Skip to main content
x

लिमये, महेश मधुकर

     राठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माता- दिग्दर्शकांमध्ये लोकप्रिय असलेल्या एका मराठमोळ्या छायाचित्रकार महेश लिमये यांनी अतिशय परिश्रमपूर्वक आणि सचोटीने स्वत:ला सिद्ध केले आहे. महेश मधुकर लिमये यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे त्यांचे बालपण गेले. तेथील एस.व्ही.जोशी या शाळेत ते शिकले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीची दोन वर्षे त्यांनी फाऊंडेशन आणि त्यानंतर उपयोजित कला (अ‍ॅप्लाईड आर्ट) हा विषय अभ्यासासाठी निवडला होता. या अभ्यासक्रमाच्या शेवटी त्यांनी ‘फोटोग्राफी’ या मुख्य विषयात पदवी प्राप्त केली.

     महेश लिमये यांनी सिनेछायाचित्रकार होण्याचे स्वप्न बघून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली नव्हती, पण तरीही १९९४ सालापासून त्यांनी जाहिरातीच्या चमकत्या क्षेत्रामध्ये राजा सय्यद या सिनेछायाचित्रकाराचे साहाय्यक म्हणून काम सुरू केले. १९९४ ते २००३ या नऊ वर्षांमध्ये साहाय्यक म्हणून काम करताना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांमुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आणि या संपूर्ण माध्यमाकडे बघण्याची नवी आणि व्यापकदृष्टी त्यांना मिळाली आणि त्यातूनच व्यावसायिकतेचे भान आले, तसेच चांगल्या कामासाठी खूप मेहनत करावी लागते याबद्दलची जाणीवही दृढ झाली. छायाचित्रकार म्हणून त्यांनी ‘सी यू अ‍ॅट नाईट’ (२००५) हा स्वतंत्रपणे केलेला पहिलाच चित्रपट होय. एक छायाचित्रकार म्हणून काम करताना महेश यांनी स्वत:ची अशी पद्धत विकसित केलेली आहे. ज्या कलाकारांबरोबर काम करायचे आहे, त्यां कलाकाराची निरनिराळ्या कोनातून काढलेली छायाचित्रे पाहून त्या त्या कलाकाराला कॅमेर्‍यामध्ये टिपण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली आहे.

     महेश लिमये यांनी ‘कॉर्पोरेट’, ‘फॅशन’, ‘हिरॉईन’, ‘ट्रॅफिक सिंग्नल’, ‘दबंग’ व ‘दबंग २’ अशा अतिशय यशस्वी हिंदी चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. त्यांनी मराठीमध्ये ‘एवढंसं आभाळ’, ‘उत्तरायण’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ व ‘बालक-पालक’ या चित्रपटांच्या छायाचित्रणाचे काम केलेले आहे. चित्रपटांप्रमाणेच दूरदर्शनवरून प्रसारित होणार्‍या, सर्वदूर लोकप्रियता मिळालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या काही प्रोमोजचे छायाचित्रण त्यांनी केलेले आहे. त्यांनी छायाचित्रित केलेल्या ‘कोलगेट’, ‘स्कोडा जे अ‍ॅण्ड जे’, ‘नेसकॅफे’, ‘मॅकडोनल्ड्स’, ‘हिरो होन्डा’, ‘विस्पर’ यांसारख्या जाहिराती लोकप्रिय झालेल्या आहेत. 

     अमिताभ बच्चन, ऐश्‍वर्या राय, बिपाशा बासू, करीना कपूर, कंगना राणावत यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘सुपरस्टार्स’बरोबर आणि बिग बजेटच्या भव्यदिव्य हिंदी चित्रपटांचा नेहमी सकारात्मक अनुभव घेतला. आजही मोठ्या बॅनरच्या चित्रपटांचे छायाचित्रकार म्हणून त्यांच्याकडे येणाऱ्या कामाचा ओघ मोठा आहे.

    - नेहा वैशंपायन

लिमये, महेश मधुकर