Skip to main content
x

कुलकर्णी बाळकृष्ण

प्रभात फिल्म कं. या विख्यात कंपनीचे पाचवे भागीदार सीतारामपंत कुलकर्णी हे बाळकृष्ण कुलकर्णी यांचे मामा. कोल्हापुरात प्राथमिक शिक्षण झाल्यावर बाळकृष्ण कुलकर्णी पुढील शिक्षणासाठी पुण्याला मामाच्या घरी आले. स्वाभाविकच प्रभात स्टुडिओत त्यांचा राबता सुरू झाला. बी.एस्सी. झाल्यावर ते ‘प्रभात’मध्ये दिग्दर्शन विभागात दाखल झाले. यशवंत पेठकर दिग्दर्शित ‘आगे बढो’ व ‘अपराधी’ या दोन चित्रपटांना बाळकृष्ण कुलकर्णी साहाय्यक होते.

बाळकृष्ण कुलकर्णी ‘प्रभात’मध्ये उमेदवारी करत असतानाच सीतारामपंतांचा मोठा मुलगा सदाशिव याने चित्रपट काढण्याचे ठरवले. त्याच्यासाठी बाळकृष्ण कुलकर्णी यांनी विश्राम बेडेकरांच्या ‘ब्रम्हकुमारी’ नाटकावरून ‘उद्धार’ ही पटकथा लिहिली. देव आनंद व मुन्वर सुलताना यांना घेऊन बाळकृष्ण कुलकर्णी यांनी ‘उद्धार’चे चित्रीकरण सुरू केले, पण ते विषमज्वराने आजारी पडले. त्यामुळे चित्रीकरण रद्द झाले. त्यानंतर १९४८ साली संघबंदी आली, त्यात सत्याग्रह करून बाळकृष्ण कुलकर्णी तुरुंगात गेले. स्वाभाविकच तेव्हा सदाशिव कुलकर्णी यांनी ‘उद्धार’चे दिग्दर्शन करून चित्रपट पूर्ण केला. तोपर्यंत बाळकृष्ण तुरुंगातून सुटले. त्यांनी या चित्रपटाच्या संकलनाला थोडाफार हातभार लावला, पण ‘उद्धार’चे नाणे वाजले नाही.

‘अपराधी’नंतर सीतारामपंत कुलकर्णी यांनी ‘प्रभात’मधून आपली भागीदारी काढून घेतली. त्यामुळे बाळकृष्ण कुलकर्णी यांना ‘प्रभात’चे दरवाजे बंद झाले. पण सीतारामपंतांनी स्वतंत्रपणे चित्रपट काढायचे ठरवले. यासाठी सदाशिव यांनी ‘अमृत चित्र’ ही संस्था स्थापन केली. बाळकृष्ण दिग्दर्शक, सदाशिव ध्वनिलेखक आणि सदाशिव यांचा धाकटा भाऊ काशिनाथ छायालेखक, अशी ही घरची संस्था उभी राहिली. या संस्थेसाठी बाळकृष्ण कुलकर्णी यांना ‘उष:काल’ कादंबरीवर चित्रपट करायचा होता. पण सर्वानुमते ‘प्रतापगड’ हा ऐतिहासिक विषय घेतला गेला. कथा-पटकथा, संवाद, गीते ग.दि. माडगूळकर यांचे होते. सुधीर फडके यांनी संगीत दिले होते, बाळकृष्णांनी दिग्दर्शन केले. नवयुग-अमृत चित्र या बॅनरखाली ‘प्रतापगड’ (१९५२) निर्माण करण्यात आला. तो चांगलाच यशस्वी झाला. बाळकृष्ण, माडगूळकर व सुधीर फडके या त्रयीने ‘कुबेराचे धन’ (१९५३) हा दुसरा चित्रपट केला, पण हा चित्रपट चालला नाही. तिसरा चित्रपट विनोदी करायचा म्हणून अमृत चित्र संस्थेने फडके व माडगूळकर यांना घेऊनच ‘इन मिन साडे तीन’ (१९५६) हा चित्रपट केला. राजा परांजपे प्रमुख भूमिकेत होते. उत्तम विनोदी चित्र असूनही हा चित्रपटही चालला नाही. त्यानंतर सीतारामपंतांनी अमृत चित्र ही संस्था बंद करून टाकली. बाळकृष्ण कुलकर्णी काम शोधण्यासाठी मुंबईत आपल्या भावाकडे आले आणि माहितीपट निर्माण करू लागले. महाराष्ट्र सरकारसाठी त्यांनी ‘केशवसुत’, ‘राम गणेश गडकरी’ इत्यादी माहितीपट तयार केले. आचार्य अत्रे यांनी ‘केशवसुत’ व ‘गडकरी’ या दोन्ही माहितीपटांचे लेखन केले होते. नंतर बाळकृष्ण कुलकर्णी माहितीपट निर्मितीमध्ये रमले. चित्रपट दिग्दर्शनाकडे पुन्हा ते वळले नाहीत.

- सुधीर नांदगांवकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].