Skip to main content
x

लेले, विश्वनाथ काशिनाथ

           शेतीसाठी जमीन हे महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन होय. म्हणूनच जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे ठरते, कारण त्यावर जमिनीत पीक येणे, न येणे व पीक आले तरी कमी अथवा अधिक येणे अवलंबून असते. जमिनीचे म्हणजे मातीचे परीक्षण किंवा तपासणी मोठ्या प्रमाणावर करण्याचा कार्यक्रम आज भारतात सर्वत्र अवलंबला जातो. मातीचे परीक्षण करण्याच्या कार्यक्रमाची महाराष्ट्रात व काही प्रमाणात भारतभरात सुरुवात करण्याचे श्रेय ज्यांना जाते त्या विश्‍वनाथ काशिनाथ लेले यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी रसायनशास्त्र विषय घेऊन पुण्यातील फर्गसन महाविद्यालयामधून बी.एस्सी., वाडिया महाविद्यालयामधून एम.एस्सी. केले.

           दुसर्‍या महायुद्धाच्या सुमारास अस्थिर आर्थिक परिस्थितीत त्यांनी काही वर्षे अंमळनेर महाविद्यालयामध्ये व्याख्याता तर काही काळ खडकीच्या दारूगोळा कारखान्यात केमिस्ट म्हणून काम केले. दुसरे महायुद्ध संपताच त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयात संशोधन साहाय्यक म्हणून कामास सुरुवात केली. त्यांनी १९५१ ते १९५४ दरम्यान ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे जीव-रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले. कोणत्या घटकामुळे व प्रक्रियेमुळे गुळाचा रंग सुधारतो वा बिघडून काळपट होतो याबद्दल डॉ. लेले यांनीच प्रथम काम केले. त्यांचा त्यावरील शोधनिबंधही प्रसिद्ध झाला. त्यांनी १९५४ ते १९६० दरम्यान पुणे येथे कृषि-रसायनशास्त्र विभागात शेतजमिनीची सुपीकता कशी मोजायची, त्यासाठी कोणती साधने वापरायची, सुपीकतेचा दर्जा ठरवण्यासाठी कोणते निकष वापरावयाचे, सुपीकतेतील कमीपणा भरून काढण्यासाठी काय करायचे, कोणती खते व किती प्रमाणात द्यायची आदी मूलभूत संशोधन केले.

           यू.एस.ए.आय.डी.च्या अर्थसाहाय्याने भारतात माती परीक्षण या विषयाचे पहिले संशोधन त्यांनी केले व ‘सॉईल टेस्टिंग इन इंडिया’ हे या विषयावरील भारतातील पहिले पुस्तक त्यांनी अन्य भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञांसमवेत लिहिले. फोर्ड फाउंडेशनने माती परीक्षण या विषयाचा अखिल भारतीय कार्यक्रम आखण्यासाठी, त्या कार्यक्रमाचे घटक व तपशील, पद्धती व साधने इत्यादी ठरवण्यासाठी त्यांना १९६० ते १९६४ दरम्यान दिल्लीत सल्लागार शास्त्रज्ञ म्हणून नेमले होते. या कार्यक्रमाचे आद्य प्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती झाली. नंतर दोन वर्षे नागपूरच्या कृषी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करून १९६५मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाने ‘इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर’चे प्रमुख तज्ज्ञ म्हणून त्यांना पाचारण केले. तेथे १९६५ ते १९६८पर्यंत काम केल्यावर ते पुण्यास येऊन स्थायिक झाले.

           लेले यांच्या मार्गदर्शनाखाली १०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एम.एस्सी. व पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी लवंग, केशर इ. सुगंधी व मसाल्याच्या पिकांचे अर्क काढून शुद्ध करण्यासाठी रासायनिक पृथक्करणाच्या पद्धती शोधल्या. फिल्टर पेपर, ब्लू प्रिंट पेपर इ. अनेक शोधांसाठी त्यांनी एकस्वे मिळवली होती. शेवटच्या श्‍वासापर्यंत ते संशोधन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यामध्ये व्यग्र होते. त्यांचे ५०पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

लेले, विश्वनाथ काशिनाथ