कुलकर्णी, दत्ता केशव
लेखक - दिग्दर्शक दत्ता केशव हे चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचे नाव आहे. दत्ता धर्माधिकारींचे साहाय्यक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि जवळपास ३०-३५ वर्षे चित्रपट क्षेत्रात स्वतंत्र वाट निवडली. त्यांच्या आईचे नाव शांताबाई, वडील केशव कुलकर्णी बेळगावला रेशीम कारखान्यात काम करत होते. त्यामुळे दत्ता यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावलाच झाले. पुढे मात्र मोठा भाऊ वसंत कुलकर्णी यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्याला बोलावून घेतले. त्यामुळे दत्ता केशव यांचे पुढील शिक्षण पुण्याला भावे स्कूलमध्ये झाले. दरम्यान वडील आजारपणात मृत्यू पावले आणि त्यांचे शिक्षण संपुष्टात आले.
दिवसभरात लाँड्रीत इस्त्री करण्यापासून दुकानात विक्रेता म्हणून काम करण्यासारखी अनेक छोटी कामे ते करत असत. पुण्याच्या जोशी बुक सेलर्सकडे त्यांनी विक्रेता म्हणून नोकरी केली आणि दैवयोगाने १९६६ साली जोशी यांनी दत्ता केशव कुलकर्णी यांनी लिहिलेले पहिले पुस्तक छापले, ते ‘दैव लाभला चिंतामणी’ हे नाटक. या काळात कृषी महाविद्यालयात फळ, भाजी विक्रेता म्हणून ते काम करत होते. त्यांचा मोठा भाऊ वसंत कुलकर्णी प्र.के. अत्रे यांच्या नाटकात काम करत असत. ते गायकही होते. शिवाय या काळात घरातल्या वातावरणामुळे नामवंत साहित्यिक प्र.के. अत्रे, ग.ल. ठोकळ, य.गो. जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, दत्त रघुनाथ कवठेकर यांच्याशी दत्ता केशव यांच्या ओळखी होत गेल्या. १९५० साली दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘आल्हाद चित्र’ संस्थेत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बाळा जो जो रे’, ‘चिमणी पाखरं’, ‘महात्मा’, ‘सुहागन’, ‘सावधान’ अशा अनेक चित्रपटांना साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते लाभले. दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटाचे लेखन मधुसूदन कालेलकर यांनी केले होते.
या काळात दत्ता केशव यांची मधुसूदन कालेलकरांबरोबर ओळख झाली आणि पुढच्या काळात कालेलकरांनी लिहिलेल्या ‘आम्ही जातो अमुच्या गावा’, ‘एक धागा सुखाचा’, ‘क्षण आला भाग्याचा’ या चित्रपटाचे साहाय्यक लेखक म्हणून काम केले. काही काळ हिंदी चित्रपटसृष्टीतले लेखक दिग्दर्शक पी.एल. संतोषी यांच्याबरोबरही लेखन, दिग्दर्शन साहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. तसेच पं. मुखराम शर्मा यांच्याकडेही साहाय्यक लेखक म्हणून काही चित्रपटांसाठी काम केले.
दत्ता केशव यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘अति शहाणा त्याचा.’ (१९६७) त्या वेळेस हा चित्रपट मराठी आणि भोजपुरी भाषेत करण्यात आला होता. पुढे ‘बायांनो नवरे सांभाळा’ हा चित्रपट १९७४-७५ साली प्रदर्शित झाला. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दत्ता केशव यांचे होते. ‘पिंजरा’नंतरचा हा मराठी रंगीत चित्रपट होता. चित्रपटाच्या आर्थिक गणिताचा विचार करत अनेक मान्यवर दिग्दर्शक, निर्माते रंगीत चित्रपटाच्या वाटेला जात नसत. (अपवाद व्ही. शांताराम यांचा) पण दत्ता केशव यांनी मोठ्या जिद्दीने, योग्य बजेटमध्ये हा चित्रपट काढला. निर्माते होते ना.गो. दातार. मुंबईच्या मेट्रो चित्रपटगृहात हा चित्रपट खूप चालला. चित्रपटाला महाराष्ट्र राज्य शासनाचे दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक मिळाले. या चित्रपटातून जयश्री टी. यांनी प्रथमच नायिका म्हणून भूमिका केली. गिरीश कर्वे यांनाही या चित्रपटासाठी उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून पारितोषिक प्राप्त झाले. ‘भिंगरी’, ‘फटाकडी’, ‘मोसंबी नारिंगी’ हे दत्ता केशव लिखित, दिग्दर्शित सर्व चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरले.
