Skip to main content
x

कुंभार, आनंद नागप्पा

         पुराभिलेख संशोधन, संपादन व प्रकाशन या कार्यात गेली ४० वर्षे सतत मग्न असलेले आनंद नागप्पा कुंभार यांचा जन्म सोलापुरात झाला. श्री. नागप्पा आणि सौ. काशीबाई हे त्यांचे जन्मदाते. आनंद कुंभार यांच्या जन्मदिवशीच एक नाट्य घडले. कुंभारांच्या आईच्या सतर्कतेमुळे त्या रुग्णालयात मुला-मुलीची होऊ घातलेली अदलाबदल टळली व ते मातेच्या कुशीत सुखरूप राहिले.

कुंभार यांचे प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण सोलापुरात झाले. घरची आर्थिक बाजू बेताची असल्यामुळे माध्यमिक शिक्षण रात्रशाळेतून घ्यावे लागले. शालेय जीवनात कोणत्याही तऱ्हेने ते नावाजले नाहीत. सर्वसाधारण बुद्धिमत्तेमुळे इयत्ता दहावीनंतर उदरनिर्वाहासाठी त्यांना प्रयत्न करावे लागले. घरी पिढीजात कुंभारकामाची कला असल्यामुळे त्यातच ते घरच्यांना कामात मदत करू लागले. परंतु, त्या कला-उद्योगात त्यांचे मन रमेना. त्या वेळीसुद्धा नोकरी सहजासहजी मिळत नसे. शेवटी एके दिवशी त्यांनी भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सैन्यात प्रवेश केला. दि. १० मे १९६० रोजी भारतीय सैन्यांतर्गत तोफखान्यात बिनतारी संदेश वाहक म्हणून आनंद कुंभार यांना दाखल करून घेण्यात आले.

सैन्यात सेवारत असतानाच चीन-भारताचे युद्ध झाले. पुढे अनेक गोष्टी घडल्या. या काळात किमान दोनदा तरी त्यांना यमद्वारी जाऊन परत यावे लागले. नियतीला त्यांचा अंत मान्य नव्हता. युद्धोत्तर काळात घरी काही प्रसंग असे घडले, की त्यांना सैन्यातील सेवेचा त्याग करून गावी परत यावे लागले. १९६४ मध्ये येथे आल्यानंतर येनकेन प्रकारेण उपजीविकेचा प्रश्न सोडविण्यात त्यांना यश मिळाले.

पुस्तके, नियतकालिके आदी वाचण्याची आवड त्यांना पूर्वीपासूनच होती. विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकांतील संशोधनात्मक लेख वाचून ते स्तिमित तर झालेच; परंतु संमोहितही झाले. विशेषत:, .. डॉ. वा.वि. मिराशी यांचे ताम्रपट, शिलालेख व नाण्यांवरील संशोधनात्मक लेख त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारे ठरले. आपणही या क्षेत्रात काम करावे, असे त्यांना वाटू लागले. या बाबतीत त्यांनी थेट म.. डॉ. मिराशी यांच्याशी संपर्क साधला. सुयोगाने त्यांना प्रतिसाद मिळाला. पुराभिलेख विद्या काय किंवा नाणकशास्त्र काय, ही विद्वानांची विद्या आहे. त्याला संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान हवे, इंग्रजी भाषेत गती हवी आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पुरातन लिपी वाचता आली पाहिजे आणि लेख वाचल्यानंतर त्यांतील कथन, ज्ञाते इतिहासाची सांगड घालून, प्राप्त लेखाने नवी अशी भर कोणती पडली हे स्पष्ट करून सांगता आले पाहिजे. या गुणवत्तेपैकी एकही गुण श्री. कुंभारांकडे नव्हता. सैन्यातून परत आल्यानंतर ते बाहेरून एस.एस.सी उत्तीर्ण झाले होते. ग्रंथांनाच गुरू मानून त्यांनी अभ्यास सुरू केला. . . डॉ. मिराश्यांना त्यांनी आपला निर्धार सांगितला. त्यांनी मग पुणे भारत इतिहास संशोधक मंडळातील डॉ. . . तथा तात्यासाहेब खरे यांची भेट घेण्यास सांगितले. डॉ. खरे यांनी त्यांना खूप मौलिक सूचना दिल्या व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुराभिलेखाचे ठसे कसे घ्यावेत याचे ज्ञान दिले.

