Skip to main content
x

कुबल, अलका लाडू

           राठी चित्रपटसृष्टीत चित्रपटाने सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचे क्षण अनेक आले, पण त्याही पलीकडे चित्रपटगृहात वर्षभराहून अधिक काळ गर्दी खेचणारा चित्रपट म्हणजे अलका कुबल यांच्या अभिनयाने सजलेला, विजय कोंडके यांचा ‘माहेरची साडी’ हा चित्रपट होय. प्रामुख्याने महिला प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला असला, तरी या एकाच चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक उच्चांक गाठले. अलका कुबल यांना तारका बनवले, मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक चित्रपटांचा प्रवाह सुरू केला आणि राज्यभरातील प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये आणला.

अलका कुबल जन्मापासून मुंबईकर आहेत. त्यांचे वडील लाडू कृष्णा कुबल टाटा मिलमध्ये तंत्रज्ञ विभागात अधीक्षक म्हणून काम करत होते, तर आई सुमती या महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या दालमिया महाविद्यालयात प्रवेश घेतला व मानसशास्त्र या विषयात बी.ए.ची पदवी मिळवली. त्यांच्या घरात कलेची परंपरा नव्हती, तरीही सुरुवातीपासून या क्षेत्राकडे त्यांचा ओढा होता. त्यांनी मराठी रंगभूमीवर बालकलाकार म्हणून काम केले. ‘नटसम्राट’, ‘संध्याछाया’, ‘वेडा वृंदावन’ ही त्यांची नाटके गाजली होती. शाळकरी वयात त्यांनी या नाटकांचे सुमारे चारशे प्रयोग केले होते.

१९८१ साली ‘चक्र’ या चित्रपटाद्वारे अलका कुबल यांचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले. त्यानंतर ‘आपलं माणूस’ आणि ‘वटवट सावित्री’ अशी दोन नाटकेही त्यांनी केली. रुपेरी पडद्यावरचे त्यांचे पहिले महोत्सवी चित्र म्हणजे ‘लेक चालली सासरला’. हा चित्रपट राज्यभरात यशस्वी ठरला. त्यापाठोपाठ त्यांनी ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘दुर्गा आली घरा’, ‘माहेरची साडी’, ‘माहेरचा आहेर’, ‘देवकी’, ‘नवसाचं पोर’, ‘स्त्रीधन’ असे अनेक कौटुंबिक चित्रपट केले.

‘स्त्रीधन’ आणि ‘तुझ्यावाचून करमेना’ या चित्रपटातील अलका कुबल यांच्या भूमिका पुरस्कारप्राप्त ठरल्या. ‘श्रीमंत दामोदर पंत’ यासारख्या चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका स्वीकारून ‘कौटुंबिक चित्रपटांची नायिका’ या स्वत:च्या प्रतिमेला छेद देण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यांच्या बहुतांश चित्रपटांना महिला प्रेक्षकांनी अधिक प्रतिसाद दिला आहे. प्रामुख्याने कौटुंबिक आणि स्त्रीप्रधान चित्रपट ही त्यांची खासियत आहे. त्यांनी विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सोशिक कन्या, आज्ञाधारक सून, आदर्श पत्नी, प्रेमळ माता, वत्सल वहिनी, जाऊ, भावजय अशाच भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. अलका कुबल यांचा ग्रामीण भागातील प्रेक्षकवर्ग मोठा आहे.

मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या दशकांत सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, विनोदी, ग्रामीण, तमाशापट अशा विविध विषयांवर आधारित चित्रपटांच्या लाटा निर्माण झालेल्या दिसतात. त्यामध्ये अलका कुबल यांच्या अभिनयाने प्रामुख्याने कौटुंबिक, सामाजिक चित्रपटांना सुरुवात झाली. प्रामुख्याने माहेरची लाडकी लेक, विवाहानंतर सून, पत्नी, जाऊ, भावजय, वहिनी अशा विविध नात्यांनी बांधलेल्या नायिका साकारण्यात अलका कुबल यांचा हातखंडा मानला जातो.

          अभिनयाच्या क्षेत्रात सातत्याने तीस वर्षे कार्यरत असलेल्या अलका कुबल यांनी निर्मितिक्षेत्रातही पदार्पण केले आणि ‘सुवासिनीची सत्त्वपरीक्षा’, ‘नाते मामा-भाचीचे’, ‘अग्निपरीक्षा’ आणि अलीकडे तृतीयपंथीयांच्या समस्येवरील ‘आम्ही का तिसरे’ या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. ‘युगंधरा’, ‘अमृतवेल’, ‘बंदिनी’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘आकाशझेप’, ‘मंगळसूत्र’ या मालिकांत भूमिका केल्या.

सुमारे ३० वर्षांत त्यांनी अडीचशेहून अधिक मराठी चित्रपटांत काम केले आहे आणि आजही करत आहेत.

- जयश्री बोकील

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].