Skip to main content
x

लिमये, रजनी नागेश

     जनी नागेश लिमये ह्या पूर्वाश्रमीच्या रजनी दातिर. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या सरस्वती मंदिरात झाले. त्यांच्या वडिलांची नोकरी बदलीची असल्याने माध्यमिक शिक्षण पुणे, पंढरपूर, पनवेल येथे झाले. सन १९५४ मध्ये पनवेलच्या के. व्ही. कन्या विद्यालयातून त्या माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यावेळी ठाणे केंद्राच्या गुणवत्ता यादीत त्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी होत्या. नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालयामधून मराठी व संस्कृत विषय घेऊन त्या एम. ए. झाल्या. कोल्हापूरच्या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातून त्यांनी बी.एड. पदवी संपादन केली.

     १९६४ मध्ये नाशिकच्या पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली. इंग्रजी, मराठी व संस्कृत ह्या भाषांच्या उत्तम शिक्षिका म्हणून त्यांचे नाव झाले. माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाच्या गुणवत्ता यादीत चमकणार्‍या अनेक विद्यार्थिनींना त्यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक मार्गदर्शन शिबिरातही तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्या काम करीत होत्या.

     पण याच वेळी नर्सरीत शिकणारा त्यांचा मुलगा गौतम हा मतिमंद आहे हे स्वीकारण्यास अत्यंत कठीण असे वास्तव त्यांच्यासमोर आले. या वास्तवाचा रजनीताईंनी स्वीकार केला आणि हे आव्हान समजून जानेवारी १९७७ मध्ये दातिरांच्या बंगल्यातील एका खोलीत त्यांनी मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू केली. रजनीताईंबरोबर नागपूरच्या ‘नंदनवन’ संस्थेत प्रशिक्षण घेऊन आलेल्या अहोर नावाच्या शिक्षिका होत्या. दोघींनी मुलांच्या क्षमतेप्रमाणे शिकविण्यास सुरुवात केली. मुलाचे मतिमंदत्व स्वीकारून मुलांविषयी जागरूक असणार्‍या पालकांमुळे मुलांची संख्या वाढत गेली. मतिमंद मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षिकांच्या सहकार्याने शाळेला स्थिरता प्राप्त झाली.

     रजनीताईंनी ‘प्रबोधिनी न्यास’ संस्थेची स्थापना केली व कार्यवाह म्हणून त्या काम पाहू लागल्या. १९८३ मध्ये नगरपालिकेने नव्या पंडित कॉलनीतील जागा संस्थेसाठी दिली. त्या वेळचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल लतीफ  ह्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. अवघ्या दोन वर्षांत आदरणीय तात्यासाहेब शिरवाडकरांच्या हस्ते ‘प्रबोधिनी न्यास’च्या इमारतीचे उद्घाटन झाले. ह्याच वर्षी म्हणजे १९८६ मध्ये रजनीताईर्ंचा केंद्र सरकारच्या आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्काराने गौरव झाला, तर १९८८ मध्ये मागासवर्गीय जनतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्या ‘दलित मित्र पुरस्कारा’च्या मानकरी ठरल्या.

      १९८९ मध्ये पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयाच्या उपप्राचार्या म्हणून काम करीत असताना रजनीताईंनी स्वेच्छा निवृत्ती घेतली व संपूर्ण वेळ प्रबोधिनीच्या कार्यास वाहून घेतले. प्रबोधिनी न्यासाच्या त्या कार्यवाह होत्याच. पण ‘प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्रा’ची स्थापना करून त्याच्या प्रमुख समन्वयिका  म्हणून त्यांचे काम वेगाने सुरू झाले. पुण्याच्या कामायनी प्रशिक्षण महाविद्यालयातून डी.टी.एम.आर. म्हणजे डिप्लोमा इन टीचिंग ऑफ मेंटली रिटार्डेड ही पदविका प्रथम क्रमांकाने त्यांनी ह्यापूर्वीच मिळविली होती.