त्यांनी प्रथमत: पुराभिलेखांच्या सर्वेक्षणासाठी कार्यक्षेत्राची निवड केली. सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. गावांची संख्या सुमारे १२०० ते १३०० च्या दरम्यान भरावी. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय पाहता हे काम एकट्या-दुकट्याचे नव्हते. परंतु जिद्दीने व ओढीने आठवड्यातील शनिवार-रविवार या भ्रमंतीसाठी राखून ठेवून त्यांनी जिल्ह्यातील चार तालुक्यांचे सुमारे ५०० गावांचे सर्वेक्षण करून प्रसिद्ध /अप्रसिद्ध अशा सुमारे १५० पुराभिलेखांचे ठसे घेतले. येथे नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कुंभारांनी यासाठी व्यक्तींकडून, संस्थेकडून वा शासनाकडून एक पैसादेखील घेतला नाही. जवळची गावे सायकलवरून, तर दूरवरची गावे एस.टी.ने प्रवास करून पाहणी केली. अगदी मन:पूर्वक व इच्छाशक्तीच्या जोरावर काम केले तर यश दूर नसते हे यावरून सिद्ध होते. हे काम सतत १०/१५ वर्षे चालू होते. अद्यापही, क्षीण स्वरूपात का होईना, काम चालू असते. दरम्यानच्या काळात आनंद कुंभार ; श्री. .. खरे आणि म. .डॉ. मिराशी यांनी सुचविलेल्या पुराभिलेखांशी संबंधित अनेक ग्रंथ व नियतकालिकांचे वाचन, मनन करीत होते. त्यांना सरावाने जुनी देवनागरी लिपी वाचता येऊ लागली.

सुमारे ५०० गावांच्या सर्वेक्षणांतून १००/१५० लेख सापडले खरे; परंतु त्यांपैकी बहुतांशी कन्नड लिपी व भाषेतील होते, तर काही लेख पूर्वसुरींनी वाचून प्रसिद्ध केले होते. उरलेल्यांपैकी जेवढी म्हणून देवनागरी लिपी  संस्कृत / मराठी भाषेत होती, त्याचे  त्यांनी वाचन करून प्रसिद्धीसाठी शोध नियतकालिकांकडे पाठविली व यथावकाश प्रसिद्धही झाली. कन्नड लेखांबद्दल त्यांच्या मनामध्ये समस्या निर्माण झाली. या लेखांना बोलके कोण करणार हा प्रश्न समोर उभा राहिला. कर्नाटक विद्यापीठातील डॉ. कलबुर्गी व डॉ. रित्तींचे नाव या संदर्भात त्यांना सुचविण्यात आले. यथावकाश धारवाडला जाऊन त्यांनी त्यांची भेट घेऊन आपण करीत असलेल्या कामाची कल्पना दिली व कन्नड लेखांचे वाचन करून देण्याची विनंती केली. डॉ. कळबुर्गी यांनी मात्र डॉ. रित्ती हे काम त्यांच्यापेक्षा उत्तम तर्हेने करू शकतील अशी सूचना करून त्यांची शिफारस डॉ. रित्तींकडे केली. डॉ. रित्तींनी पूर्ण चौकशी केली व म्हणाले, ‘‘या क्षेत्रात स्वखुशीने काम करणारे विरळाच, तुम्हांला या विषयाची आवड व ओढ आहे हे पाहून खूप संतोष झाला. तुम्ही कन्नड लेखांचे ठसे घेऊन येथे या. मी त्यांचे वाचन करून देतो. कुंभारांच्या दृष्टीने डॉ. रित्तींचे सकारात्मक सहकार्य मोठे आनंददायी होते.

यथावकाश सर्व कन्नड लेखांचे ठसे घेऊन कुंभार डॉ. रित्तींकडे हजर झाले. शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी सर्व लेखांचे वाचन केले. हे काम एका बैठकीत होणे शक्य नव्हतेच. दोघांच्या सवडीने सुमारे १/२ वर्षांत हे काम पार पडले. या दरम्यान श्री. कुंभारांना डॉ. रित्तींकडे, धारवाडला अनेक वेळा जावे लागले.

