Skip to main content
x

कुंटे, अनंत कृष्णाजी

नंत कृष्णाजी कुंटे यांचा जन्म कल्याण येथे झाला. त्यांचे वडील पेशाने शाळा शिक्षक होते व उत्तम भजने गात, पखवाज आणि तबलाही वाजवत. अनंत कुंटे यांचे ज्येष्ठ बंधू विनायक हे पं. विनायकराव पटवर्धन व उ. अन्वर हुसेन खाँ यांच्याकडे ग्वाल्हेर व आग्रा गायकी शिकले होते. ते रेल्वेमध्ये नोकरी करत. दुसरे बंधू लक्ष्मण हे तबला व क्लॅरिओनेट वाजवत. त्यांनी शंकरभैया, अल्लारखा, जिरेखाँ व अमीर हुसेन खाँ यांच्याकडे तबल्याची उत्तम तालीम घेतली होती, तसेच आकाशवाणीत ते प्रथम तबलावादक व नंतर क्लॅरिओनेटवादक म्हणून नोकरी करत असत.

त्यांनी उ. फैयाझ खाँ, रोशनआरा बेगम, कृष्णराव शंकर पंडित अशा अनेक दिग्गज कलाकारांना साथ केली होती.

असे कलासंपन्न वातावरण असल्याने लहानपणापासूनच अनंत कुंटे यांच्यावर संगीताचे संस्कार कुटुंबातच झाले. त्यांचे शालेय शिक्षण छबिलदास शाळेत इंग्रजी तिसरीपर्यंत झाले. 

अनंत कुंटे यांना उ. अमीरबक्ष खाँ साहेबांकडून १९४७ ते १९५५ या काळात सारंगीची उत्तम तालीम मिळाली व त्यांनी अथक रियाझातून या कठीण वाद्यात प्राविण्य मिळवले. साथीच्या सरावासाठी ते नारायणराव व्यास, राम मराठे, सुरेश हळदणकर, माणिक वर्मा अशा गायकांकडे जात असत व यातूनच त्यांनी हळूहळू मैफलींतही साथसंगत करणे सुरू केले.

अनंत कुंटे १९५३-५४  साली मोहरमच्या काळात मुंबई आकाशवाणीवर बदली सारंगीवादक म्हणून साथ करू लागले. त्यांनी १९५३ साली आकाशवाणीतील संगीत दिग्दर्शक दिनकर अमेंबल (डी. अमेल) यांच्या वाद्यवृंद रचनांसाठी ‘चेलो’ हे वाद्यही वाजवले. त्यांना १९५५ साली राजकोट आकाशवाणीवर सारंगीवादक म्हणून नोकरी मिळाली. तेथून त्यांची १९५८ साली पुणे आकाशवाणीत बदली झाली. त्यांनी १९७३ ते १९९० अशी दीर्घकाळ मुंबई आकाशवाणीत नोकरी केली.  या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांस त्यांनी सारंगीची साथ केली, तसेच स्वतंत्र सारंगीवादनही सादर केले.

अनंत कुंटे यांची सारंगीची साथ अत्यंत सुरेल, तयार व तरीही संयत असल्याने गायकही आवर्जून त्यांना साथीसाठी पाचारण करू लागले. आपल्या बंधूंकडून रागदारीही उत्तम शिकल्याने व रागरूपांची सूक्ष्म समज असल्याने ग्वाल्हेर, आग्रा व विशेषत: जयपूर घराण्याच्या गायकांना त्यांनी केलेली संगत पसंत पडे.

मिराशीबुवा, कृष्णराव शंकर पंडित, विनायकराव पटवर्धन, गजाननबुवा जोशी, शरच्चंद्र आरोळकर, शरद साठे, अशोक दा. रानडे (ग्वाल्हेर घराणे), निसार हुसेन खाँ, मुश्ताक हुसेन खाँ (रामपूर घराणे), अझमत हुसेन खाँ, खादीम हुसेन खाँ, (आग्र), मल्लिकार्जुन मन्सूर, निवृत्तीबुवा सरनाईक, पद्मावती शाळिग्राम, किशोरी आमोणकर, धोंडूताई कुलकर्णी, श्रुती सडोलीकर (जयपूर घराणे), हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, गंगूबाई हनगळ, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी (किराणा घराणे), रसूलनबाई, सिद्धेश्वरी देवी, बेगम अख्तर, शोभा गुर्टू (ठुमरी), थिरकवा, आमीर हुसेन खाँ, सामताप्रसाद (तबलावादन), बिरजू महाराज (कथक), इ. अनेक नामवंतांना त्यांनी समर्थपणे साथसंगत केली.

भारतातील सवाई गंधर्व महोत्सवासारख्या अने संगीतमंचांवर, तसेच अमेरिका, युरोप, ऑॅस्ट्रेलिया, आखाती देश इ. परदेशांतही त्यांनी कला सादर केली. ब्रिटन येथील एकल सारंगी वादनाच्या विशेष दौर्‍यांत २००१ व २००३ साली परदेशी रसिकांनीही त्यांना वाखाणले. जर्मनीत पाश्चात्त्य संगीतकारांसह त्यांनी जुगल वादनाचा प्रयोग केला. भारत व परदेशांत त्यांनी अनेकांना वादनासाठी मार्गदर्शन केले आहे.

अनंत कुंटे यांना ‘संगतकार’ पुरस्कार (गांधर्व महाविद्यालय, पुणे, २०००), ‘आयटीसी संगीत रिसर्च अकादमी’ पुरस्कार (२००३) व ‘गुणिजन’ पुरस्कार (ठाणे महानगरपालिका, २००९) देऊन सन्मानित करण्यात आले .

महाराष्ट्रातील संगीत विश्वात विसाव्या शतकात सारंगी या वाद्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. अमीरबक्ष, हैदरबक्ष, मेहबूब खाँ, मजीद खाँ, कादरबक्ष, मुहंमद हुसेन खाँ, राम नारायण, सुलतान खान इ. उत्तरेतून आलेले सारंगीवादक महाराष्ट्रातील कलासंगीताच्या मैफलीतच नव्हे, तर संगीत नाटक, चित्रपट अशाही माध्यमांतील संगीतासाठी सारंगीच्या ‘सौरंगी’ स्वरांचे कोंदण देत होते. या कलाकारांबरोबरच महाराष्ट्रातील बाबूराव कुमठेकर, बाबालाल, रामकृष्ण पर्वतकर, इ. अनेक सारंगीवादक मैफली गाजवू लागले होते. सारंगीच्या या अस्तकालात ज्या वादकांनी या वाद्याचा नावलौकिक जागता ठेवला, त्यांत अनंत कुंटे हे सर्वांत नावाजलेले मराठी सारंगीवादक होत.

— चैतन्य कुंटे

कुंटे, अनंत कृष्णाजी