Skip to main content
x

खोटे, दुर्गा विश्वनाथ

     हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या ठसठशीत अभिनयाने रजत पडदा गाजवून अनन्यसाधारण स्थान निर्माण करणाऱ्या, तसेच चित्रपटनिर्मिती व दिग्दर्शन आणि लघुपट, जाहिरातपट या क्षेत्रातही असामान्य कामगिरी सिद्ध करणाऱ्या एकमेव अभिनेत्री होत्या दुर्गा खोटे.
     दुर्गा खोटे यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे पाळण्यातील नाव होते विठा. लहानपणी त्यांना कौतुकाने बेबी या नावाने संबोधत असत. नंतर त्यांना सर्व जण बानू म्हणू लागले. १९२३ साली (विश्वनाथ) खोटे यांच्याशी त्यांचा विवाह झाला व लग्नानंतर त्यांचे नाव दुर्गा खोटे असे झाले. त्यांचे वडील लाड हे सॉलीसिटर होते. वडिलांकडूनच बुद्धीचा वारसा लाभलेल्या दुर्गा खोटे शालेय शिक्षणातही हुशार होत्या. मातृभाषा मराठी असूनही त्यांना उर्दू, हिंदी व इंग्लिश या भाषा चांगल्याच अवगत होत्या.
      दिसायला रूपमती असल्याने निर्माते-दिग्दर्शक मोहन भावनानी यांनी दुर्गा खोटे यांना ‘फरेबी जाल’ या मूकपटात नायिकेच्या भूमिकेसाठी पाचारण केले. त्या काळात चित्रपट क्षेत्रात सुविद्य आणि घरंदाज स्त्रिया अगदी अभावानेच दिसत असत, पण दुर्गाबाई विचारांनी अत्यंत प्रगल्भ व दूरदर्शी असल्याने त्यांनी हा चित्रपटाचा प्रस्ताव स्वीकारला. ‘फरेबी जाल’ हा चित्रपट निर्माणाधीन असताना बोलपटाचा शोध लागला व त्यामुळे भवनानी यांनी आपल्या मूकपटाचे तंत्र बदलून त्याला बोलपटाचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला; त्यामुळे हा चित्रपट मूकपट व बोलपट असा सरमिसळ तयार झाला, पण तो फारसा चालला नाही. या चित्रपटात दुर्गा खोटे यांनी एक गाणेही म्हटले होते.
      या काळात प्रभात फिल्म कंपनी बोलपट निर्मितीच्या दृष्टीने पावले टाकत होती. त्यांनी ‘अयोध्येचा राजा’ (मराठी) व ‘अयोध्या का राजा’ (हिंदी) या चित्रपटाची तयारी सुरू केली होती. त्या वेळी चित्रपटासाठी नायिका म्हणून प्रभात कंपनीने दुर्गा खोटे यांची निवड केली. प्रभात फिल्म कंपनीच्या पहिल्याच बोलपटाच्या दोन्ही भाषेतल्या आवृत्त्या गाजल्या आणि त्यामुळे दुर्गा खोटे यांचे नाव सर्वदूर झाले. त्याच वर्षी प्रभातने पुन्हा एकदा दुर्गाबाईंना घेऊन ‘माया मच्छिंद्र’ हा हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषेत चित्रपट सादर केला. तोही चांगला चालला व दुर्गाबाईंना अभिनेत्री म्हणून मान्यता मिळाली.
      दुर्गाबाई चित्रपटात आल्या, तो काळ स्टुडिओ सिस्टीमचा होता. त्या काळात कलाकारांना व तंत्रज्ञानाला महत्त्व नव्हते. चित्रपटाचा गौरव आणि बोलबाला व्हायचा तो ज्या फिल्म कंपनीने तो निर्मिला त्या कंपनीचाच, कारण सारे कलाकार, तंत्रज्ञ चित्रपट कंपन्यांमध्ये पगारदार नोकर असत. ही पद्धत सर्वप्रथम मोडून काढली दुर्गाबाई खोटे यांनी.
