खरवंडीकर, देवीप्रसाद खंडेराव
देवीप्रसाद खंडेराव खरवंडीकर यांचा जन्म नगर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते. खरवंडीकर यांचे बालपण व शिक्षण नगरमध्येच गेले. खरवंडीकरांनी अहमदनगर महाविद्यालयात दीर्घकाळ संस्कृत आणि प्राकृत विषयांचे अध्यापन केले. प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी संगीताचाही सखोल अभ्यास चालू ठेवला. त्यांनी १९७६ साली त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची ‘संगीत अलंकार’ ही पदवी संपादन केली.
डॉ. खरवंडीकर ह्यांनी तब्बल ४५ वर्षं ‘गुंजारव’ या संस्कृत त्रैमासिकाचे प्रमुख संपादक म्हणून काम पाहिले . त्यांनी संस्कृतविषयक विपुल लेखनही केले . त्याचबरोबर त्यांनी संगीत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आणि संगीत अभ्यासकांना मार्गदर्शन होईल असे संगीतविषयक लेखनही केले आहे. ‘हाथरस’चे संगीत प्रकाशन, रोहिणी मासिक आणि बऱ्याच वृत्तपत्रांमधून त्यांचे संगीतविषयक लेख प्रसिद्ध झाले असून ‘संगीत कला विहार’ मासिकातही त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय संगीत महाभारती, मुंबईच्या सांगीतिक ज्ञानकोशासाठी त्यांनी योगदान दिले आहे.
डॉ. खरवंडीकर आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक असून त्यांनी गायनाचे कार्यक्रम आकाशवाणीवरून सादर केले आहेत. संगीत विषयाला अनुसरूनही त्यांनी विविध कार्यक्रम सादर केले आहेत.
अहमदनगर येथे डॉ. खरवंडीकर यांच्या सुविद्य पत्नी कीर्तिदेवी यांनी स्थापन केलेल्या ‘श्रुती संगीत निकेतन’ या संगीत विद्यालयातर्फे विशारद, अलंकारच्या, तसेच एम.ए.पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ‘अलंकार’पर्यंतच्या परीक्षांचे अहमदनगर येथील केंद्र संचालक म्हणून ते गेली २५ ते ३० वर्षे कार्यरत आहेत. तसेच, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे आयोजित होणाऱ्या ‘अलंकार’च्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीच्या शिबिरात ज्येष्ठ संगीतज्ञ म्हणून डॉ. खरवंडीकरांनी ठिकठिकाणी अनेक वेळा मार्गदर्शन केले . ‘भारतीय संगीताचा इतिहास व विकास’ या पाठ्यपुस्तकाचे त्यांनी अन्य सहकाऱ्यांसह लेखन केले .
पुणे विद्यापीठाच्या पदविका परीक्षेत संगीत विषयासाठी डॉ. खरवंडीकरांनी बी.एल. मोडक हे पारितोषिक पटकाविले. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे १९९८ मध्ये संस्कृत पंडित, संस्कृत नाट्यलेखनाचे आकाशवाणीचे पुरस्कार संस्कृत बालसाहित्यासाठी दोनदा, एन.सी.ई.आर.टी.ची पारितोषिके त्यांनी प्राप्त केलेली आहेत. संस्कृतमधील लेखनकार्यासाठी २००९ सालचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला.