Skip to main content
x

कत्रे, सुमित्र मंगेश

       ज एक उत्तम शैक्षणिक संस्था म्हणून जगभर नावाजलेले डेक्कन महाविद्यालय किंवा दक्षिणा महाविद्यालय हे सुरुवातीला पुण्यातल्या इतर महाविद्यालयांप्रमाणेच विशारद किंवा बी.. या पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे महाविद्यालय होते. १९३४ मध्ये ते बंद पडले. माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे ते १९३९ मध्ये पुन्हा सुरू झाले ते पूर्णपणे नव्या स्वरूपात. मुंबई विद्यापीठात नसलेल्या भाषाशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र आणि मराठा इतिहास या विषयांतल्या पदव्युत्तर उच्च शिक्षणाचे आणि संशोधनाचे हे एक केंद्र मानले जाऊ लागले .

           प्रा.डॉ. सुमित्र मंगेश कत्रे यांनी या महाविद्यालयात १९३९ मध्ये प्रवेश केला, तो युरो-भारतीय भाषाशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आणि  त्यानंतर तीनच वर्षांनी योगायोगाने डेक्कन  महाविद्यालयाच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली, ती वयाच्या पासष्ट वर्षांपर्यंत म्हणजे १९७१ सालापर्यंत. त्यांच्या या कारकिर्दीत डेक्कन महाविद्यालयाने चांगलेच बाळसे धरले. ते नावारूपाला आले ते त्यांच्याच समर्थ नेतृत्वामुळे, कर्तृत्वामुळे आणि द्रष्टेपणामुळे. महाविद्यालयाच्या उभारणीतले कत्रे हेे प्रमुख आधारस्तंभ. डेक्कन महाविद्यालयाचे वर्धन, संरक्षण आणि उन्नयन झाले ते त्यांनी घातलेल्या मजबूत पायामुळेच

           आपल्या भावी आयुष्यात भारतातील भाषाशास्त्रज्ञांची एक संपूर्ण पिढीच्या पिढी तयार करणारे आणि संस्कृताभ्यासकांच्या पिढ्यांना आव्हान ठरेल असा संस्कृत महाकोशाचा भव्य प्रकल्प सुरू करणारे कत्रे सर भाषाशास्त्र आणि संस्कृतकडे कसे वळले हे   ऐकणे मोठे मनोरंजक आहे. शालेय जीवनात का कोण जाणे, पण एका वर्षी त्यांना संस्कृत विषयात उत्तीर्ण होण्यापुरतेही गुण मिळाले नाहीत. पुढच्या वर्षी संस्कृत सोडायचे या अटीवरच त्यांना वरच्या वर्गात घालण्यात आले. खरे तर इथेच त्यांचे संस्कृत शिक्षण संपायचे; पण विधिलिखित काही निराळेच होते. त्याच सुमारास दोन बंगाली मुलांचे त्यांच्या पाणिनीविषयक ज्ञानाचे मद्रासमध्ये प्रात्यक्षिक झाले आणि त्यांचे विद्वानांकडून भरघोस कौतुक झाले.

