Skip to main content
x

खिलारी, जयराम मारुती

       यराम मारुती खिलारी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिरोली येथील शेतकरी कुटुंबात झाला. नारायणगाव येथील सबनीस विद्यामंदिरामधून १९६०मध्ये त्यांनी शालान्त परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केली. शासनाची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळवून १९६५मध्ये त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालय येथून बी.एस्सी.(कृषी) प्राप्त केली. १९६५ ते १९६९पर्यंत ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव व पुणे येथे कृषी खात्यात कृषी पर्यवेक्षक पदावर काम केले व १९६९ ते १९७५पर्यंत वरिष्ठ प्रयोगशाळा साहाय्यक पदावर कृषि-रसायनशास्त्रज्ञ, पुणे यांच्या प्रयोगशाळेत काम केले. त्याच मुदतीत संशोधन करून शोधनिबंध सादर करून एम.एस्सी. (कृषी) पदवी १९७६मध्ये प्राप्त केली. ते १९७५ ते १९८० दरम्यान कृषी  महाविद्यालय, कोल्हापूर येथे व्याख्याता पदावर काम करत असताना तासगाव व सांगली येथील द्राक्षबागांना भेटी देऊन; देठ, पानांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. ते काम डॉ. खिलारी यांना आवडले व अध्यापन कामाचे पाच दिवस कोल्हापुरात व शनिवार-रविवार शेतकऱ्यांचे द्राक्षबागेत असा आयुष्यक्रम ते कोल्हापूरला असेपर्यंत चालू राहिला. १९८० ते ८२ या काळात दिल्ली येथे भा.कृ.अ.सं.त कृषी -रसायनशास्त्र व मृदाशास्त्र विषयाचा पीएच.डी.चा अभ्यास करताना त्यांनी वनस्पती-शरीरक्रियाशास्त्र व जीव-रसायनशास्त्र या विषयांचा जास्तीत जास्त अभ्यास केला. त्यांची १९८३मध्ये पुणे येथे कृषी महाविद्यालयात सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन प्रकल्पात संशोधक म्हणून नेमणूक झाली व १९९७पर्यंत याच पदावर राहिल्याने सूक्ष्म अन्नद्रव्यांचे वनस्पती जीवनातील कार्य व महत्त्व व्यासंगपूर्ण अभ्यासाने त्यांनी आत्मसात केले. द्राक्ष पिकांतील गुलाबी मण्यांचा प्रश्‍न अभ्यासून त्यावर एनएए संजीवकाचा उपाय त्यांनी शोधून काढला व या शोधप्रबंधावर त्यांना १९८६मध्ये पीएच.डी. मिळाली. शेतकरी त्यांना बागांमधील पिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पाचारण करू लागले व डॉ.खिलारी त्या प्रश्‍नांवर अभ्यास, संशोधन करून प्रश्‍नांची उत्तरे शोधून त्यांचे समाधान करू लागले. त्यांनी १९८६मध्ये ओझर येथे जमीन खरेदी करून द्राक्ष बाग लावली. त्यामुळे प्रयोग करण्यासाठी आता स्वतःची बाग उपलब्ध झाली. त्यामुळे त्यांना शेतीविषयक समस्यांना सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांना केलेल्या मदतीमुळे खिलारी त्यांच्यातही लोकप्रिय झाले. पुढे त्यांची कोरडवाहू संशोधन केंद्र सोलापूर येथे बदली केली गेली. तेथेही त्यांनी शेतकऱ्यांना विनाशुल्क मदत केली. पुढे १९९९मध्ये मुदतपूर्व स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते शेतकऱ्यांना निःशुल्क सल्ला व मदत देण्याचे आवडते कार्य करण्यास मोकळे झाले. द्राक्ष, केळी इ. फळबाग शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे काम त्यांनी निष्ठेने निःशुल्क समाजसेवा म्हणून करण्याचे जीवनव्रत अंगीकारले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ते १९७५मध्ये सभासद झाले. सेवानिवृत्ती घेतल्यावर लोकाग्रहास्तव २००२ ते २००५ ते संघाचे उपाध्यक्ष आणि २००५ ते २००८ अध्यक्ष होते व २००८नंतर ते कोषाध्यक्ष झाले. द्राक्ष बागायतदारांना लागणारी औषधे, त्यांचे अनेकविध प्रश्‍न, मुख्य म्हणजे विपणन प्रश्‍न, द्राक्ष निर्यातीसाठी वाहतूक, मध्यवर्ती व राज्य सरकारकडील प्रश्‍न,निर्यातदार, परदेशातील खरेदीदारांच्या अपेक्षा व त्यांची पूर्ती करण्यात येणाऱ्या अडचणी अशा अनेक समस्यांवर त्यांनी आपल्या ज्ञानाने, कळकळीने मार्ग शोधले व द्राक्ष बागायतदारांचे जास्तीत जास्त समाधान कऱण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

       द्राक्षबागेतील पक्वतेचे व इतर प्रश्‍न सोडवण्यासाठी संघातर्फे भा.कृ.अ.प.चे दोन संशोधन प्रकल्प मंजूर करून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या मदतीने गेली ६ वर्षे संशोधन चालू आहे. संघातर्फे ‘मुख्य संशोधक’ म्हणून काम करणारे एकमेव शास्त्रज्ञ डॉ. खिलारी आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुणे व नाशिक येथे संघाच्या दोन अद्ययावत सोयींनी सज्ज प्रयोगशाळा आहेत. त्यांची संपूर्ण देखभाल डॉ.खिलारी पाहत व पृथक्करण केल्यानंतर शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शन करत. युरोपमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी बाजार सर्वेक्षण करण्यासाठी शासनाने १९८८मध्ये एक शिष्टमंडळ पाठवले. डॉ.खिलारी यांना आवर्जून मंडळात पाचारण करण्यात आले. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, इस्रायल अशा सर्व देशांत त्यांनी प्रवास करून द्राक्ष पिकांविषयीचे प्रश्‍न समजून घेतले. त्यांचे ३० शास्त्रीय लेख, १३ पुस्तके व २०० प्रबोधनात्मक मराठी लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना ‘द्राक्षमित्र’ हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे व ‘उत्कृष्ट संशोधक’ हा पुरस्कार वसंतराव आर्वे प्रतिष्ठानतर्फे देण्यात आला आहे. प्रत्यक्ष द्राक्ष शेती करून, संशोधन व व्यासंग करून मिळवलेले ज्ञान व शेती व्यवसायाची सांगड घालून द्राक्ष व बागायती शेतकऱ्यांचे  प्रश्‍न सोडवण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉ. खिलारी यांनी केले.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

खिलारी, जयराम मारुती