Skip to main content
x

करकरे, अशोक कुमार

        अशोक कुमार करकरे यांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. ३ मे १९६४ रोजी त्यांची भारतीय लष्करात नेमणूक झाली. करकरे यांचे शिक्षण नवी दिल्लीतील एअर फोर्स सेंट्रल येथे झाले. त्यानंतर त्यांनी चंदिगड शासकीय महाविद्यालयातून पदवी घेतली. लंडनमधील ख्राईस्ट महाविद्यालयातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. पश्चिम विभागातील खारला तळावर हल्ला करण्याकरता, राजपूत रेजिमेंट बरोबर कॅप्टन करकरे हे तोफखाना रेजिमेंट निरीक्षक अधिकारी म्हणून काम पाहत होते. शत्रूनेही त्वरित हालचाल करीत आपल्या सैन्यावर जोरदार गोळीबाराला सुरुवात केली. त्यामुळे बरचसे सैनिक जखमी झाले. कॅप्टन करकरे यांनी शत्रूकडील रेडीओ यंत्रणा (बिनतारी संदेश यंत्रणा) हस्तगत करून त्याद्वारे शत्रूची दिशाभूल केली. त्यामुळे गोळीबाराची दिशा बदलली. त्यामुळेच तुकडीतील सैनिकांची प्राणहानीही टळली. 
       
दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ डिसेंबरच्या सकाळी शत्रूने अगदी निर्धाराने पायदळ आणि तोफखान्याच्या मदतीने आपल्या सैन्यावर प्रतिहल्ला चढविला. आपल्या सैन्यावर तोफखाना आणि लहान शस्त्रास्त्रांचा वर्षाव सुरु झाला. तरीही न डगमगता करकरे यांनी तोफखान्याला अचूक दिशा दिली. शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करीत त्यांना मागे हटवले. आपले सैन्य त्या ठिकाणाहून बाहेर पडेपर्यंत त्यांनी शत्रूला गुंतवून ठेवले.  मात्र करकरे तिथून बाहेर पडत असताना त्यांना वर्मी गोळी लागून जागीच वीरमरण आले. यावेळी त्यांनी दाखवलेले शौर्य, नेतृत्वगुण याबद्दल त्यांना मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले.

-संपादित

करकरे, अशोक कुमार