या घटनेने कत्रे अतिशय प्रभावित झाले आणि तसाही त्यांचा स्वभाव सहजासहजी हार मानणारा नव्हताच. त्यामुळेच केवळ भारतातल्याच नव्हे, तर जगातल्या आद्य भाषाशास्त्रज्ञांच्या, म्हणजेच पाणिनीच्या अष्टाध्यायीचे त्यांनी पारंपरिक शिक्षण घेतलेल्या वैयाकरण शास्त्रींकडून धडे घेतले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते ट्रिनिटी, केंब्रिज येथे दाखल झाले, ते गणित विषयातल्या अध्ययनासाठी. त्यासाठी प्रवेशाला आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांचे आप्त डॉ. सावूर यांनी काही कारणाने प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर न देता पोस्टाने पाठवली; पण काही चुकीने परत भारतात पाठवली गेली. ती परत इंग्लंडमध्ये पोहोचेपर्यंत प्रवेशाची मुदत टळून गेली होती. त्यामुळे गणित विषयातला त्यांचा प्रवेश हुकला आणि प्रवेश घ्यावा लागला, तो संस्कृत विषयासाठी. त्यासाठी आवश्यक असलेली अर्हता न भूतो न भविष्यतिइतक्या कमीतकमी वेळात देऊन, उत्तीर्ण होऊन त्यांचे शिक्षण सुरू झाले. राल्फ टर्नर, ब्लॉक, स्टीड, र्हिस डेव्हिड्स अशा नामवंत विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करून आणि विद्यावाचस्पती पदवी संपादन करून ते पुण्यात आले. १९३३ ते १९३९ पर्यंत त्यांनी नौरोसजी वाडिया आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयात संस्कृतचे अध्यापन केले.

१९३९ मध्ये त्यांनी जेव्हा प्राध्यापक म्हणून डेक्कन  महाविद्यालयामध्ये प्रवेश केला, त्या वेळी भारतात कलकत्ता (कोलकाता) आणि पुणे या दोनच ठिकाणी भाषाशास्त्र किंवा फिलॉलॉजी शिकवले जात होते. त्यानंतरची दहा-बारा वर्षे संस्थेच्या दृष्टीने अतिशय धावपळीची आणि ओढगस्तीची गेली. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. लष्कराने महाविद्यालयाच्याच जागेवर तळ ठोकल्याने महाविद्यालयाचे स्थलांतर झाले होते. त्या वेळची ग्रंथालयात असलेली मोजकीच पुस्तके (१९३९), ती ही बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या वेगवेगळ्या संस्थांत हलवावी लागली होती. त्यामुळे खऱ्या  अर्थाने सरांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती १९५० मध्ये, महाविद्यालय पुन्हा आपल्या जागेवर सुरू झाल्यावर.

त्याच सुमारास राष्ट्राच्या इतिहासातही काही महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजीची जागा घेण्यासाठी भारतातील प्रादेशिक भाषा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली. राष्ट्रीय भाषा विषयक धोरण ठरवणे आवश्यक झालेे. भारताची कार्यालयीन भाषा म्हणून इंग्रजीला पर्याय शोधण्यासाठी अमेरिकन विद्वानांना भारतीय भाषांचे ज्ञान आणि त्यात प्रावीण्य मिळविण्यासाठी, तसेच भारतीय भाषांमधल्या आपापसातल्या भाषिक आणि सांस्कृतिक विनिमयासाठी काही करता येईल का या दृष्टीने रॉकफेलर फाउण्डेशनच्या वतीने श्री. गिलपॅट्रिक यांनी डॉ. कत्रे यांची भेट घेतली. या सगळ्यासाठी भाषाशास्त्राचे आधुनिक भाषाशास्त्राचे शिक्षण आवश्यक होते. कत्र्यांनी त्या दृष्टीने देश आणि परदेशातील शिक्षणशास्त्रज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञ यांची एक परिषद बोलावली आणि त्यानुसार १९५३ मध्ये जणूकाही एक भाषाशास्त्रीय चळवळच सुरू झाली. रॉकफेलर फाउण्डेशनने याला आवश्यक ते आर्थिक साहाय्य पुरविले आणि देशात पहिल्यांदाच डेक्कन महाविद्यालयामध्ये उन्हाळी आणि हिवाळी भाषाशास्त्र विषयक कार्यशाळा सुरू झाल्या. केवळ दोन वर्षांच्या अवधीत जवळजवळ दोन हजार भाषा शिक्षकांनी आणि इतरही विषयांच्या जिज्ञासूंनी भाषाशास्त्राचा परिचय करून घेतला. काहींनी त्यात प्रावीण्यही मिळविले आणि परत आपल्या विभागात गेल्यावर भाषाशास्त्राचे व्यवस्थित अभ्यासक्रम सुरू केले. यांतल्या काहींना तर अमेरिकन विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण आणि संशोधन यांचाही अनुभव घेता आला आणि भाषाशास्त्र या क्षेत्राचे चित्रच पालटून गेले. त्यातल्या वेगवेगळ्या शाखांतले नवनवीन प्रकल्प हाती घेऊन ते पार पाडण्यासाठी संशोधकांची एक उत्तम फळी तयार झाली.