आपल्या चित्रपट कारकिर्दीत दत्ता केशव यांनी जवळपास ४० चित्रपटांचे लेखन केले, तर २७ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘गडबड घोटाळा’, ‘आई थोर तुझे उपकार’ हे त्यापैकी त्यांनी लिहिलेले काही चित्रपट.‘सेनानी साने गुरुजी’ या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला इराण सरकारतर्फे विशेष पारितोषिक मिळाले.
‘धमाल बाबल्या गणप्याची’ हा दत्ता केशव यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट. चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशा बाजू सांभाळताना काही मोजक्या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिका केल्या. ‘चिमणी पाखरं’, ‘नन्हे मुन्हे’ या चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून काम केले. साधारण ५०-६० चित्रपटांसाठी गीतलेखनही केले. ‘राणीने डाव जिंकला’, ‘सावली प्रेमाची’, ‘दे टाळी’ हे त्यापैकी काही चित्रपट.‘दैवे लाभला चिंतामणी’ या नाटकात त्यांनी लेखनासह अभिनय केला. ‘माझा कुणा म्हणू मी’, ‘रात्र थोडी सोंगे फार’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नाटकांशिवाय ‘मवाली’ हे झोपडपट्टी या विषयाला वाचा फोडणारे नाटकही त्यांनी लिहिले.
नाटकासाठी त्यांना आचार्य अत्रे पारितोषिक, राम गणेश गडकरी पारितोषिक, गोविंद बल्लाळ देवल पारितोषिक मिळाले. याशिवाय १९६६ ते १९७० या काळात शरद पिळगावकर यांच्या ‘नवरंग’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून ते काम पाहत होते. या काळात राज कपूर, सुलोचना, दत्ता धर्माधिकारी, पु.ल. देशपांडे, सुधीर फडके, सुबल सरकार, मधुसूदन कालेलकर यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांचे ‘कलाकोंदणातील हिरे’ हे पुस्तक आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांचे ४ कथासंग्रह यापूर्वीच प्रकाशित झाले आहेत. ‘मृत्यूचा जन्म’, ‘शापित’, ‘ज्वालामुखी’, ‘धवलकीर्ती धर्माधिकारी’, ‘वनवास’ अशा ४ कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या आहेत.
याशिवाय ११ धारावाहिक मालिका त्यांनी लिहिल्या आहेत. पटकथा-कथा-संवाद आणि काही गाण्यासह ‘संत तुकाराम’ ही दूरदर्शनवरील मालिकाही त्यांनी लिहिली आहे. ‘रिश्तेकी दीवार’ आणि ‘एक और एक ग्यारा’ या हिंदी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या चतुरस्र कलाकाराला स्क्रीन रायटर्स असोसिएशनतर्फे बेस्ट स्क्रिप्टिंगसाठी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र शासनातर्फेही चित्रपट दिग्दर्शनातल्या भरीव कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तीन मुले आणि तीन सुना व एक मुलगी असा दत्ता केशव यांचा संपूर्ण परिवारही चित्रपट, नाट्य आणि दूरदर्शन माध्यमांतल्या विविध कलाक्षेत्रात कार्यरत आहे.
- संपादित
२) प्रत्यक्ष मुलाखत.