Skip to main content
x

कुर्डीकर, मोगूबाई

संगीताचे गुण जन्मत:च घेऊन आलेल्या मोगूबाई कुर्डीकर यांचे मूळ गाव गोव्यातील कुर्डी हे होय. मोगूबाईंच्या आजी गौरीबाई व आई जयश्री या दोघीही गायिका होत्या. नथ्थन खाँच्या शिष्या बाबलीबाई यांच्याप्रमाणे मोगूबाईंनीही महान गायिका व्हावे अशी आई जयश्री यांची दुर्दम्य इच्छा होती. त्यामुळे लहानग्या मोगूबाईंच्या संगीत शिक्षणासाठी आईने कष्ट घेतले. अगदी सुरुवातीला जांबवली येथील एका हरदासाकडे त्यांनी मोगूबाईंना शिक्षणासाठी पाठवले. पण पुढे हरदासांचा मुक्काम हलल्यावर मोगूबाईंचे शिक्षण थांबले. लहानपणीच छोट्यामोठ्या कार्यक्रमांत भाग घेऊन चांगली गायिका म्हणून मोगूबाईंनी उत्तम लौकिक कमविला होता. त्या वेळी अंबूबाईंच्या ‘सातारकर स्त्री संगीत मंडळी’चा गावात मुक्काम होता. तेथे प्रसिद्ध अभिनेते चिंतोबा गुरव नाट्यसंगीताचे शिक्षण देत. या ‘मंडळी’ने मोगूबाईंना बोलावणे धाडले. त्यांचा निकोप आवाज व तीव्र आकलनशक्ती पाहून चिंतोबा प्रभावित झाले. त्यांनी मोगूबाईंना निरनिराळ्या संगीत नाटकांत महत्त्वाच्या भूमिका दिल्या. सं. सौभद्रमध्ये ‘सुभद्रा’, पुण्यप्रभावात ‘किंकिणी’, शारदात ‘शारदा’, मृच्छकटिकात ‘वसंतसेना’ या सर्व भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्या व श्रोत्यांची मने जिंकली. त्यांची ‘किंकिणी’ची भूमिका विशेषत: गाजली होती.
मोगूबाईंनी त्याच कंपनीतील प्रसिद्ध नर्तक रामलाल यांच्याकडे शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर चुनीलाल व मझले खाँ यांच्याकडेही शिक्षण घेतले. या शिक्षणामुळे काही अवघड तालांवर त्यांचे प्रभुत्व आले. तसेच मोहक पदन्यास, भावपूर्ण मुद्रा, अभिनय यांचा पुढे गाण्यांत स्वराविष्कार करताना त्यांना उपयोग झाला. याच काळात त्या दत्ताराम नांदोडकरांकडे ठुमरी, गझल शिकल्या. या सर्व व्यापांमुळे मोगूबाईंच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला. त्या क्षीण दिसू लागल्या. मोगूबाईंच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी बाळकृष्णमामा पर्वतकर यांनी सांगलीला बिऱ्हाड हलवायचे ठरवले. सांगलीला जाण्याचा हा निर्णय मोगूबाईंच्या सांगीतिक जीवनात महत्त्वाचा ठरला. कारण येथूनच पुढे त्यांना घरंदाज, खानदानी गायकीचे खरेखुरे शिक्षण मिळत गेले. त्यांच्या वैद्यकीय उपचारांबरोबरच आबासाहेब सांबारे वैद्य यांच्या घरी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, रहिमत खाँ, अब्दुल करीम खाँ, पं. पलुस्कर, वझेबुवा आणि भावी गुरू गानमहर्षी अल्लादिया खाँसाहेब यांतील बऱ्याच गायकांची गाणी या अठरा वर्षांच्या मोगूबाईंच्या कानी पडली. त्यांच्यावर उच्च गायकीचे संस्कार झाले. योगायोगाने इनायत खाँ पठाण यांची शिष्या होण्याची संधी त्यांना