बऱ्याच  काळापासून सुमित्र कत्रे यांच्या मनात घोळत असलेली अशीच एक उत्तुंग कल्पना त्यांनी जाहीर केली ती विल्सन भाषाशास्त्रीय व्याख्यानमालेत, आणि ती म्हणजे संस्कृत भाषेचा ऐतिहासिक तत्त्वांवर आधारित विश्वकोशात्मक शब्दकोश. अशा पद्धतीचा एक अत्यंत उत्कृष्ट कोश रोथ आणि ब्योथलिंक या दोन विद्वानांनी अतिशय परिश्रमपूर्वक १८५५ ते १८८५ या काळात त्याच्या अनेक पुरवण्यांसह प्रसिद्ध केला होता. पण त्यात समाविष्ट असलेल्या ग्रंथांची संख्या केवळ पाचशे इतकी होती. त्यानंतर भासाच्या नाटकांसारखे अनेक नवीन ग्रंथ प्रकाशात आले होते. कित्येक ग्रंथांच्या महत्त्वाच्या टीकांचा या कोशात समावेश नव्हता. वास्तुशास्त्र, नाट्यशास्त्र, ज्योतिषशास्त्र, धर्मशास्त्र इत्यादी विषयांवरील अनेक ग्रंथ त्यात समाविष्ट नव्हते. त्यामुळे अशा एखाद्या अद्ययावत कोशाची अत्यंत तातडीने आवश्यकता होती. यात जवळजवळ दोन हजार संस्कृत ग्रंथांचा समावेश होणार होता. त्या दृष्टीने त्यांनी एक अत्यंत तपशीलवार सुसूत्र आराखडा तयार करून १९४२ मध्ये एका नियतकालिकात प्रसिद्धही केला. सुरुवातीला वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या विद्याशाखांवर काम करून एकमेकांच्या सहकार्याने असा कोश प्रसिद्ध करावा, अशी त्यांची कल्पना होती. पण प्रत्यक्षात मात्र आधीपासूनच पुराभिलेखातील संस्कृत आणि संस्कृतकोशवाङ्मय यांच्या कोशनिर्मितीत व्यग्र असलेल्या डेक्कन महाविद्यालयावरच ही सर्व जबाबदारी येऊन पडली आणि साठ विद्याशाखांतील वेगवेगळ्या ग्रंथांतील शब्दांची नोंद करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर संपादनाचे काम सुरू होऊन १९७६ मध्ये पहिल्या खंडाचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. २००५ मध्ये सातव्या खंडाचा तिसरा भाग प्रकाशित झाला. आतापर्यंत ३८४८ पाने प्रसिद्ध झालेली असून अन्नव्रत हा त्यातला शेवटचा शब्द आहे. अन्य शब्दांपासून पुढचा भाग छपाईच्या मार्गात आहे. जगभर या कोशाचा आता पुणे डिक्शनरी (PD) म्हणूनच उल्लेख होतो. हा कोश जेव्हा पूर्ण होईल, त्या वेळी संस्कृत शब्दांच्या वेदांपासून आजपर्यंतच्या चरित्राच्या किंवा जीवनेतिहासाच्या रूपाने संस्कृत भाषेचा समग्र इतिहास अभ्यासकांसाठी उपलब्ध होईल.

