Skip to main content
x

कुळकर्णी, दत्तात्रेय भिकाजी

     दत्तात्रेय भिकाजी कुळकर्णी यांचा जन्म भिकाजी व सरस्वतीबाई ह्या दांपत्यांच्या पोटी गुरुपौर्णिमेला नागपुरात झाला. प्राथमिक शिक्षण हम्पयार्ड प्राथमिक शाळा, घाटे शाळा, सुळे शाळा येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल येथे पूर्ण झाले. बी.ए.पर्यंतचे पदवी शिक्षण धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे १९५५ साली पूर्ण करून त्यानंतर १९५९ मध्ये नागपूर विद्यापीठाची एम.ए. (मराठी) पदवी त्यांनी बेहरे सुवर्ण पदकासह प्राप्त केली. पुढील शैक्षणिक प्रवासात १९६७ मध्ये ‘महाकाव्य’ या विषयावर प्रा.भ.श्री.पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. उपाधी त्यांना मिळाली. १९७६ मध्ये रशियन भाषा पदविकाही त्यांनी प्राप्त केली. १९८३मध्ये विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या परीक्षा समितीने डी.लिट. समकक्ष ‘साहित्य वाचस्पती’ ही उपाधी देऊन त्यांच्या उत्तुंग वाङ्मय संशोधन कार्याचा गौरव केला. १९६४ ते १९९४ अशी ३१ वर्षे नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. तत्पूर्वी नागपूरला व मुंबईला पब्लिसिटी विभागात सहसंपादक; विकास नाइट कॉलेज, नागपूर येथे शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. १९६० ते १९६४ या काळात कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम बघितले व नंतर अध्यापन कार्य आणि समीक्षा लेखन यांचा परस्परानुकुल घनिष्ठ अनुबंध कुलकर्णींच्या संदर्भात महत्त्वाचा ठरतो. या परस्परजीवी अनुबंधाचे अधिष्ठान त्यांच्या व्यासंगी, व्रतस्थ साहित्य समीक्षेला व त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या  जडण-घडणीला लाभले आहे. ५५ च्या सुमारास यशवंत, जूलियन व केशवसुत यांच्या आईविषयक कवितांवरील ‘आई: दोन कविता’ तुलनात्मक टिपण त्यांनी वयाच्या विशीत, नाइट कॉलेजमध्ये इंटरला अध्यापनकार्य करताना लिहिले. पुढे रेग्यांच्या ‘छंद’मध्ये प्रकाशित हा दभिंचा पहिला समीक्षालेख.

दभिंच्या घडणीचा आलेख-

     समीक्षा लेखनापूर्वीच शालेय जीवन प्रवासात लघुनिबंध, कथा आणि कविता या माध्यमांतून त्यांच्या वाङ्मयसेवेला सुरुवात झाली होती. १९५३मध्ये वयाच्या केवळ १९व्या वर्षी एका आंतरराष्ट्रीय लघुकथा स्पर्धेत त्यांच्या ‘रेक्वियम’ या कथेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. त्याच काळात विविध नियतकालिकांतून त्यांच्या कथा व कविता प्रसिद्ध होत होत्या. ६०च्या सुमारास सत्यकथा, महाराष्ट्र साहित्य परिषद, प्रतिष्ठान या वाङ्मयीन नियतकालिकांतून महत्त्वपूर्ण समीक्षालेख प्रसिद्ध होऊ लागले व दभिंना समीक्षक म्हणून मान्यता मिळू लागली. आपल्या वाङ्मयीन जडणघडणीचा सुस्पष्ट आणि सुंदर आलेख दभिंनी त्यांच्या ‘अपार्थिवाचे चांदणे’ या ललित निबंधसंग्रहात काढला आहे. अत्यंत काटेकोर, वस्तुनिष्ठ, शुद्ध वाङ्मयीन, कलाकृतिनिष्ठ, सुगम, लालित्यपूर्ण अशा समीक्षेने अल्पावधीतच त्यांचे नाव मराठी समीक्षेच्या प्रांतात मान्यता पावले. प्राचीन व अर्वाचीन वाङ्मयातील विविध प्रवृत्ती-प्रवाहांवर त्यांनी सारख्याच आस्थेने व व्यासंगपूर्ण पद्धतीने टीकालेखन केले. प्रारंभी ‘टिपण-टीकाकार’ असाही त्यांच्या समीक्षेचा निर्देश (ठणठणपाळ- जयवंत दळवी) करण्यात आला होता. या संदर्भात त्यांचे नाते वा.ल.कुलकर्णी यांच्याशी जुळते. अध्यापन व समीक्षा समांतरपणे होत जाणे, हा दुवा या समानतेमागे असावा. त्यांचे पहिले वाङ्मयीन प्रकाशन १९५९ मध्ये ‘रेक्वियम’ या कथासंग्रहाच्या रूपात (नवलेखन प्रकाशन, नागपूर) झाले. त्यांच्या आजवर प्रकाशित ललित साहित्यात ‘मेघ, मोर आणि मैथिली’(१९७८, विजय प्रकाशन, नागपूर), ‘अपार्थिवाचे चांदणे’ (१९९९, पद्यगंधा प्रकाशन, पुणे), ‘पस्तुरी’ (२००२, पद्यगंधा प्रकाशन, पुणे) व ‘स्फटिकगृहीचे दीप’(२००८, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई) हे चार ललित निबंधसंग्रह व ‘मेरसोलचा सूर्य’ (२००४, आकांक्षा, नागपूर) हा काव्यसंग्रह समाविष्ट आहेत. ‘आठवणी-अनुभव’, ‘लघुनिबंध’, ‘व्यक्तिचित्रे’ आणि ‘ललितलेख’ ह्या चार प्रकारात त्यांनी उल्लेखनीय असे ललित निबंध-लेखन केले आहे. समीक्षक या उपाधीप्रमाणेच ‘ललित निबंधकार’ हीसुद्धा दभिंची ओळख बनावी असे सकस, समृद्ध व पृथक शैलीचे ललितगद्य त्यांनी लिहिले आहे. ‘बैरागी हृदयनाथ’, ‘रवींद्रनाथ’, ‘खांडेकर’, ‘जयवंत दळवी’, ‘व्यंकटेश माडगूळकर’, ‘म.मु.देशपांडे’ इत्यादींची दभिंनी रेखाटलेली व्यक्तिशब्दचित्रे अत्यंत पृथगात्म, मनोज्ञ व अल्पाक्षर रमणीय अशी वठली आहेत. ‘स्फटिकगृहीचे दीप’मधील लघुललित लेखही आशयघन निर्मितीची साक्ष ठरतात.

