Skip to main content
x

कुलकर्णी, चंद्रमोहन वासुदेव

          पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे संकल्पन आणि चित्रकला यांत आपला वेगळा ठसा उमटवणारे चंद्रमोहन वासुदेव कुलकर्णी यांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात असल्याने त्यांचे बालपण स्वारगेट जवळील पोलीस लाइनमध्ये गेले. त्यांच्या आईचे नाव सुनंदा आहे. घरी चित्रकलेची पार्श्वभूमी नव्हती; परंतु त्यांना बालवयातच चित्रकलेची गोडी लागली व पुढे अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन ते १९७८ साली उपयोजित कलेची पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले.

          सुरुवातीस त्यांनी जाहिरात क्षेत्रात पुष्कळ काम केले; परंतु त्यात ते फार काळ रमले नाहीत. मुळातच वाचनाची आवड असल्याने त्यांनी प्रकाशन संस्थांमधून इलस्ट्रेशन्स करण्यास अधिक प्राधान्य दिले. मराठी नियतकालिकांसाठी केलेली कथाचित्रे आणि विभिन्न विषयांवरच्या पुस्तकांची मुखपृष्ठे यामुळे त्यांचे नाव साहित्यप्रेमी रसिकांना परिचित झाले आहे. अक्षररूपी साहित्यातील नेमका आशय पकडून तो दृश्यप्रतिमांमधून प्रभावीपणे सादर करण्याची देणगी त्यांना लाभली आहे.

          अनेक लेखक, कवी, प्रकाशक व चित्रकारांच्या सहवासामुळे त्यांची साहित्य व कलेची जाण प्रगल्भ होत गेली. कुलकर्णी यांच्यावर द.ग. गोडसे, र.कृ. जोशी, बाळ ठाकूर, पद्मा सहस्रबुद्धे, सुभाष अवचट, वसंत सरवटे यांच्या विचारसरणीचा प्रभाव अधिक पडला आहे.

          पुस्तकाच्या आशयानुसार मुखपृष्ठांचे संकल्पन आणि त्याचे चित्रांकन करण्याची परंपरा मराठीत होतीच. दलालांच्या चित्रांमधील शैलीची विविधता, सुभाष अवचटांच्या चित्रांमधले साहित्य-चित्रकलेतील आधुनिक प्रवाह, सरवटेंच्या चित्रांकनामागची वैचारिक, साहित्यिक जाण यांचा वारसा कळत-नकळतपणे चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या मुखपृष्ठकलेत आलेला आहे.

          साहित्याचा आशय समजून घेतल्यानंतर कुलकर्णी माध्यम आणि तंत्राची निवड करतात. वास्तववादी शैलीबरोबरच ते साहित्यकृतीतील मनोव्यापारांना अनुकूल अशी प्रतिमा-प्रतीके विरूपीकरणाच्या किंवा अमूर्त आकारांच्या अंगाने वापरतात. चंद्रमोहन कुलकर्णी यांची रेषा संवेदनक्षम आणि अर्थवाही आहे. जलरंग, पारदर्शक रंगाच्या वॉटरप्रूफ इंक्स, अपारदर्शक रंगांचा (पोस्टर कलर्स) ‘इंपॅस्टो’, जाड रंगलेपन पद्धतीने केलेला वापर यांतून त्यांची इलस्ट्रेटर म्हणून असलेली माध्यमांवरची हुकमत प्रत्ययाला येते.

          गरज पडेल तेव्हा ते छायाचित्रण, संगणकीय कला, सुलेखन इत्यादींचाही वापर करतात. उपयोजित चित्रकाराला मुद्रणाच्या तंत्रज्ञानाबद्दल, त्याच्या क्षमता आणि मर्यादांबद्दल सजग असावे लागते. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अक्षरमुद्रणातील मर्यादांपासून ते संगणक या माध्यमातल्या विविध शक्यतांपर्यंत सर्वांचा आपल्या कामामध्ये विविध प्रयोगांद्वारे कलात्मक उपयोग करून घेतलेला दिसतो. आजवर मराठीतील अनेक मान्यवर प्रकाशन संस्थांच्या मुखपृष्ठांची, नियतकालिकांमधील कथाचित्रांची अनेक कामे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेली आहेत.

          मराठी प्रकाशनांसाठी त्यांनी केलेली अनेक आशयचित्रे गाजली. तसेच मूळ विदेशी पुस्तकांच्या मराठी आवृत्तीसाठी केलेली मुखपृष्ठेही नावाजली गेली. इयान फ्लेमिंग लिखित ‘जेम्स बॉण्ड ००७’ च्या अनेक कादंबर्‍यांसाठी त्यांनी सुंदर आशयचित्रे केली आहेत. यांपैकी ‘गोल्ड फिंगर’, ‘यू ओन्ली लिव्ह ट्वाइस’ व ‘ऑक्टोपसी’ या पुस्तकांची मुखपृष्ठे, इयान फ्लेमिंग आणि जेम्स बॉण्ड, इंपीरिअल वॉर म्यूझियम, लंडन येथे इयान फ्लेमिंग शताब्दीनिमित्त भरवलेल्या त्यांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली. या सन्मानाप्रीत्यर्थ फ्लेमिंग कलेक्शन आणि कलात्मक ‘बॉण्ड बाउण्ड’मध्ये प्रकाशित केलेल्या ग्रीटिंग कार्ड व पोस्टकार्डसाठी २००८ मध्ये त्यांच्या चित्रांची निवड केली गेली.

          ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेस पब्लिकेशन्स तसेच लंडनच्या ऑक्स्फर्ड बुकवर्म्स लायब्ररी या इंग्रजी भाषेच्या जागतिक प्रसारार्थ प्रकाशित लघुकथा संग्रहांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी त्यांच्या चित्रांची निवड करण्यात आली आणि त्यासाठी त्यांना रेखांकनाचे विशेष कामही देण्यात आले.

