कुचन, गंगाधर सिदरामप्पा
गंगाधर सिदरामप्पा कुचन यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भूदेवी होते. बेताच्याच आर्थिक परिस्थितीत त्यांचे वडील हातमागावर कुटुंब चालवित होते. त्यामुळे गंगाधर यांचे शिक्षण अकरावी म्हणजे त्यावेळेच्या मॅट्रिकपर्यंतच होऊ शकले. त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षीच सोलापुरात आनंद विणकर कॉलनी उभी केली. हातमाग व्यावसायिक पद्मशाली समाजाला औद्योगिक क्षेत्राच्या मूळ प्रवाहात आणणे व त्यांची उन्नती करणे हे उद्दिष्ट घेऊन, गंगाधर कुचन यांनी प्रथम 1960 मध्ये नारायणराव कुचन प्राथमिक शाळा स्थापन करून परिवर्तनाला सुरुवात केली. तत्कालीन केंद्रीय योजना आयोगाचे उपाध्यक्ष धनंजयराव गाडगीळ यांना ते आपल्या गुरुस्थानीच मानत. त्यामुळे गाडगीळ यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता.
कुचन 1961 मध्ये सोलापूर जिल्हा विणकर समितीचे अध्यक्ष म्हणून काम करून लागले. ते 1964 मध्ये सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. ज्या उद्योगाला व कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते 1967 मध्ये यशवंत सहकारी सूतगिरणी तसेच 1972 मध्ये सोलापूर सहकारी सूतगिरणी या दोन संस्थांच्या रूपात आकार घेऊ लागले होते. याच काळात त्यांच्या सहकार क्षेत्रातील कर्तृत्वाची दखल घेऊन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल या महासंघावर त्यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. हे पद त्यांनी समर्थपणे व जबाबदारीने सांभाळले.
1970 च्या दशकात सोलापूर आणि आसपासच्या परिसरात हातमागावरच्या विणकरांचा व्यवसाय पद्मशाली समाजामध्ये फार जोरात होता. एकदा हातमागावर काम करणारा एक मजूर कापूस, सूताचे काम करता करताच बेशुद्ध पडला आणि कोमात गेला. या घटनेचा ओरखडा कुचन यांच्या मनावर उमटला आणि त्यांनी गरीब विणकर कामगारांसाठी 1972 मध्ये रुग्णालय बांधले.
कुचन यांनी 1980 मध्ये सोलापुरात आश्विनी सहकारी रुग्णालयाची स्थापना केली. त्याचवर्षी भोर येथील बंद पडलेली सूतगिरणी त्यांनी चालवावयास घेतली व ती यशस्वीपणे पुन्हा सुरू करून दाखवली. कुचन यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तरच्या दशकात स्थापन केलेल्या दोन सुतगिरण्यांनी तेरा हजार चात्यांचा प्रकल्प अल्पावधीतच पूर्ण केला. ती पुढे 25000 वर गेली. सोलापूरच्या हातमाग व यंत्रमागावर तयार झालेल्या जेकार्ड चादरीची लोकप्रियता जगभरात पसरली ती कुचन यांच्यासारख्या अभ्यासू आणि कुशल व्यावसायिक आणि जाणत्या संघटकामुळेच. सहकारी संस्था, कारखान्यांमध्ये कामगार कर्मचार्यांची संघटना असावी; परंतु ती कारखान्यातीलच नेत्याची असावी असे त्यांचे स्पष्ट मत होते.
सूतगिरणीला लागणारी रासायनिक द्रव्ये बाहेरून चढ्या दरात खरेदी करण्यापेक्षा आवश्यक रसायनांचे कारखानेच उभे करावे हा निर्णय घेऊन कॉस्टिक सोडा, स्टार्च, रंगरसायनाचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी सोलापूर अल्कली अँड केमिकल्स, अनंत स्टार्च प्रॉडक्टस् लि., व्यंकटेश्वर कलर केमिकल्स प्रा. लि. या कंपन्या उभारल्या.
गंगाधर कुचन यांनी आपल्या कारकीर्दीच्या 56 वर्षांत सोसायट्या, शैक्षणिक, वैद्यकीय संस्था अशा विविध संस्था उभ्या केल्या. ते महाराष्ट्र को-ऑप. स्पिनिंग मिल फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष होते. ते मजदूर फेडरेशनचेही संस्थापक होते. विमको हातमाग फेडरेशनची स्थापनादेखील त्यांच्या हातूनच झाली. पद्मशाली समाजाला आणि त्यांच्या हातमाग व्यवसायाला जगाच्या बाजारपेठेत आणि संस्कृतीतही गौरवशाली ओळख देण्याच्या कार्यातील मोजक्या अध्वर्यूंमधील गंगाधर कुचन हे एक आहेत. त्यांना 1979 मध्ये ‘विणकररत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.