Skip to main content
x

मालपेकर, अंजनीबाई नारायण

अंजनीबाई नारायण मालपेकर यांचा जन्म गोव्यातील मालपे या गावी झाला. मालपेकर घराणे संगीतोपासक होते. त्यांची आजी गुजाबाई ही संगीताची, तसेच संस्कृत भाषेची चांगली जाणकार होती. त्यांचे वडील अभियंता असून संगीताचे प्रेमी होते. अंजनीबाईंचे मामा तबला व मृदंगवादक होते. अंजनीबाईंचा आवाज निसर्गतः अत्यंत सुंदर होता. मालपेकर परिवार नंतर मुंबईत स्थायिक झाला.

अंजनीबाईंची धाकटी बहीण कमला यांचाही आवाज मधुर होता. मुंबईतील नवीवाडी येथील मिशनरी विद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षणाबरोबर आईकडून त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षणही मिळत होते. आई नबूबाई आपल्या दोन्ही मुलींना गीत-भजने व छोट्याछोट्या बंदिशी शिकवत.

पं. भातखंडे यांच्या मध्यस्थीने या दोन्ही बहिणींची उ.नजीर खाँसाहेबांकडे तालीम सुरू झाली. अंजनी आणि कमला यांचे शिक्षण चालू असतानाच त्यांची छोटी बहीण प्लेगच्या साथीला बळी पडली. तसेच, उ.नजीर खाँ यांचे सुपुत्रही प्लेगचे बळी ठरले.  नजीर खाँसाहेबांनी आपले सर्व लक्ष अंजनीबाईंवर केंद्रित करून तिला भेंडीबाजार घराण्याची वारसदार बनविण्याचा निश्चय केला.

नजीर खाँसाहेब गायनाच्या शिकवणीसाठी सूर्योदयापूर्वीच अंजनीच्या घरी येत असत. एक-एक सूर स्थिर करीत, त्यात गुंजन निर्माण करणे, दमसास वाढविणे, मींड व घसीट यांनी एका सुरावरून दुसर्‍या स्वरावर जाताना अतूट प्रवाहीपण निर्माण करणे, खंडमेराच्या ५०४० अलंकारांचा रियाझ, त्यातून निर्माण होणारे स्वरविस्तार व त्यांचा आपल्या गायकीत सौंदर्यपूर्ण आविष्कार, गमकेच्या जोरकस ताना, लयदार-ढंगदार सरगम, याशिवाय एका श्वासात विलंबित ख्यालाची पूर्ण स्थायी आणि एका श्वासात पूर्ण अंतरा भरणे, विलंबित लयीमध्येही लयबद्धता जपणे, अशा अनेक अंगांची तालीम आणि रियाझ खाँसाहेब अंजनीबाईंकडून करून घेत असत.

अंजनीबाईंची यमन रागाची तालीम साडेतीन वर्षे आणि भैरवी रागाची तालीम दीड वर्षापर्यंत चालू होती. अशा प्रकारे तालीम घेतल्यामुळे त्यांना इतर राग शिकणे फार सोपे झाले. यमन व भैरवी रागाच्या या कठोर मेहनतीमुळे इतर रागांचे नुसते चलन सांगताच अंजनीबाई त्या रागाचे प्रस्तुतीकरण अचूक करून दाखवू लागल्या.

भेंडीबाजार गायकीमध्ये बंदिशींचेही असाधारण महत्त्व आहे. खाँसाहेब बंदिशीतील साहित्य, बंदिशीचा भाव, शब्दोच्चार, सादरीकरण या गोष्टींचा लक्षपूर्वक अभ्यास करण्याबाबत आग्रही असत. अंजनी मालपेकरांना छज्जू खाँ, खादिम हुसेन खाँ, पं. भातखंडे यांच्याकडूनही तालीम मिळाली.

वयाच्या सोळाव्या वर्षी मुंबईतील एका मोठ्या संगीत संमेलनात अंजनीबाईंचा कार्यक्रम झाला. अल्पावधीतच अंजनीबाईंचे नाव सर्वत्र झाले. खणखणीत जव्हारीदार आवाज, बुद्धिमत्तेचे रंजक आणि भावपूर्ण गायन व असाधारण सौंदर्य यांमुळे त्यांची मैफलीवर छाप पडत असे. देशभरातील संस्थानिकांच्या दरबारातून, तसेच अनेक संगीत संमेलनांतून त्यांचे कार्यक्रम होऊ लागले होते. मुंबईच्या धनिक आणि रसिक सेठ वसनजी वेद यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.

बापूतारा कोठीतील एका मैफलीनंतर त्यांचा आवाज अचानक पूर्णपणे बसला. उपचार करूनदेखील आवाज बरा होत नव्हता. काही हितचिंतकांनी त्यांना केडगावचे सिद्धपुरुष नारायण महाराजांचे नाव सुचवले. महाराजांच्या प्रसादाने त्यांचा आवाज पूर्ववत झाला.

आवाज पूर्ववत झाल्यावर अंजनीबाई पुन्हा गायला लागल्या. त्यांची धार्मिक वृत्ती पुढे पुढे वाढत गेली व गायनाच्या मैफलीत त्यांचे मन रमेनासे झाले. ईश्वरसेवा व  गुरुसेवा करण्यात त्यांना जास्त आनंद वाटू लागला. वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांनी मैफलीमध्ये न गाण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील टाउन हॉलमध्ये त्यांची १९२३ साली शेवटची मैफल झाली. मात्र विद्यादानाचे कार्य त्यांनी सुरूच ठेवले.

पं.कुमार गंधर्व, श्रीमती किशोरी आमोणकर, पं.त्र्यंबकराव जानोरीकर यांना अंजनीबाईंची तालीम लाभली. त्यांनी इतरहीअनेकांना संगीताचे मार्गदर्शन केले, तसेच बेगम अख्तरांना ठुमरीचे मार्गदर्शन केले.

अद्वितीय संगीतसेवेबद्दल अंजनीबाई मालपेकरांना १९५८ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते ‘फेलो ऑफ दी संगीत नाटक अकादमी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

— शरद करमरकर

मालपेकर, अंजनीबाई नारायण