          चंद्रमोहन कुलकर्णी गेली दहा वर्षे अभिजात चित्रकलेच्या क्षेत्रातही सातत्याने रचनाचित्रांची निर्मिती करत आले आहेत. त्यांना वास्तववादी कलेपेक्षा नवकलेत अधिक स्वारस्य आहे; कारण त्यातून मुक्तपणे मनातील विचार, भाव अभिव्यक्त करता येतात. आपल्या आजूबाजूला असणारा समाज, त्यातील माणसे, त्यांचे छोटे-छोटे व्यवसाय, आर्थिक स्तर, त्यांच्यातील नाते  त्यांना भावते. त्यांतील विसंगती, छोटे-छोटे कोपरे त्यांना पाहण्यात, अनुभवण्यात कुतूहल वाटते.  ते म्हणतात, ‘‘हे सर्व जे मी अनुभवले, पाहिले आहे, आणि त्याविषयी मला जे जे म्हणावेसे वाटते, ते ते मी चित्रकलेच्या भाषेतून अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.’’

          ‘कॉल ऑफ द सीज’ या चित्रमालिकेमध्ये त्यांनी अमर्याद निसर्ग आणि माणूस यांच्या नात्याचे चित्रण केले आहे. कोळी लोकांचे आयुष्य त्यांनी जवळून पाहिले, ते त्यांना जसे भावले तसे ते सर्व त्यांनी कॅनव्हासवर अभिव्यक्त केले. इथे अ‍ॅक्रिलिक रंगांच्या पारदर्शक व अपारदर्शक अशा दोन्ही गुणांचा नेमका उपयोग करून घट्ट रंगलेपनाबरोबरच पातळ, पारदर्शी रंगांचे ओघळ किंवा ‘फ्लो’ त्यांनी मोठ्या खुबीने सोडले आहेत. रंगलेपनातील धीट रांगडेपणा कोळ्यांच्या खडतर जीवनाशी सुसंगत वाटतो. ही चित्रमालिका पुस्तकरूपाने उपलब्ध आहे.

          याउलट बॅण्डवाला या मालिकेसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात मानवी शरीराचे विरूपीकरण केल्याचे दिसते. कुलकर्णी यांचे काही मित्र बॅण्डवाले आहेत. त्यामुळे त्यांनी बॅण्डवाल्यांचे आयुष्य जवळून पाहिले, अनुभवले आहे. त्यातील विसंगती त्यांना जाणवली. त्यांचा पोशाख एखाद्या राजाला साजेसा रंगीत, भरजरी असतो; पण त्यांचे आयुष्य मात्र करुणास्पद आहे. बॅण्डवाला कलावंत मनाचा माणूस आहे; पण तो कलावंत होऊ शकत नाही. बॅण्डवाल्यांच्या आयुष्यातील आशय व्यक्त करण्यासाठी चंद्रमोहन यांनी विरूपीकरणाचे तंत्र वापरले आहे. चेहर्‍याच्या मानाने शरीर खूप मोठे दाखवले आहे. त्यातून त्या गणवेशाचे, पर्यायाने व्यवसायाचे ओझे झाले असल्याचा आशय प्रकट होतो.

          २००५ मधील ‘चाइल्डहूड लॉस्ट’, ‘प्रकृती-पुरुष’, ‘अ ट्रॅजेडी कॉल्ड लव्ह’ या तीन विषयांवरील चित्रप्रदर्शने, तसेच रंगार्‍यांच्या जीवनावर आधारित २०१० मधील प्रदर्शन यांसारख्या माणसातील नाती दर्शवणार्‍या अनेक मालिका चंद्रमोहन कुलकर्णींनी चित्रित केल्या आहेत. आल्बेर काम्यू, सिमॉन द  बोव्हे यांसारख्या परभाषिक साहित्यिकांच्या रेखाचित्रांचे प्रदर्शनही त्यांनी भरवले होते. त्यांची पोस्टर्स आणि बुकमार्क्सही उपलब्ध आहेत. त्यांनी प्रत्येक चित्रमालिकेसाठी वेगळे तंत्र वापरले आहे. कधी वास्तववादी, कधी विरूपीकरणाचे तर कधी प्रतीकात्मकतेचे. तीच गोष्ट माध्यमांची. ते विशिष्ट माध्यमातच अडकून पडत नाहीत. त्यांच्या दृष्टीने चित्रातील विचार प्रमुख आहे व तो समर्थपणे अभिव्यक्त करण्याच्या दृष्टीने ते त्यास पूरक ठरतील अशा तंत्र व माध्यमांचे संयोजन करतात. 

          कॉपीराइटिंगपासून, सुलेखनकला, मुद्राक्षरकला, संपादकीय कला (एडिटोरिअल आर्ट), आरेखन कला  (ग्रफिक आर्ट), संगणकीय आरेखन (डिजिटल ग्रफिक्स), छायाचित्रणापासून ते शिल्पकला, चित्रकलेपर्यंत सर्वच क्षेत्रांत त्यांना सारखीच आत्मीयता व रस आहे.

          मराठी साहित्य ज्या चित्रकारांनी आपल्या मुखपृष्ठांद्वारे अधिक आस्वाद्य केले आणि साहित्यकृतीच्या वाङ्मयीन रूपाला ज्यांनी एक नवी दृश्य ओळख दिली, त्या मोजक्या चित्रकारांमध्ये चंद्रमोहन कुलकर्णी यांचे नाव घ्यावे लागेल.

- सागर पानसरे

कुलकर्णी, चंद्रमोहन वासुदेव