मिळाली. परंतु ही तालीम वर्षभरच चालली. तरीही मोगूबाईंनी रियाज चालूच ठेवला. एके दिवशी अल्लादिया खाँ यांनी त्यांचा रियाज ऐकला. मोगूबाईंचे गाणे त्यांना आवडले व खाँ साहेबांनी त्यांना तालीम देण्याचे ठरवले. खाँसाहेबांकडे मोगूबाईंची तालीम दीड वर्ष सुखेनैव चालू होती. १९२१ मध्ये खाँसाहेबांना केसरबाईंना शिकवण्यासाठी सांगली सोडून मुंबईस स्थायिक व्हावे लागले. कोल्हापूरचे शाहू महाराज १९२२ मध्ये वारले आणि खाँसाहेबांचे राजछत्रही नाहीसे झाले. महाराजांच्या निर्वाणानंतर मुंबईत कायमचे वास्तव्य करण्यावाचून त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. दरम्यान काही काळासाठी मोगूबाईंना गोव्यात परतावे लागले. परंतु घरातील वडीलधाऱ्या  मंडळींचा निश्चय व मोगूबाईंची अनन्यसाधारण संगीत भक्ती यांमुळे घरातील मंडळींसह त्या १९२२ साली मुंबईत येऊन दाखल झाल्या. त्या वेळेस खाँसाहेब केसरबाई केरकर यांना तालीम देत होते व केसरबाई यांना शिकवीत असताना त्या दहा वर्षांच्या काळात खाँसाहेबांनी अन्य कुणालाही शिकविता कामा नये, ही केसरबाई यांची अट खाँसाहेबांनी मान्य केली होती. यामुळे तीव्र इच्छा असूनही खाँसाहेबांना मोगूबाईंना शिकवणे शक्य झाले नाही. एवढी धडपड करून मुंबईला येऊन त्यांच्या पदरी निराशाच आली. पर्याय म्हणून त्या आग्र घराण्याच्या उ. बशीर खाँ या विद्वान गायकांकडे शिकू लागल्या.
वर्ष-सहा महिने ही तालीम व्यवस्थित चालू असताना अचानक एके दिवशी उ. बशीर खाँ मोगूबाईंना म्हणाले, ‘‘उद्यापासून माझे काका उ. विलायत हुसेन खाँ तुला शिकवायला येतील. तू त्यांचा गंडा बांध.’’ या अकल्पित कलाटणीने मोगूबाई गोंधळून गेल्या. पण गुरुआज्ञा प्रमाण मानावी लागली. त्यांनी विलायत हुसेन खाँचा गंडाही बांधला. ही तालीमही तीन-चार महिनेच टिकली. कारण प्रकृती खालावल्यामुळे खाँसाहेबांना आपल्या गावी जावे लागले. मोगूबाईंची ही अवस्था पाहून अल्लादिया खाँसाहेबांचे मन द्रवले आणि त्यांनी १९२६ साली आपले धाकटे बंधू हैदर खाँ यांना कोल्हापुरातून बोलावून घेतले आणि मोगूबाईंना शिकवण्याची आज्ञा केली. त्यांचा आवाज अतिशय मधुर होता आणि त्यांची शिकवण्याची पद्धतही मोगूबाईंना फार आवडली.
खाँसाहेब एकच राग त्यांना नऊ महिने शिकवत होते. या प्रक्रियेत, रागाच्या चलनाखेरीज जयपूर गायकीची ख्याल भरण्याची रीत, रागाची विविध अंगांनी बढत, त्यासाठी लागणारा आवाजाचा लगाव या सर्व गोष्टी त्यांनी मोगूबाईंकडून साध्य करून घेतल्या. याच काळात त्यांना जयपूर गायकीची खरीखुरी तालीम मिळाली. तसेच हैदर खाँचे नादमधुर बोल बनवण्याचे तंत्र मोगूबाईंनी उचलले. यामुळेच जयपूर अत्रौली घराण्यात मोगूबाईंइतके आकर्षक आणि नादमधुर बोल दुसऱ्या कोणत्याही कलाकाराला येत नव्हते. हैदर खाँसाहेबांची ही तालीम १९२६ पासून एप्रिल १९३१ पर्यंत