     दुर्गा खोटे यांनी १९३३ साली देवकी बोस यांच्या दिग्दर्शनाखाली ‘राजरानी मीरा’ या चित्रपटामध्ये कोलकाता येथे काम केले व त्यानंतर १९३४ साली ‘सीता’, १९३५ साली ‘जीवन नाटक’ या दोन चित्रपटांत नायिकांच्या भूमिका करून त्यांनी केवळ बंगालमध्येच नव्हे, तर साऱ्या भारतभर लोकप्रियता मिळवली. त्यांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की, प्रभात फिल्म कंपनीने दुर्गाबाईंना पुनश्च ‘अमरज्योती’ (१९३६) या हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी मुद्दाम बोलावून घेतले. स्त्रियांवर झालेले अत्याचार तेवढ्याच तडफतेने परतवून लावून पुरुषांना आपल्या कह्यात ठेवणारी तेजस्विनी दुर्गा खोटे यांनी ‘अमरज्योती’मध्ये अत्यंत परिणामकारकरीत्या उभी केली होती. यात त्यांच्या असामान्य अभिनयाचे आगळेवेगळे दर्शन घडले. या चित्रपटामुळे दुर्गाबाईंचा लौकिक आणखीच वाढला. तरीही प्रभातमध्ये न राहता त्यांनी इतरत्र काम करणे अधिक पसंत केले. त्यामुळेच १९३७ साली प्रदर्शित झालेल्या शालिनी सिनेटोनच्या कलामहर्षी बाबूराव पेंटर दिग्दर्शित ‘प्रतिभा’ या हिंदी-मराठी चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा आपले अभिनयसामर्थ्य दाखवून दिले. याच वर्षी त्यांचे पती विसूभाऊ खोटे यांना देवाज्ञा झाली.
      वाढती लोकप्रियता आणि धोरणी तसेच संवेदनशील दिग्दर्शक व्ही. शांताराम, देवकी बोस यांच्या दिग्दर्शनाचा सहवास लाभल्यामुळे दुर्गा खोटे यांनी आत्मविश्वासाने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे ठरवले. ‘नटराज फिल्म’ या नावाची चित्रपटसंस्था स्थापन करून ‘सवंगडी’ (मराठी) व त्याची हिंदी आवृत्ती ‘साथी’ हा चित्रपट काढायला घेतला. त्यासाठी दादा साळवी, मुबारक, नायमपल्ली यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार निवडले. दिग्दर्शनासाठी पार्श्वनाथ अळतेकर या ज्येष्ठ दिग्दर्शकाची निवड केली. निष्णात संगीतकार गोविंदराव टेंबे यांच्याकडे संगीताचा भार सोपवला. नायिकेची भूमिका दुर्गाबाई स्वतःच करणार होत्या. साऱ्या गोष्टी योग्यरीत्या जमून आल्या होत्या, पण दुर्गाबाईंनी चित्रपटाचा नायकाची भूमिका अनुभवी कलाकाराला न देता अप्पा पेंडसे नावाच्या पत्रकाराला दिली. त्यांना अभिनयाचा बिलकुल सराव नव्हता; त्यामुळे १९३८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांची पसंतीची पावती न मिळाल्याने ‘साथी’ व ‘सवंगडी’ हे दोन्हीही चित्रपट पडले, त्यामुळे दुर्गाबाईंना खूप कर्ज झाले. त्यांनी चित्रपटनिर्मिती बंद करून पुन्हा एकदा केवळ अभिनयावर लक्ष केंद्रित केले.
     या काळातल्या सिर्को प्रॉडक्शनचा ‘गीता’, प्रकाश पिक्चर्सचे ‘नरसी भगत’ व ‘भरत भेट’, पांचोली आर्ट्स (लाहोर)चे ‘खानदान’ व ‘जमीनदार’, साहेबराव मोदी यांच्या मिनर्व्हा मुव्हीटोन निर्मित ‘पृथ्वीवल्लभ’, भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘महारथी कर्ण’, के. असीफ यांचा पहिला चित्रपट ‘फूल’ वगैरे चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले.
   १९४१ साली अत्रे पिक्चर्सचा ‘पायाची दासी’ व त्याची हिंदी आवृत्ती ‘चरणोंकि दासी’ प्रदर्शित झाले. नायिका म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही दुर्गाबाईंनी या चित्रपटात आखाड सासूची भूमिका अत्यंत ठसकेबाजपणे केली होती. त्या चित्रपटामुळे त्यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी स्वागत केले खरे, पण या चित्रपटामुळेच त्यांच्यावर चरित्र अभिनेत्री असा शिक्का बसला गेला व त्यानंतर त्यांना नायिकेच्या भूमिका मिळणेच बंद झाले. तरीही दुर्गाबाईंनी बदलत्या काळात चरित्र अभिनेत्रीच्या अनेक भूमिका आपल्या जिवंत अभिनयाने सजीव केल्या. त्यामध्ये प्रभात फिल्म कंपनीचा ‘हम एक है’, नर्गिस आर्ट कंपनीचा ‘अंजुमन’, ‘मायाबाजार’, ‘सीता स्वयंवर’, ‘मगरूर’, ‘आराम’, ‘हमलोग’, ‘चाचा चौधरी’, ‘शिकस्त’, ‘परिवार’, ‘भाभी’, ‘मुसाफिर’, ‘परख’, ‘अनुपमा’, ‘देवर’, ‘दादी माँ’ अशा अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटातील महाराणी जोधाबाईच्या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले होते. दुर्गा खोटे यांनी नायिका व चरित्र अभिनेत्री म्हणून एकूण २०० पेक्षा जास्त चित्रपटांत भूमिका केल्या.