कत्रे यांची कारकिर्द हा सर्वार्थाने डेक्कन  महाविद्यालयाच्या भरभराटीचा काळ होता. सुरुवातीला सात असलेली कर्मचारी संख्या ते निवृत्त होण्याच्या वेळी २५० झालेली होती. सुरुवातीला एकाच इमारतीत प्रशासन, ग्रंथालय इ. सर्व विभाग होते. हळूहळू ती जागा कमी पडायला लागली. तोपर्यंत सरांच्या नेत्रदीपक यशामुळे डेक्कन महाविद्यालयाविषयीच्या आणि कामाविषयीच्या निष्ठेमुळे राजदरबारी त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झाले होते. त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून भरघोस अनुदान मिळवण्यात त्यांना यश आले आणि त्यातूनच नवीन ग्रंथालय, पुरातत्त्वशास्त्र विभाग, भाषाशास्त्र विभाग यांच्या इमारती उभ्या राहिल्या. या सगळ्या बांधकामाकडे सर जातीने लक्ष पुरवत, ते चांगले आणि सुंदर होईल, याकडे त्यांचा कटाक्ष असे.

आपल्या सहकाऱ्यांची  प्रगती व्हावी, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. त्यामुळेच त्यांच्या काळात डेक्कन महाविद्यालयामधील अनेक कर्मचारी परदेशात प्रशिक्षण आणि उच्च शिक्षण घेऊन आले. कधी कधी तर एखाद्या विद्यार्थ्याची पारपत्र मिळवून देण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारलेली आहे. आपल्या सहकाऱ्यांचे संशोधन आणि लेखन प्रकाशित व्हावे, यासाठी त्यांनी महाविद्यालयाचे नियतकालिक सुरू केले. ते अजूनही प्रकाशित होत असते. त्यांनी वाक्नावाचे एक नियतकालिकही सुरू केले होते; पण ते थोड्याच दिवसांत बंद पडले. १९६४ मध्ये इमारत शताब्दीच्या निमित्ताने त्यांनी शंभर पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. याखेरीज मोनोग्राफ सिरीज, डिस्सर्टेशन सिरीज अशा विविध मालिकांतून अनेक ग्रंथ प्रकाशित केले. महाविद्यालयाचा स्वत:चा छापखाना असावा, अशी त्यांची इच्छा होती.

१९६२ मध्ये महाविद्यालयाचे अस्तित्वच धोक्यात आले होते; पण त्यांच्या प्रयत्नांनी तो प्रसंग टळला. त्यावेळी चीनने भारतावर आक्रमण केले होते. सैनिकी शिक्षणासाठी आणि सैन्याच्या विस्तारासाठी अनेक योजना आखल्या जात होत्या. दुसऱ्या महायुद्धात डेक्कन  महाविद्यालयाचा विस्तीर्ण टापू सैन्याने आपल्या ताब्यात घेतला होता, तो १९४९ मध्ये सोडला, तरी त्यावेळी बांधलेल्या बरॅक्स अजून शाबूत होत्या. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सदर्न कमांडने महाविद्यालयाकडे जागेची मागणी केली. डेक्कन महाविद्यालयाच्या आणि सरांच्या सुदैवाने जनरल जे.एन.चौधरी सदर्न कमांडचे अधिकारी झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त झाले. प्रा.सांकलिया आणि प्रा.धनंजयराव गाडगीळ यांना बरोबर घेऊन सर यशवंतराव चव्हाणांना भेटले आणि त्यांना आपली समस्या पटवून देण्यात यशस्वी झाले आणि महाविद्यालयावर आलेले गंडांतर टळले.