समीक्षा लेखनाचा व्यापक पैस-

     दभिंचा पहिला समीक्षा लेखसंग्रह ‘दुसरी परंपरा’ १९७४ मध्ये नागपूरच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केला. त्यानंतर आजवर ‘महाकाव्य स्वरूप व समीक्षा’(१९७५), ‘ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद’(१९७६), ‘पहिली परंपरा’(१९७६), ‘तिसर्‍यांदा रणांगण’(१९७६), ‘चार शोधनिबंध’(१९७७), ‘पार्थिवतेचे उदयास्त’(१९७७), ‘नाट्यवेध’(१९७८), ‘मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुन:स्थापना’(१९८२), ‘प्रतीतिविश्रांती’(१९९२), ‘दोन परंपरा’(१९९३), ‘युगास्त्र’(१९९३), ‘द्विदल’(१९९४), ‘हिमवंतीची सरोवरे’(१९९६), ‘पहिल्यांदा रणांगण’(१९९९), ‘महाकाव्य स्वरूप व समीक्षा’(परिष्कृत आ.२००१), ‘कादंबरी स्वरूप व समीक्षा’(२००३), ‘समीक्षेची सरहद्द’(२००५), ‘सुरेश भट नवे आकलन’(२००५), ‘प्रतीतिभेद’(२००७), ‘प्रतीतिविश्रांती ज्ञानदेवांची’(२००८), ‘महाकथा जीएंची’(२००८), ‘समीक्षेची वल्कले’(२००८), ‘नाटक स्वरूप व समीक्षा’(२००८) हे त्यांचे समीक्षाग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यांपैकी ‘महाकाव्य’, ‘दोन परंपरा’, ‘प्रतीतिविश्रांती’ ही नवी परिष्करणे, ‘महाकथा जीएंची’ हे जीएंसंबंधित संकलन तर ‘हिमवंतीची सरोवरे’ हे समीक्षा लेखांचे प्रातिनिधिक संकलन आहे. याशिवाय काही संपादनेही त्यांच्या नावावर आहेत. ‘हिमवंतीची सरोवरे’ या पुस्तकात त्यांच्या अत्रतत्र प्रकाशित ५००हून अधिक स्फुट लेखांची सूची दिली आहे. ‘समीक्षेची सरहद्द’ व ‘प्रतीतिभेद’ ही समीक्षेची मानली जाणारी पुस्तके समीक्षेची सरहद्दही ओलांडून ललितनिबंधाच्या (व्यक्तिचित्रण इत्यादी) प्रदेशात शिरली आहेत. दभिंच्या एकूणच लेखनात मीत्वप्रधान, ललितनिबंध आणि विषयवस्तुप्रधान मूल्यमापनात्मक समीक्षा यांची सरमिसळ झालेली दिसते. दभिंच्या आजवरच्या समीक्षा लेखनाचा व्यापक पैस स्तिमीत करणारा आहे. प्राचीन ते अर्वाचीन, आधुनिक ते नव, नव ते साठोत्तरी, साठोत्तरी ते आजचे ताजे मराठी साहित्य असा तो पसरलेला आहे. दभिंच्या समीक्षा-संप्रदायाचे वर्णन ‘कलावादी’, ‘अलौकिकतावादी’, ‘आध्यात्मिक जीवनवादी’, ‘नवअलौकिकतावादी’, ‘कलावाद-जीवनवाद यांचा समन्वय’, अशा विविध शब्दांनी आजवर केले गेले आहे. परंपरेचा आणि नवतेचा वाङ्मयीन सौंदर्यनिष्ठ असा सम्यक समन्वय दभिंच्या समीक्षा व्यापारात दिसतो. भारतीय साहित्यशास्त्रातील वाङ्मयविषयक भूमिकेचे अधिष्ठान दभिंच्या समीक्षेला लाभले आहे. संत ज्ञानेश्वर व ज्ञानेश्वरी, भारतीय साहित्यशास्त्र, महाकाव्य, मर्ढेकर व त्यांचे सौंदर्यशास्त्र, जी.