  चालू होती. पुढे खाँसाहेबांची तब्येत बिघडत चालली. शिकवणे अशक्य होऊ लागले. तेव्हा अल्लादिया खाँच्या आज्ञेवरून त्यांना अत्रौलीस जावे लागले.
योगायोगाने त्याच सुमारास लयभास्कर खाप्रूमामा पर्वतकर मोगूबाईंच्या शेजारी राहावयास आले. खाप्रूजी म्हणजे लयीच्या बाबतीत संगीतातील एक आश्चर्यच होते. या सिद्धहस्त लयभास्कराच्या ज्ञानाचा बराचसा लाभ मोगूबाईंना झाला. खाप्रूमामांनी आपली विद्या त्यांना भरभरून दिली, आणि मोगूबाईंनीही ती मनापासून आत्मसात केली. पुढे १९३४ मध्ये अल्लादिया खाँसाहेबांनी त्यांना रीतसर गंडा बांधला. त्यानंतर बरीच वर्षे खाँसाहेबांच्या शिकवणुकीचा मोगूबाईंना लाभ झाला. मोगूबाईंच्या मैफली भारतातील सर्व प्रमुख शहरी झाल्या. मोगूबाईंना खाप्रूमामांकडून लयीचे जे सूक्ष्म ज्ञान प्राप्त झाले होते, त्याचे प्रत्यंतर त्यांच्या मैफलीतून दिसून येई. विद्या मिळवण्यासाठी अपार कष्ट केलेल्या मोगूबाईंनी उदारपणे विद्यादान करून अनेक शिष्य घडवले. त्यांच्या उल्लेखनीय शिष्यांमध्ये वामनराव देशपांडे, सुशीलाराणी पटेल, बबनराव हळदणकर, कमल तांबे, कौसल्या मंजेश्वर, सुहासिनी मुळगावकर, पद्मा तळवलकर व सुलभा पिशवीकर हे आहेत.
मोगूबाईंची आचारसंहिता त्यांच्या गुरूंएवढीच कडक होती. गाताना आवाज लावण्यात जेवढी शुद्धता, निकोपता होती, तशीच ती आचरणातही होती. अल्लादिया खाँ प्रणीत जयपूर घराण्यामध्ये द्रुत बंदिशी गाण्याचा विशेष कल नव्हता, मात्र मोगूबाईंनी अनेक अप्रचलित रागांतील विलंबित ख्यालांसाठी दु्रत बंदिशींची रचना करून मैफलीतील प्रस्तुती परिपूर्ण केली. अनेक बंदिशींच्या रचनेत त्यांनी आपल्या गुरूंचे स्मरण म्हणून ‘अहमदपिया’ हीच मुद्रा वापरली.
जयभारत रेकॉर्ड कंपनीने १९४८ साली त्यांच्या गायनाच्या पूर्वी, सावनी, जयजयवंती, नायकी कानडा या रागांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. त्या खूप गाजल्या. तसेच १९४९ साली कोलंबिया कंपनीनेही त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनिमित्त वि.द. अंभईकरांनी खंबावती रागात स्वरबद्ध केलेले ‘वंदे मातरम्’ व स्नेहल भाटकरांनी स्वरबद्ध केलेले विहागबहार रागातील ‘फिर आई लौट बहारें’ हे मधुकर राजस्थानी यांचे गीतही मोगूबाईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून एच.एम.व्ही.ने प्रसिद्ध केले. त्यांना संगीत नाटक अकादमी सन्मान (१९६८) व पद्मभूषण (१९७४) देऊन गौरविण्यात आले.

मोगूबाई कुर्डीकरांच्या मागे दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या श्रेष्ठ गायिका, किशोरी आमोणकर या त्यांच्या ज्येष्ठ कन्या होत. सत्त्याण्णव वर्षांचे दीर्घायुष्य जगून मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

          - पं. बबनराव हळदणकर

कुर्डीकर, मोगूबाई