Skip to main content
x

कुमार, एल. एस.एस

ल.एस.एस.कुमार हे ब्रिटिशकालीन भारत सरकारचे आर्थिक वनस्पतिशास्त्रज्ञ होते. त्यांनी लंडन येथून एम.एस्सी. व डी.आय.सी. या पदव्या मिळवल्या. तसेच त्यांनी एफ.एन.आय., एफ.ए.एस्सी. याही पदव्या परिश्रमपूर्वक मिळवल्या. कुमार यांची १९३१मध्ये वनस्पतिशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून पुणे कृषी महाविद्यालय येथे नेमणूक झाली. कुमार यांना १९३२मध्ये आर्थिक वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून बढती मिळाली. डॉ.बर्न्स यांनी तृण आणि गवताळ कुरणे यांच्याविषयी जे कार्य सुरू केले होते, तेच कुमार यांनी पुढे नेले आणि त्याचा विस्तारही घडवून आणला.

कुमार यांनी फोरेज लेग्यूम्स आणि अन्य फोरेज उत्पादनांचे सादरीकरण, निवड आणि संकर याबाबत मोठे कार्य केले. त्यांनी व साहाय्यक आर्थिक वनस्पतिशास्त्रज्ञ एस.आर.गोडबोले यांनी संयुक्तपणे चराऊ आणि गवताळ कुरणांचे व्यवस्थापन या संदर्भात एक प्रयोग केला. दहा वर्षे चाललेल्या या प्रयोगातून मिळालेले निष्कर्ष ‘इंडियन जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अँड लाइव्ह स्टॉक्स’मध्ये प्रकाशित केले गेले. पद्धतशीर आणि नियंत्रित चराऊ कुरणे लोकप्रिय व्हावी; म्हणून १९४३मध्ये विभागातर्फे एक घडीपत्रकही प्रकाशित झालेे. पुढे १९३२ नंतरच्या कालात ज्वारीवर येणारा स्ट्रायगा, तर तंबाखूवर येणारा ओराबांके अशा रोगांवर संशोधन करून या रोगांना दाद न देणार्‍या जातींची निवड करणे तसेच कडधान्य, तेलबिया इत्यादींची पैदास करणे, अशा पद्धतीचे कार्य आर्थिक वनस्पतिशास्त्रज्ञ विभागात सुरू झाले. कुमार यांनी पिकांच्या सायटॉलॉजीच्या संदर्भात कार्य सुरू केले. ते पुढच्या काळात फारच महत्त्वाचे ठरले.

वेल्स येथील अ‍ॅबरिस्तविथ येथे १९३७ साली भरलेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय ग्रासलँड काँग्रेसमध्ये कुमार यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच अमेरिकेतील पेनिसिल्व्हिनिया येथे १९५२ साली भरलेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय ग्रासलँड काँग्रेसमध्ये त्यांचा ‘स्थानिक चराऊ कुरणात चराई करण्याच्या ताणामुळे उद्भवणार्‍या समस्या’ हा निबंध वाचण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेवरही प्रतिनियुक्तीवर त्यांना पाठवण्यात आले होते. तेव्हा त्यांनी थायलंड सरकारच्या कुरणे आणि चारा उत्पादन संदर्भात सल्लागाराची भूमिकाही बजावली होती. फोरेज विकासाच्या बाबतीत सल्लागार म्हणून त्यांना १९५५-१९५६ या काळात संयुक्त राष्ट्रांच्या ‘इकॉनॉमिक मिशन टू साऊथ व्हिएटनाम’ या समितीवरही नियुक्त करण्यात आले होते.

पुणे आणि रत्नागिरी येथील वातावरणात ‘रेमी’चे उत्पादन समाधानकारकपणे घेता येऊ शकते, ही गोष्ट  कुमार यांनी १९४०मध्ये सिद्ध करून दाखवली. त्याचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन करण्यासही त्यांनी चालना दिली. पुणे विद्यापीठाने एम.एस्सी. (कृषी) आणि पी.एचडी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुमार यांना मान्यता दिली होती. प्रा.कुमार यांनी कुरणांच्या विकासाच्या संदर्भात दिलेले योगदान निश्‍चितच अतुलनीय आहे, असे म्हटले पाहिजे.

- संपादित

कुमार, एल. एस.एस