कर्वे, लीलाताई
लीलाताई कर्वे यांना भाविक, भगवान श्रीकृष्णाचा अवतार समजत. लीलाताईंऐवजी ‘लीलाकृष्ण’ म्हणून त्यांचा आदराने उल्लेख करीत. अशा थोर अवस्थेला पोहोचलेल्या लीलाताई कर्वे यांचा जन्म गोव्यातील मंगेशी येथील रघुनाथ शेणवी यांच्या घरात झाला. त्यांची आई गरोदर असताना त्यांना नवदुर्गेचा दृष्टान्त झाला होता. ‘देव तुझ्या पोटी जन्म घेणार आहे,’ असे देवीने सांगितले होते. त्यांची मुले जगत नव्हती म्हणून ताईचा जन्म होताच आईने तिला शेजारी राहणाऱ्या मथुराबाई यांच्या ओटीत घातले. हा तोडगा त्या काळी गोव्यात प्रचलित होता. ताई दीड वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मग आई व ताई आत्याच्या सोबतीने राहू लागल्या. उदरनिर्वाहासाठी आपल्या घरातील दोन खोल्या मंगेशीच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना त्या भाड्याने देत असत.
मंगेशी येथेच लीलाताईंचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे पुढील शिक्षण बेळगाव येथे झाले. एस.टी.सी. पर्यंत शिकून त्या शिक्षिका झाल्या. त्यांनी बेळगाव येथे हेरेकर कुटुंबात, त्यांच्या घरातील सर्व घरकामे करून आपले शिक्षण पूर्ण केले. अशा प्रकारे ‘कमवा व शिका’ असा ध्येयवाद त्यांनी निष्ठेने जोपासला होता.
शिक्षिकेच्या नोकरीनिमित्त त्यांना बेळगाव, सौंदलगा, चिक्कोडी, खानापूर, गुंजी या गावी जाऊन राहावे लागले. या सर्वच ठिकाणी लीलाताईंनी कृष्णभक्तीचा प्रचार-प्रसार केला व मोठ्या संख्येने लोकांना भगवद्गीतेकडे आकर्षित केले. १९६३ साली त्यांचा कर्वे यांच्याशी विवाह झाला. हे कर्वे निष्ठावान कृष्णभक्त होते. त्यामुळे लग्नानंतरही लीलाताईंचे कृष्णभक्ती प्रचार-प्रसार कार्य अव्याहतपणे, अखंडपणे पुढे सुरू राहिले. यथावकाश त्यांना नंदा, वैभवी व संतोष अशी तीन मुले झाली.
प्रपंचातील सर्व जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळून नोकरी करीत त्यांनी आपले कृष्णभक्तीचे कार्यही नेटाने व नेटकेपणाने केले. नामस्मरणाच्या बळावर त्यांचे भगवान श्रीकृष्णाशी नित्य अनुसंधान होते. श्रीकृष्णाच्या आदेशानुसार लीलाताईंनी २५ ऑगस्ट १९७८ रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ‘कृष्णकुटीर’ बांधले. ध्यानमंदिराबरोबरच ज्ञानमंदिर म्हणून ते अल्पावधीतच भाविकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर ‘द्वारकाधीश मंदिर’ आपटा फाटा (जि. रायगड), ‘वृंदावन’ (कर्वेनगर, पुणे), ‘गोवर्धन मंदिर’ (स. पिंपरी, नाशिक), ‘गोकूळ मंदिर’ (डाळिंबी, पुणे जिल्हा), ‘योगेश्वर मंदिर’ (गोवा) अशी पाच कृष्णमंदिरे निर्माण केली व कृष्णभक्तीचा-भगवद्गीतेच्या बोधाचा प्रभावी प्रचार केला. भारताच्या विविध प्रांतांत आणि परदेशांतही त्यांनी सुमारे ४०० कृष्णभक्ती केंद्रे सुरू केली.
२८ मे १९८३ रोजी लीलाताईंच्या पतीचे निधन झाले. पण त्यांनी कठोर परिस्थितीतही आपले कृष्णभक्ती प्रचारकार्य चालू ठेवले. एके दिवशी त्यांना विश्वजननीची नऊ मंदिरे बांधण्याचा ईश्वरी संदेश प्राप्त झाला. लीलाताई या कृष्णकुटीर व मुलाबाळांच्या संसारापासून पूर्ण अलिप्त झाल्या व विश्वजननीची मंदिरे उभारणीच्या कार्याचा ध्यास घेऊन नव्या जोमाने कार्यरत झाल्या.
पुणे, जोगेश्वरी (मुंबई), रत्नागिरी, कुमठा, हळदीपूर, बदलापूर, रांची (छत्तीसगड), दोहा (कतार), लॉस एंजेलिस (अमेरिका) आणि दिल्ली अशा नऊ ठिकाणी त्यांनी विश्वजननीची नऊ मंदिरे उभी करून आपला संकल्प पूर्ण केला. अमेरिकेतील विश्वजननी मंदिराचे उद्घाटन ७ ऑक्टोबर २००१ रोजी करण्यात आले, तर दिल्ली येथील मंदिर २ फेब्रुवारी २००३ रोजी पूर्णत्वास गेले. वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी, १० फेब्रुवारी २००३ रोजी, म्हणजे दिल्लीतील अखेरचे विश्वजननी मंदिर बांधून पूर्ण होताच आठ दिवसांनी लीलाताई कृष्णध्यानाला बसल्या आणि ध्यानावस्थेतच त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी देह अर्पण केला.
त्यांच्या समाधीनंतर सर्व मंदिरांतील सर्व कार्यक्रम त्यांनी घालून दिलेल्या पद्धतीनुसार भाविक-भक्त पुढे चालवीत आहेत. बदलापूरचे कृष्णकुटीर एक ऊर्जाकेंद्र म्हणून भक्तांना स्फूर्ती देत आहे.