आवर्जून उल्लेख करायला हवा तो डेक्कन  महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा. कुठल्याही शिक्षणसंस्थेचा ग्रंथालय हा गाभा असतो. ग्रंथांच्या आणि ग्रंथालयांच्या या महत्त्वपूर्ण स्थानाची कत्र्यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच १९५० मध्ये डेक्कन  महाविद्यालयाची जागा परत हातात आल्याबरोबर त्यांनी इतर संस्थांमध्ये ठेवायला दिलेली पुस्तके परत मिळवायला सुरुवात केली आणि त्यात ते यशस्वीही झाले. हरप्रकारे महाविद्यालयाची ग्रंथसंपदा कशी वाढवता येईल, हाच त्यांना ध्यास असायचा. त्यांनी इंग्लंड आणि अमेरिका इथून पुस्तके मागवली होती. त्यानंतर महायुद्ध सुरू झाले. त्याचा परिणाम न होता मागवलेली पुस्तके सुखरूपपणे महाविद्यालयामध्ये पोहोचतील यासाठी त्यांनी सर्वतोपरी काळजी घेतली. भाषाशास्त्र आणि पुरातत्त्व, त्याचप्रमाणे भारतविद्येवरची सर्व नियतकालिके त्यांनी त्यांच्या पहिल्या अंकापासून जमवली आणि ग्रंथालय समृद्ध केले. महाविद्यालयाच्या सर्व विभागांना या बाबतीत त्यांची सारखीच वागणूक होती. पुरातत्त्वशास्त्र विभागाला आजही उत्खननासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व्हे ऑफ इंडियाच्या टोपोशीट्सचा  पूर्ण संचच्या संच त्यांनी मिळवला. वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांच्या पुस्तकसूचींकडे त्यांचे कायम बारकाईने लक्ष असायचे. उपयुक्त पुस्तकांवर खुणा करून ते त्या ग्रंथालयाकडे पाठवत असत. ग्रंथालयातली स्वच्छता आणि वेगवेगळ्या सुखकर सोयी यांकडे त्यांचे जातीने लक्ष असायचे. तिथल्या खुर्च्या, टेबले इ. गोष्टींतही त्यांचा दर्जाचा आग्रह असे. प्रा.डे यांची जवळजवळ तीन हजार पुस्तके केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळे महाविद्यालयाकडे आली. त्यांतली कित्येक अत्यंत मौल्यवान आणि दुर्मीळ आहेत. अशाच रीतीने त्यांनी अनेक दुर्मिळ हस्तलिखितेही मिळवली. संचालक म्हणून त्यांच्याकडे येणारी पुस्तके आणि नियतकालिके त्यांनी महाविद्यालयाला दिली, त्याखेरीज निवृत्तीनंतरही ११०० पुस्तके महाविद्यालयाला भेट दिली. डेक्कन महाविद्यालयामध्ये नियमित येणारी इण्डो-इराणियन-जर्नलची प्रत ही त्यांची वैयक्तिक प्रत आहे.

लौकिकानां हि साधूनां अर्थं वागनुवर्तते।

ऋषीणां पुनराद्यानां वाचमर्थोऽनुधावति ॥

हे वचन त्यांच्या बाबतीत सार्थ करणारी एक घटना इथे नोंदवायलाच हवी. डेक्कन महाविद्यालयाने पुणे विद्यापीठाकडून काही पुस्तके कर्जाऊ घेतली होती. हा संग्रह डेक्कन महाविद्यालयाकडे कायम राखण्यात त्यांना यश आले. ‘‘डेक्कन महाविद्यालयाकडून पुस्तके परत मागविण्यात येऊ नयेत; डेक्कन महाविद्यालयाला इतर महाविद्यालयांसारखी वागणूक देणे बरोबर होणार नाही. कारण, ही संस्था विद्यापीठाच्या दर्जाची आहे.’’ हे त्यांचे शब्द १९६१ चे आणि खरोखरीच त्यानंतर ३५ वर्षांनी, १९९६ मध्ये डेक्कन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळाला आणि ते अभिमत विद्यापीठ झाले.

२००५ ते २००६ हे या द्रष्ट्या महापुरुषाचे, डेक्कन  महाविद्यालयाच्या शिल्पकाराचे जन्मशताब्दी वर्ष होते.

डॉ. माधवी कोल्हटकर

कत्रे, सुमित्र मंगेश