     उत्कृष्ट अभिनयाच्या कसोटीला उतरणाऱ्या अनेक भूमिका दुर्गाबाईंनी सादर केल्या. बेंगॉल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे त्यांना ‘पायाची दासी’, प्रकाश पिक्चर्सचा ‘भरत मिलाप’ या चित्रपटांतील भूमिकांबद्दल पारितोषिक देऊन गौरवले होते. तसेच १९७० साली महाराष्ट्र राज्य चित्रपट पारितोषिक समारंभात सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून ‘धरतीची लेकरं’ या चित्रपटासाठी सन्मानित केले होते. हिंदी चित्रपट ‘बिदाई’साठी १९७४ साली त्यांना फिल्मफेअरने पारितोषिक दिले होते.
      दुर्गा खोटे यांनी काही मोजक्या भूमिकांनी मराठी रंगमंचही गाजवला. नटवर्य नानासाहेब फाटक यांच्याबरोबर त्यांनी शेक्सपिअरच्या मॅकबेथ या जगप्रसिद्ध नाटकाचा मराठी अवतार ‘राजमुकुट’मध्ये काम केले होते. त्याची खूपच प्रशंसा झाली. ‘मुंबई मराठी नाट्यसंघ’ आणि ‘इप्टा’ या अग्रगण्य नाट्यसंस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. १९५८ साली दुर्गा खोटे यांना संगीत नाटक अकादमी अ‍ॅवॉर्ड देऊन गौरवले होते, तर १९६८ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले व भारत सरकारतर्फे दुर्गाबाईंना १५वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या मराठी कलाकार होत्या.
       दुर्गा खोटे यांनी ‘आर्ट फिल्म’ आणि ‘दुर्गा खोटे प्रॉडक्शन’ या दोन संस्था स्थापन करून त्याद्वारे त्यांनी शेकडो लघुपट, माहितीपट व जाहिरातपट सादर केले. त्यातले काही श्वेतधवल होते, तर काही सप्तरंगात. १९८८ साली त्यांनी ‘वागळे की दुनिया’ ही दूरदर्शन मालिकाही तयार केली व ती खूप लोकप्रिय झाली. दुर्गाबाईंचे वैयक्तिक आयुष्य फारसे सुखावह नव्हते. त्यांनी दोन विवाह केले. पहिले लग्नायुष्य फारच अल्पकाळ टिकले. दुसरे तर प्रेमलग्नच होते. त्यासाठी त्यांनी मुसलमान धर्मही स्वीकारला आणि आपले नाव बदलले, पण चित्रपटक्षेत्रात मात्र त्यांनी दुर्गा खोटे हेच आपले नाव कायम ठेवले.
      आयुष्याच्या संध्याकाळी दुर्गाबाईंनी मुंबई सोडून देऊन, अलिबाग येथे समुद्रकिनारी राहून उर्वरित आयुष्य शांतीने व समाधानाने व्यतीत करण्याचा मानस केला. त्यानंतर त्या अगदी क्वचित प्रेक्षकांसमोर आल्या. १९७९ साली प्रभात फिल्म कंपनीला पन्नास वर्षे पुरी झाली, त्या निमित्त आयोजित केलेल्या भव्य सोहळ्याला त्या उपस्थित राहिल्या होत्या. अलिबाग येथेच वृद्धापकाळामुळे त्यांचा मृत्यू झाला.
     दुर्गा खोटे यांनी १९८९ साली लिहिलेल्या ‘मी-दुर्गा खोटे’ या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा अत्यंत कुशलतेने परिपूर्ण आढावा घेतला आहे. त्यांचे आत्मचरित्र आणि त्यांनी अभिनय केलेले काही चित्रपट अजूनही दुर्गा खोटे यांच्या कलापूर्ण जीवनाची ओळख करून देतात.

-  शशिकांत किणीकर

खोटे, दुर्गा विश्वनाथ