Skip to main content
x

कुलकर्णी, लक्ष्मण पांडुरंग

         क्ष्मण पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात गुगळी धामणगाव या खेड्यात झाला. त्यांनी कृषी क्षेत्रातील पीएच.डी. पदवी मिळवली. त्यांनी प्रथम कृषी खात्यात शैक्षणिक विभागात नोकरी केली. त्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषि-वनस्पतिशास्त्र हा विषय शिकवला आणि अनेक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

         कुलकर्णी यांनी ज्वारीच्या वाणावर केलेले संशोधन कार्यही महत्त्वाचे आहे. ज्वारीच्या वाणावर अ‍ॅक्टिव्ह ले२ चा जादा उपयोग केल्यास वाढीच्या काळात त्याचा उपयोग होऊन, त्या वाणाच्या उत्पादनात वाढ होते, तसेच ज्वारीच्या पानातील रेषा बारीक असल्यास त्या वाणाच्या उत्पादनातही वाढ होते, कारण वाणातील द्रव्य पानातून कणसात जोरात वाहत असते. तसेच वाणाच्या कणसात जास्त टपोरे दाणे असल्यास ज्वारीच्या वाणाचे धान्य व कडब्याचे उत्पादनही वाढते. थंडीत १४ अंशाच्या खाली तपमान असल्यास रब्बी ज्वारीच्या पानावर साखर रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्या वेळी पानावर २-४ डीची फवारणी केल्यास रोग नाहीसा होतो व ज्वारीचे उत्पादन वाढते, हे त्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे दाखवले. वर्‍हाडी ज्वारीवर १०० पीपीएम ओंकरिक आयएए संप्रेरकाची फवारणी केल्यास ज्वारीच्या दाण्यावरील बुरशीचे प्रमाण कमी होऊन ज्वारीची उगवणशक्ती वाढते, हेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. कोरडवाहू रब्बी ज्वारीचा एम३५-१ वाण वेळेवर पेरणी केल्यास त्याचे उत्पादन जास्त येते. तसेच इतर रब्बी वाण सी.एस.एच. ८ आर आणि एस.पी.व्ही. ८६ यांना योग्य वेळी पाणी दिल्यासही उत्पादनात वाढ होते. कुलकर्णी यांना एस.पी.व्ही.२९७ आणि एस.एच.वन वाणाच्या प्रयोगात असे आढळून आले की, शेतात योग्य संख्येने खोडे ठेवल्यास व जास्त पानाचे क्षेत्रफळ असल्यास आणि जास्त दाणे वाणात असल्यास उत्पादन वाढते. तसेच त्याची खोलवर पेरणी केल्यास ज्वारीच्या बियाण्याची उगवणशक्तीही वाढते. ज्वारीचा संकरित वाण सी.एस.एच.-५ हा वापरल्यास तो जास्तीत जास्त उत्पादन देतो. त्याच्या कडब्याचे वजन जास्त असते आणि कणसात फुलांचे प्रमाण जास्त आढळून आले. ते टपोरे असून त्यांचे वजनही जास्त असते.

         कुलकर्णी यांनी ज्वारीच्या संशोधनाबरोबर भुईमूग, कापूस आणि सूर्यफूल या पिकांवरही संशोधन केले. उन्हाळी भुईमूग शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास, खरीप पिकांपेक्षा त्याचे उत्पादन १.५ ते २ पटीने वाढते, कारण उन्हाळ्यात पिकांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. म्हणून ओलिताची हमखास सोय असल्यास लागवड उन्हाळी हंगामात करावी लागते, हे त्यांना संशोधनाअंती आढळले. या वेळी कीड व रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो.

         त्यांनी सूर्यफुलास संकरित वाण एलडीएमआरएसएस मॉर्डेन, सी-६८४१४, एसएस५६ या सर्व वाणांवर गळीत धान्य संशोधन केंद्र, लातूर येथे संशोधन केले. सर्व हंगामात व क्षारयुक्त जमिनीतही या पिकाचे उत्पादन घेता येते, हा निष्कर्ष त्यांच्या संशोधनातून पुढे आला. त्यांनी भुईमूगात-आय सी जी एल ११, एन-१३, एलजीएन-२, सूर्यफुलात-एस ५६, एलएस-११, करडईत शारदा या वाणांची शिफारस करण्यात मदत केली.

- विनया वाळिंबे

कुलकर्णी, लक्ष्मण पांडुरंग