Skip to main content
x

कुलकर्णी, कृष्णाजी पांडुरंग

राठी भाषेतील व्युत्पत्तीशास्त्रांचे शिल्पकार समजले जाणारे ज्येष्ठ समीक्षक कृ.पां.कुलकर्णी या नावाने मराठी साहित्य विश्वात ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ओंड हे त्यांचे मूळ गाव होय. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या शिक्षणात खूप अडथळे आले. इस्लामपूर, आत्ताच्या सांगली जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. पण शिक्षण मात्र निगडी, फलटण, नाशिक, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यासाठी त्यांना अनेकांनी आश्रय आणि आधार दिला. कोल्हापुरात शिष्यवृत्ती मिळाल्याने ते तेथूनच १९११ साली मॅट्रिक्युलेशनची परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर व फर्गसन महाविद्यालय, पुणे येथे झाले. १९१६ साली बी.ए.झाल्यावर लगेच त्यांना पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. पुढच्याच वर्षी त्यांना सरकारी शाळेत नोकरी मिळाली. त्यासाठी त्यांना धुळे येथे जावे लागले. कालांतराने त्यांची सातारा येथे बदली झाली. सातारच्या वास्तव्यात त्यांनी नोकरी करीत एम.ए.चा अभ्यास केला. पदवी प्राप्त होताच मुंबई येथे जाऊन त्यांनी त्या वेळची शिक्षण खात्यातली बी.टी. पदवी संपादन केली. या वेळी प्र.के.अत्रे व वि.द.घाटे हे पुढच्या काळात ख्यातनाम झालेले मराठी साहित्यिक त्यांचे सहाध्यायी होते.

प्रारंभीच्या काळात शिक्षणासाठी व नोकरीसाठी अनेक ठिकाणी फिरावे लागलेल्या कुलकर्णी यांना १९२०च्या सुमारास अहमदाबादच्या गुजरात महाविद्यालयामध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली व त्यांच्या जीवनात काहीसे स्थैर्य आले. १९२९ साली त्यांची नेमणूक रियासतकार गो.स.सरदेसाई यांचे मदतनीस म्हणून झाल्यावर ते इतिहास संशोधनाकडे वळले. मात्र तत्पूर्वीच त्यांची साहित्यिक व भाषाशास्त्रज्ञ म्हणून ओळख झाली होती. १९२५ साली ‘भाषाशास्त्र व मराठी भाषा’ हा त्यांचा पहिला समीक्षात्मक व संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘संस्कृत नाटक व नाटककार’ (१९२६), ‘मराठी भाषा: उद्गम व विकास’ (१९२९) या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. १९३३ मध्ये पेशवे दप्तराचे काम संपल्यावर पुन्हा ते अध्यापनाकडे वळले. मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये त्यांची खास नेमणूक झाली. १९३७ ते १९४९ अशी बारा वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर ते ५८व्या वर्षी शासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतरही त्यांनी मुलुंडच्या टोपीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून व रुपारेल महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले. १९५९ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती स्वीकारली.

दरम्यानच्या काळात व्याकरण, समीक्षा, संशोधन, भाषाशास्त्र इत्यादी क्षेत्रांत त्यांचे मोठे नाव झाले होते. मराठीतील दीपस्तंभ ठरावा असे त्यांचे काम म्हणजे ‘व्युत्पत्तिकोश’ हे होय. या कोशाच्या माध्यमातून त्यांनी हजारो मराठी शब्दांची व्युत्पत्ती सांगून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. आजही त्यांचा ‘मराठी व्युत्पत्तिकोश’ या क्षेत्रातला पायाभूत ग्रंथ मानला जातो. या कामामुळे त्यांना ‘मराठी भाषेतील पाणिनी’ असे काहींनी गौरवाने संबोधले. ‘वाग्यज्ञ’, ‘विवेकसिंधू’, ‘महाराष्ट्र गाथा’ हे त्यांचे आणखी काही गाजलेले ग्रंथ होत. ‘कृष्णाकाठची माती’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रांजळ कथन, साहित्य समृद्धीसाठी त्यांनी घेतलेले अपार परिश्रम आणि मराठी भाषेची सेवा यांसाठी प्रसिद्ध आहे.

१९५२ साली अमळनेर येथे झालेल्या ३५व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी भाषिक प्रांत-रचनेचा जोरदार पुरस्कार केला. ते म्हणाले, “प्रांताचा सर्व कारभार मराठीतच झाला पाहिजे. ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांत लक्ष घातले पाहिजे. मराठी भाषा व वाङ्मय ह्यांच्या संरक्षणासाठीच नव्हे तर ती वाढविण्यासाठी वाङ्मयीन संस्था व सरकार यांनी उत्तेजन दिले पाहिजे. असे झाले तरच आपण ‘आपण’ म्हणून राहू.”

आचार्य अत्रे यांनी समकालीन लेखकांवर टीका केली. मात्र कृ.पां.कुलकर्णी यांचा ज्ञानाच्या क्षेत्रातील अधिकार अत्र्यांनी मान्य केला होता. मराठी विश्वकोशात फारच थोड्या व्यक्तींवर स्वतंत्र नोंद असून त्यात कृ.पां.कुलकर्णी यांचा समावेश आहे. विश्वचरित्र कोशातही त्यांच्यावर नोंद आहे.

- मधू नेने

 

 

कुलकर्णी, कृष्णाजी पांडुरंग