      या शाळेत मुलांचा शैक्षणिक प्रवास, शारीरिक विकास, स्वावलंबन, मनोसामाजिक कौशल्य, संपर्क कौशल्य या चार प्रमुख उद्दिष्टांच्या पूर्तीच्या दिशेने चालतो. तीन ते अठरा वर्षे  वयोगटातील मुले या शाळेत आहेत. त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणयोग्य, प्रशिक्षणयोग्य व नुसते सांभाळण्यास योग्य अशा तीन गटांत ही मुले विभागली जातात. त्याप्रमाणे क्रमश: लेखन-वाचन-अंकगणित, व्यवहार करण्यापुरते उद्योग व सांभाळ असे तीन प्रकारचे संस्कार त्यांच्यावर होतात. मानसोपचार, शारिरोेपचार या विषयांतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या  अभ्यासक्रमाची योजना करावी लागते. मुलांजवळ असलेल्या बुद्धीचा उपयोग कसा करावयाचा याचे शिक्षण त्यांना देतात. सोपी व पुनरावृत्ती असणारी कामे म्हणजे पॅकिंग, फाईल्स तयार करणे त्यांना शिकवतात. शाळेत इतर सामान्य शाळांप्रमाणेच विविध सणसमारंभ, विविध दिन साजरे केले जातात. ही मुले सहलीचा आनंद घेतात. शिक्षकांच्या खूप मेहनतीमुळे राख्या, ग्रीटिंग कार्ड्स तयार करतात, धान्ये निवडण्यासारखी कामे करतात. बालवाडीपासून दहावीपर्यंत काही मुले पुढे जातात.

     अठरा वर्षें पूर्ण झालेल्या मुलांना शाळेत ठेवता येत नाही. त्यांच्यासाठी नाशिकमधील सातपूर भागात संरक्षित कार्यशाळा आहे. या शाळेत शिवणकाम, बाइंडिंग, सुतारकाम असे व्यवसायशिक्षण दिले जाते. यातून त्यांना स्वत:च्या पायावर काही अंशी उभे राहण्याचा आत्मविश्‍वास मिळतो. कार्यशाळेच्या शेजारच्या जागेत मुलांसाठी वसतिगृह आहे. तिथे वीस मुलांची सोय आहे. सर्व मिळून दीडशे मुलांची मान्यता संस्थेला मिळाली आहे.

     शिक्षक प्रशिक्षण केंद्रातून दरवर्षी वीस शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रास दिल्लीच्या ‘राष्ट्रीय पुनर्वास संस्थाना’ची मान्यता मिळाली आहे. शिक्षकांना स्पेशल डी.एड. पदविका मिळते. सर्व शिक्षण अभियानांतर्गत जिल्हा परिषदांच्या, नगरपालिकांच्या शाळांतून मोबाईल टिचर म्हणून नोकरी मिळते. शिक्षकांच्या बरोबरीने पालकांचे मोठे सहकार्य ह्या सर्व गोष्टींत महत्त्वाचे ठरते.

     हा सर्व कार्यभार यशस्वीपणे सांभाळणाऱ्या रजनीताईंमधील लेखिका, कवयित्रीही जागी आहे ह्याचा प्रत्यय ‘गोधूलि गाणी’ (बालकांची गाणी) व ‘जागर’ (मतिमंदांच्या क्षेत्रात पंचवीस वर्षांत आलेल्या अनुभवांचे चित्रण) ह्या त्यांच्या पुस्तकांतून येतो.

    प्रबोधिनी न्यासाच्या विकासासाठी रजनीताईंनी अमेरिका, इंग्लंड, कॅनडा ह्या देशांचा चाळीस दिवसांचा अभ्यासदौरा केला. तेथील विविध प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रांना भेटी दिल्या. सिंगापूर, दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय परिसंवादात ‘कौटुंबिक सहानुभूतीची आवश्यकता’ ह्या विषयावर त्यांचे निबंध वाचन झाले. राष्ट्रीय न्यासाच्या जिल्हा समिती सदस्या, प्रबोधिनी पालकसमितीच्या अध्यक्षा म्हणून रजनीताई काम करीत आहेत.

     रजनीताईंच्या ह्या विशेष कार्यासाठी लोककल्याण पुरस्कार, श्यामची आई पुरस्कार, संस्कृतीवैभव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सार्थ गौरव झाला आहे.

- प्रा. सुहासिनी पटेल

लिमये, रजनी नागेश