एंची कथा, संपूर्ण आधुनिक मराठी कविता हे त्यांचे खास ध्यासविषय आहेत. निष्ठायुक्त व्यासंग, मर्मग्राही चिकित्सक वृत्ती, सौंदर्यशोधक अभिजात रसिकता, विशुद्ध वाङ्मयनिष्ठा, वाद-विचार-प्रणाली निरपेक्षता, नव्या प्रतिभांतील नवसर्जनाचे रूप हेरण्याचे कौशल्य, नवचिंतनाची गंभीर मांडणी, आधुनिकतेचे भान आणि परंपरेची जाण, वाङ्मयीन तत्त्वचिंतनाची पक्की बैठक आणि ललितरम्य सुगठित सुबोध शैली इत्यादी गुण-वैशिष्ट्यांनी दभिंची समीक्षा संपृक्त आहे. म.द.हातकणंगलेकरांनी दभिंना मर्ढेकर आणि दि.के.बेडेकर ह्यांच्या नंतरचे महत्त्वाचे समीक्षक मानले आहे, तसेच मर्ढेकर, बेडेकर आणि वा.ल.कुलकर्णी ह्या तिघांच्या समीक्षा गुणांचा संगम त्यांच्या समीक्षा दृष्टीत आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण समीक्षेने त्यांनी मराठी वाङ्मविश्वातील चैतन्य जपण्याचा आणि मराठी साहित्य जगत समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्या समीक्षेची प्राचीन आणि अर्वाचीन, सैद्धान्तिक आणि उपयोजित, संशोधनपर आणि आस्वादक अशी विभागणी करता येते. त्याच प्रकारे वाङ्मयकारनिष्ठ (ज्ञानेश्वर, मर्ढेकर, जी.ए, सुरेश भट), वाङ्मयकृतिनिष्ठ (रणांगण, ज्ञानेश्वरी व अनेक समीक्षणात्मक लेख), प्रवृत्ती-प्रवाह-संप्रदायनिष्ठ (दोन परंपरा, पार्थिवतेचे उदयास्त) आणि वाङ्मयप्रकारनिष्ठ (महाकाव्य, कादंबरी, नाट्यवेध, नाटक स्वरूप व समीक्षा, दोन परंपरा) इत्यादी प्रकारांनीही त्यांच्या समीक्षालेखनाचा आलेख मांडता येतो.

     दभिंना आजवर विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांच्या काही ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचे व अन्य संस्थांचे साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १९९७ मध्ये मा.दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा ५० हजार रुपयांचा पुरस्कार, १९९७ लाच महाराष्ट्र शासनाचा समाजव्रती पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी सन्मान त्यांना मिळाले. विदर्भ साहित्य संमेलन, १९८६ अभिजात साहित्य संमेलन, १९९४; नागपूर जिल्हा साहित्य व नाट्यसंमेलन, १९८१ नागपूर विद्यापीठ, मराठी प्राध्यापक परिषद, १९९१ अमरावती विद्यापीठ, मराठी प्राध्यापक परिषद, १९९० या संमेलनांची व परिषदांची अध्यक्षस्थाने त्यांनी भूषविली.

     १९८५ साली ‘समकालीन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह’ व २००८मध्ये ‘समीक्षेची क्षितिजे’ अशा दोन गौरवग्रंथांचे भाग्य दभिंच्या वाट्याला आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २६ विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्राप्त झाली आहे. अनेक वर्षे नागपुरात वास्तव्याला असलेले द.भि. गेल्या काही वर्षांपासून पुण्याला स्थायिक झाले आहेत. त्यांच्या दोन्ही गौरवग्रंथांतून दभिंच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा उत्तुंग आलेख पाहायला मिळतो.

२०१६ साली त्यांचे निधन झाले. 

- डॉ.राजेंद्र नाईकवाडे

कुळकर्णी, दत्तात्रेय भिकाजी