांनी संस्थेत क्रमशः मृदा सर्वेक्षण अधिकारी, मृदा संधारण अधिकारी, वायू-चित्र अभ्यास वरिष्ठ मृदा संधारण अधिकारी, प्रकल्प अधिकारी व मुख्य मृदा सर्वेक्षण अधिकारी या प्रमुख पदांवर ते १९८५ ते १९८८ दरम्यान कार्यरत होते.

ऑक्टोबर १९८८ ते १९९० या काळात त्यांनी नागपूर येथील इस्रोे अंतरिक्ष विभागांतर्गत असणार्‍या प्रादेशिक सुदूर संवेदन सेवा केंद्र (रीजनल रिमोट सेन्सिंग सर्व्हिस सेंटर)मध्ये प्रमुख म्हणून काम केले. नंतर त्यांनी त्याच केंद्रात सल्लागार म्हणून १९९२पर्यंत कार्यभार सांभाळला. त्यांनी निवृत्तीनंतर नागपूर येथे इंडियन रिसोर्सेस इन्फर्मेशन व मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी, हैदराबादया कंपनीत सुरुवातीला प्रकल्प अधिकारी व नंतर संचालक म्हणून काम पाहिले. ते १९८०-८१मध्ये इराकमध्ये मृदा-विशेषज्ञम्हणून प्रतिनियुक्तीवर गेले होते.

नोकरीच्या सुरुवातीस डॉ. कराळे यांनी सर्वेक्षणांवर आधारित भूमी आरेखन (मॅपिंग), वर्गीकरण व विवरण यावर काम केले. वायू-चित्र यांचे अर्थपूर्ण विवरण व मृदा सर्वेक्षण कार्यात सुदूर संवेदन प्रणालींचा यशस्वी उपयोग करण्याकडे त्यांनी लक्ष पुरवले. ओसाड, निरुपयोगी, दर्‍याखोर्‍यांच्या सुधारणा-योग्यता वर्गीकरणासाठीचे   निकष त्यांनी अभ्यासातून मांडले. त्यांनी जंगलव्याप्त जमिनींच्या व्यवस्थापनावरही विचार मांडले. नंतरच्या कार्यकाळात त्यांनी सुदूर संवेदन प्रणालींचा उपयोग मृदा सर्वेक्षण, तसेच भूमी वापर नकाशासाठी करता येतो हे दाखवून दिले. नैसर्गिक संपदेच्या एकात्मिक विकास नियोजनासाठी सुदूर संवेदन व संगणकांचा उपयोग करण्याच्या पद्धती विकसित केल्याबद्दल कराळे यांची विशेष ख्याती झाली. सेवानिवृत्तीपूर्वी कराळे यांनी संपूर्ण भारताच्या जमिनीच्या (३२८ दशलक्ष हेक्टर्स) वापराचे जिल्हावार नकाशे संगणकाद्वारे सुदूर संवेदन प्रणालीचा वापर करून तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण केले.

कराळे यांना भारतीय  मृदा संधारण संस्थेने सुवर्णपदक देऊन गौरव केला. ते १९९०-९२च्या दरम्यान भारत सरकारच्या अंतरिक्ष संशोधन समितीचे सदस्य होते. आंतरराष्ट्रीय मृदाशास्त्र संस्थेने १९९०-१९९२ या काळात सुदूर संवेदन कार्यगटाचे अध्यक्षपद त्यांना दिले. त्यांचे १२० शास्त्रीय संशोधनपर लेख व २ पुस्तिका प्रसिद्ध झाल्या. भारत सरकारच्या अंतरीक्ष विभागाने प्रसिद्ध केलेल्या नैसर्गिक संपदेचे व्यवस्थापन - नवी दृष्टीया पुस्तकाचे लेखन, संपादन यांच्यावर सोपवले होते.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].