Skip to main content
x

खाँ, बडे गुलाम अली

डे गुलाम अली खाँ यांचा जन्म पंजाबातील कसूर या गावी झाला. त्यांचे वडील अलिबक्ष व चुलते काले खाँ हे दोघेही पतियाळा घराण्याचे गायक होते. गुलाम अली हे अलिबक्ष यांचे थोरले पुत्र होत. अलिबक्ष व काले खाँची तालीम बन्ने खाँ व नंतर कालुमियाँकडे झाली होती. गुलाम अलींना त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासूनच सारंगीवादनाचे आणि गायनाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. पुढे वडिलांकडूनही त्यांना तालीम मिळाली.

सुरुवातीच्या काळात बडे गुलाम अली खाँ सावत्र आईच्या सांगण्यावरून उदरनिर्वाहाकरिता सारंगी वाजवत. मुंबईत आल्यानंतरही ते सारंगी वाजवीत होते. मात्र गायन त्यांना अधिक प्रिय होते. ते गाण्याची मेहनत  सातत्याने करत. पुढे त्यांचे गायनातच नाव झाले. मुंबईच्या वास्तव्यात त्यांची सिंदे खाँ यांच्याशी भेट झाली. खाँसाहेबांनी त्यांची तालीम घेतली. नंतर ते वडिलांकडे म्हणजे अलिबक्षांकडे, लाहोरला गेले.

खाँसाहेबांची गाणी पंजाबकडे विशेष होत असत. कलकत्त्यातील संगीत परिषदांतून ते प्रथम प्रसिद्धीस आले. त्यांचे १९४४ साली मुंबईतील विक्रम संगीत परिषदेत प्रथम गायन झाले व तेव्हापासूनच ते महाराष्ट्राला परिचित झाले. त्यानंतर मुंबईत, मुंबई आकाशवाणी केंद्रावरून, तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांची गाणी झाली व त्यांचे महाराष्ट्रात नाव झाले.

धिप्पाड देहयष्टी असलेले खाँसाहेबांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त असले तरी त्यांचा आवाज अतिशय मुलायम, मधुर व बुलंद होता. तिन्ही सप्तकांत लीलया संचार करणारा लवचिक व सुरेल आवाज, दाणेदार सरगमचा वैचित्र्यपूर्ण वापर व चमत्कृतिपूर्ण मांडणी ही त्यांच्या गायकीची प्रमुख वैशिष्ट्ये होती. याशिवाय भावपूर्णता व शब्दांचे अर्थवाही उच्चार हेदेखील त्यांच्या गायन- शैलीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.

लोकरंजन हाच प्रमुख हेतू बाळगल्याने किंवा सर्वसामान्य रसिकांना गाणे भावायला हवे ही इच्छा असल्यामुळे त्यांचे मैफलीतील चमत्कृतींनी भरलेले गाणे संगीतातील अनेक जाणकारांना विस्कळीतही वाटे व त्यावर टीकाही झाली; पण गुणिजनांच्या बैठकीत ते सकस व शिस्तबद्ध गायकीही तेवढ्याच ताकदीने मांडत अशी नोंद आहे. आम मैफलीत त्यांचा प्रामुख्याने जरी प्रचलित रागांवरच भर असला, तरी खास मैफलीत अप्रचलित रागही ते खुबीने पेश करीत. सृष्टिसौंदर्याचे त्यांना विलक्षण आकर्षण होते व त्याचा प्रभाव आपल्या गायनातून अतिशय संवेदनशीलतेने आविष्कृत करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

रागदारी गायनापेक्षा, किंबहुना अधिकच खाँसाहेबांच्या ठुमरी गायनाचा प्रभाव महाराष्ट्रातील गानरसिकांवर विशेष पडला. महाराष्ट्रात प्रचलित असणार्‍या ठुमरीपेक्षा ते निराळा रंग असणारी पंजाबी अंगाची ठुमरी गात. प्रादेशिक विशेषांचा प्रभाव, खटक्या-मुरक्यांचा सढळ वापर, टप्पा अंगातील गुंतागुंत व आवाहक शब्दोच्चार यांमुळे त्यांच्या ठुमर्‍यांना सर्वसामान्य श्रोत्यांकडूनही भरघोस प्रतिसाद लाभला. ‘का करूं सजनी आए ना बालम’, ‘याद पिया की आए’ इत्यादी त्यांनी गायलेल्या ठुमर्‍या विलक्षण लोकप्रिय झाल्या. काश्मीर व सिंध प्रांतांतील अनेकविध लोकगीते त्यांच्या संग्रहात होती, तसेच अरबी, इराणी संगीताशी त्यांचा परिचय होता.

फाळणीनंतर गुलाम अली खाँसाहेब पाकिस्तानचे रहिवासी झाले. मात्र भारतात त्यांच्या गायनाची कदर करणारा चाहतावर्ग फार मोठा असल्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांना १९५७-५८ साली भारताचे नागरिकत्व मिळाले.

‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटाकरिता १९६० मध्ये नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली तानसेनच्या भूमिकेसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. रागेश्री आणि सोहनी या रागांतील त्यांचे गायन अतिशय परिणामकारक व स्मरणात राहणारे आहे. ‘सबरंग’ या नावाने त्यांनी निरनिराळ्या रागांमध्ये बंदिशी, तसेच काही ठुमर्‍याही रचल्या आहेत. एच.एम.व्ही. कंपनीने त्यांच्या रागदारी संगीताच्या, तसेच ठुमर्‍यांच्याही ध्वनिमुद्रिका काढल्या. या ध्वनिमुद्रिकांवरून त्यांच्या गायनात कसे विविध रंग होते हे लक्षात येते.

खाँसाहेबांना १९६१ साली अर्धांगवायूचा झटका आला.  ते १९६२ साली थोडे बरे होऊन पुनश्च गाऊ लागले. महाराष्ट्र सरकारने त्यांना पाच हजारांचे अनुदान दिले, तसेच संगीत नाटक अकादमीने देशातील महान गवई म्हणून त्यांचा सन्मान केला. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. आजारपणात कलकत्ता व मुंबई येथील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना बरीच मदत मिळाली. शरीर अधू असतानाही त्यांची गायनाची मेहनत चालू असे व अशा परिस्थितीतदेखील ते काही संगीत परिषदांतून गायले होते.

नवाब जहिरयारजंग अमीर-इ-पारगा या हैदराबादच्या त्यांच्या निस्सीम भक्ताने खाँसाहेबांना हैदराबादला नेऊन त्यांच्यावर निष्णात डॉक्टरांतर्फे इलाज केले; शेवटी हैदराबादलाच त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी होती असे ते अभिमानाने सांगत. त्यांचे पुत्र मुनव्वर अली खाँना गुलाम अलींची तालीम मिळाली; पण १९८९ साली मुनव्वर अलींचे आकस्मिक निधन झाले.

         — मधुवंती पेठे, माधव इमारते

खाँ, बडे गुलाम अली