Skip to main content
x

लाहोटी, मुरली रंगलाल

      भारतभर सातत्याने प्रदर्शने करणारे उत्साही चित्रकार म्हणून मुरली रंगलाल लाहोटी प्रसिद्ध आहेत. जिद्द, आत्मविश्‍वास, प्रायोगिकता, आणि उत्साह यांमुळे स्वत:च्या चित्रनिर्मितीसोबतच लाहोटी सार्वजनिक व संस्थात्मक कामातही कार्यरत असतात.

लाहोटी मूळचे मराठवाड्यातील परळी वैजनाथचे. एका सधन शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई. त्यांचे मूळ नाव मुरलीधर; परंतु ‘मुरली’ या नावानेच ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वडिलांची इच्छा होती, की आपल्या या मुलाने घरच्या धंद्यात लक्ष घालावे. परंतु लाहोटींचे स्वप्न चित्रकार होण्याचे होते. त्यासाठी त्यांना शाळेतील चित्रकला शिक्षक गोस्वामी यांनी प्रोत्साहन दिले.

चित्रकलेचे पुढील शिक्षण घेण्यासाठी ते घरच्यांचा विरोध पत्करून पुण्याला आले. त्यामुळे सुरुवातीस अन्न, वस्त्र, निवारा यांसाठीही त्यांना बरेच झगडावे लागले. जबरदस्त इच्छाशक्तीमुळे अडचणींवर मात करीत ते १९६३ मध्ये एन.टी.सी. (सेंट्रल गव्हर्नमेंटचा पेन्टिंग डिप्लोमा) परीक्षा उत्तीर्ण झाले. १९६८ मध्ये जी.डी. आर्ट (पेंटिंग), १९७१ मध्ये जी.डी. आर्ट (कमर्शिअल) हे अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले. त्यांच्या पत्नीचे नाव लता असून १९७२ मध्ये त्यांचा विवाह झाला.

त्यांनी १९६५ मध्ये विद्यार्थी असतानाच पहिले व्यक्तिगत प्रदर्शन भरविले. आजमितीस भारतात आणि भारताबाहेर मिळून त्यांची १२५ एकल व ११५ सामूहिक प्रदर्शने झाली आहेत. त्यांना राज्य पातळीवरील पाच व राष्ट्रीय पातळीवरील सात असे पुरस्कार मिळाले असून १९९१ मध्ये फाय फाउण्डेशनतर्फे त्यांचा सन्मान झाला. त्यांना १९९३ मध्ये ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा २००५ मध्ये ज्येष्ठ कलावंत म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच २०१५ साली मुंबईच्या प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फौंडेशन यांच्यातर्फे 'जीवनगौरव पुरस्कार' मिळाला. 

त्यांच्या कलानिर्मितीचा आढावा घेतला तर असे लक्षात येते, की त्यांनी वास्तववादी, आलंकारिक व अमूर्त अशा तीनही शैलींत काम केले आहे. त्यासाठी त्यांनी विविध विषय निवडले आणि नवनवीन माध्यमांचा वापर केला. त्यांच्या चित्रकारितेच्या पहिल्या टप्प्यात जलरंगातील निसर्गचित्रांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात कॅनव्हास आणि तैलरंगांचा वापर दिसतो. त्यात स्वतःच्या जन्मभूमीतील ग्रमीण जीवनाचे प्रतिबिंब पडले आहे. या चित्रांची शैली आलंकारिक आहे असे म्हणता येईल. साधे, सोपे आकार, कमीतकमी अलंकरणाने सजलेल्या, तरीही लोभसवाण्या मानवाकृती, रंगांची नैसर्गिकता ही या चित्रांची वैशिष्ट्ये सांगता येतील. बैलाच्या आकृतीला स्वत:च्या शैलीत निबद्ध करून त्यांनी अनेक चित्रे केलेली दिसतात.

यानंतरच्या टप्प्यात लाहोटींनी अनेक माध्यमे हाताळली. प्लास्टर ऑफ पॅरिस, वाळू, पत्रा, सिरॅमिक, फायबर ग्लास अशा माध्यमांची यात विविधता आहे. या प्रकारच्या चित्रांत प्रामुख्याने पोताचा विचार केल्याचे आढळते.

ते तैलरंग व अ‍ॅक्रिलिक या माध्यमांचा वापर करताना दिसतात  तसेच त्यांची शैली अमूर्ततेकडे वळलेली दिसते. सुरुवातीला असलेले नैसर्गिक आकार व रंग आता प्रतीकात्मक झाले आहेत. मात्र, त्यांच्या रेषेतील आणि ब्रशच्या फटकार्‍यातील जोम, आत्मविश्‍वास सुरुवातीपासूनचं दिसतो. स्वत:च्या मनातील विचारांची आंदोलने, वातावरणातील प्रदूषण यांसारखे विषय ते रंगरेषांच्या माध्यमातून साकार करतात.

त्यांनी अनेक समाजोपयोगी संस्थांना आपली चित्रे भेट दिली आहेत व त्या चित्रांच्या विक्रीतून निधी गोळा करण्याची मुभाही दिली आहे. लाहोटी राज्य व राष्ट्र पातळीवर अनेक कलासंस्थांचे पदाधिकारी होते. साहजिकच त्यांचा कलावंतांशी मोठा जनसंपर्क असून त्यांनी लोकमान्य टिळक आर्ट एक्झिबिशन, पुणे या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

- डॉ. मालती आगटे

लाहोटी, मुरली रंगलाल