लेखांचे जसजसे वाचन होऊ लागले, तसतसे डॉ. रित्ती आनंदित होऊ लागले. कारण, सोलापूर जिल्ह्यातील ज्या तालुक्यांतील गावांचे सर्वेक्षण करून ही सामग्री एकत्रित केली होती, त्याच्या वाचनाने अज्ञात अशी ऐतिहासिक माहिती प्रथमच उजेडात येऊ लागली. त्याचे फलस्वरूप म्हणजे १९८८ मध्ये इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्टया नावाने डॉ. रित्ती व श्री. कुंभार या जोडनावांनी ग्रंथ प्रसिद्ध झाला.

श्री. कुंभार यांनी स्वतंत्रपणे देवनागरी लिपीतले वाचलेले पुराभिलेख तथा पुराभिलेखांवर आधारित काही स्फुट लेखांचे एक पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदानाने प्रसिद्ध झाले. १९८८ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन तरंगया शीर्षकाच्या पुस्तकास त्याच वर्षीचे मंडळाचे श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे उत्कृष्ट शोध ग्रंथ म्हणून पुरस्कार मिळाले.

श्री. कुंभार यांनी अथक परिश्रमाने नवीन पुराभिलेख उजेडात आणले. त्यांच्या प्रकटीकरणांमुळे अज्ञात अशी बरीच माहिती प्रथमच समोर आली, की जिच्या आधारे आज इतिहासकारांना या माहितीवरून इतिहास ग्रंथांत नवीन परिच्छेद लिहावे लागतील.

या नवोपलब्ध माहितीकडे विहंगावलोकन केल्यास काही ठळक गोष्टी दिसून येतात त्या अशा :

कुडल (ता. दक्षिण सोलापूर) येथे संगमेश्वर मंदिराच्या तुळईवर एक लेख मिळाला. तो केवळ अडीच ओळींचा असून ज्ञात माहितीप्रमाणे तो मराठी भाषेतील स्पष्ट काळाचा उल्लेख झालेला पहिला शिलालेख आहे. लेखातील शेवटची ओळ वाछि तो विजेयां हो ऐवाअशी कोरलेली आहे. काळ आहे श्री सकु ९४० कालयुक्त संवत्सरे माघ सु()२०१८ साली या लेखाची सहस्राब्दी होईल. पाहू या शासन कशा प्रकारे सहस्राब्दी साजरी करते ते. बाराव्या शतकातील थोर शिवशरण शिवयोगी सोन्नलिगे (सोलापूर) सिद्धरामांशी निगडित चार लेख प्रथमच प्रकाशात आले आहेत. अद्भुत असे एक विवाहपुराण शिलालिखित झाले असून त्या विवाह पुराणास गिरिजाकल्याणअसे संबोधिले जाते. प्राचीन मराठी भाषेत अगदी अत्यल्प लेख उपलब्ध आहेतकुंभार यांच्या शोधांनी आणखी ४/५ लेखांची भर यात पडलेली आहे. कलचुरी सम्राट बिज्जलदेव (दुसरा) याच्या पट्टराणीचे नाव पहिल्यांदाच समजले, तिचे नाव होते रंभादेवी. देवगिरीकर यादवांचा शेवटचा राजा सिंघणदेव (तिसरा) याचा लेख ( .. १३१६ ) कामती खुर्द ( ता. मोहोळ ) येथे सापडला. क्रमिक इतिहास पुस्तकात याला शंकरदेवम्हणून संबोधितात. कलचुरी राजघराण्यातील एक शासक महामंडलेश्वर अमुगीदेव याचे तीन लेख द. सोलापूर तालुक्यातून समोर आले आहेत. त्याच घराण्यातील पुढे स्वतंत्रपणे सम्राट झालेला बिज्जलदेवा (दुसरा) चा तो महामंडलेश्वर असतानाचा पहिला निर्देश असलेला लेख सोलापुरात मिळाला. असे अनेक अंश श्री. कुंभार यांच्या पुराभिलेख शोधाने प्रकाशित झाले आहेत. इतिहासाच्या बारीकसारीक अंगांवर प्रकाश टाकणारी विपुल माहिती या पुराभिलेखांतून पुढे आलेली आहे. आनंद कुंभार यांच्या या शोधकार्याची नोंद  घेऊन हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर व अन्य संस्थांनी मिळून इ.. २०११ च्या मार्चमध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार केला.

संपादित

कुंभार, आनंद नागप्पा